Pink Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Pink Bollworm : गुलाबी बोंड अळीने कोट्यवधींची हानी

Cotton Bollworm Issue : गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी कुठलेही ठोस उपाय दिसत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : गुलाबी बोंड अळीचा अटकाव होत नसल्याची स्थिती यंदाही कापूस उत्पादक राज्यांत आहे. या समस्येमुळे किमान १०० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रूई) नुकसान यंदाही होणार असून, सुमारे २२ ते २३ हजार कोटी रुपयांची वित्तीय हानीही थेट शेतकऱ्यांना सहन करावी लागेल, असे दिसत आहे.

गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी कुठलेही ठोस उपाय दिसत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. परिणामी यंदा देशात कापूस लागवडीत मोठी किंवा सुमारे १५ लाख हेक्टर एवढी घट झाली आहे. देशात कापूस लागवड १२९ लाख हेक्टरपर्यंत मध्यंतरी पोचली होती. ती सतत घटत असून, मागील हंगामात १२६ लाख हेक्टर तर यंदा सुमारे १११ लाख हेक्टरवर कापूस पीक देशात आहे. पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस पिकाला गुलाबी बोंड अळीचा विळखा असतो. यात कोरडवाहू पिकात अधिकची नासाडी या अळीमुळे होत आहे,

असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात दोन - तीन वेचण्या झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही अळी येते. कोरडवाहू कापूस पिकात एकही वेचणी होत नाही, तोच या अळीची समस्या फोफावते व पीक काढून फेकण्याची वेळ येते.

देशात १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड २०२०-२१ च्या हंगामात झाली होती. पण यानंतर कापूस लागवड घटत आहे. अर्थात गुलाबी बोंड अळी व वाढता खर्च यामुळे कापूस पीक शेतकरी कमी करीत आहेत. एकरी किमान अडीच क्विंटल नुकसान गुलाबी बोंड अळीने होत आहे. हे नुकसान यंदाही १०० लाख गाठी एवढे राहणार असून, प्रचलित दरांनुसार २२ ते २३ हजार कोटींचा फटका कापूस उत्पादकांना बसणार आहे.

शेतकरी गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी खासगी कीटकनाशके उत्पादक, पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी व अन्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कापूस पिकात अळी व अंडीनाशके, कीटकनाशके त्यासोबत बुरशीनाशके, संप्रेरके, फवारणीची विद्राव्य खते आदींचा उपयोग करीत आहेत. यावर एकरी दीड हजारांवर खर्च येत आहे. काही शेतकरी तीन तर काही चार फवारण्या कापूस पिकात दर १८ ते २२ दिवसाआड घेत आहेत.

सर्व अंदाज चुकण्याचा प्रघात

कापूस उत्पादनाचे अंदाज कापूस व्यापार, उद्योग क्षेत्रात कार्यरत विविध खासगी व अन्य संस्था दरवर्षी जूनपासून व्यक्त करतात. जो अंदाज व्यक्त केला जातो, त्यानुसार उत्पादन येत नाही. जगात अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्राझील या देशांत मिळून जेवढी कापूस लागवड केली जाते, तेवढी किंवा त्यापेक्षा काहीशी अधिक कापूस लागवड देशात दरवर्षी असते. परंतु देशाचे कापूस उत्पादन चीनपेक्षा कमी किंवा ३४० ते ३५० लाख गाठी एवढे हाती येत आहे. देशात उत्तर भारतात ९५ टक्के कापूस पिकास सिंचनाची सुविधा आहे. महाराष्ट्रात कापसाखाली ९३ ते ९५ टक्के क्षेत्र कोरडवाहू असते. गुजरातेतही सुमारे ५५ ते ६० टक्के कापसाखालील क्षेत्रास सिंचनाची सुविधा आहे.

तेलंगणातही कोरडवाहू कापूस पीक अधिक असते. परंतु या सर्वच भागांत कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव होत आहे. यंदा याच महिन्यात ही अळी उत्तरेसह महाराष्ट्र, गुजरातेत पिकावर दिसली आहे. यामुळे उत्पादनास मोठा फटका बसत असून, कापूस उत्पादनाचा अंदाज चुकत आहे. काही संस्था देशात ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज मागील काही वर्षे व्यक्त करीत आहेत. पण त्यांचा हा अंदाज चुकत आहे. देशात २०१३ पर्यंत कापूस उत्पादन ४०० लाख गाठींपर्यंत होते. परंतु नंतर पिकात गुलाबी बोंड अळी येत असल्याने उत्पादन सतत घटत असल्याचे दिसत आहे. देशाची कापूस उत्पादकताही ५०० किलो रुई प्रति हेक्टरीवरून ४४० ते ४५० किलो रुई प्रति हेक्टरीपर्यंत खाली आली आहे. तर महाराष्ट्राची कापूस उत्पादकता फक्त ३४५ ते ३५० किलो रुई एवढीच राहत आहे.

भारत पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या जागी

देशात वस्त्रोद्योग, बिगर वस्त्रोद्योगात कापसाची ३०० लाख गाठींची गरज आहे. दुसरीकडे देशात कापसाचे उत्पादन गेले चार वर्षे ३५० लाख गाठींवर गेलेले नाही. कापूस उत्पादनात भारत क्रमांक एकवर होता. आता भारत क्रमांक दोनवर मागील काही वर्षे असून, चीनने कापूस उत्पादनात आघाडी घेतली आहे. २०२२-२३ मध्ये देशात ३२५ लाख गाठींचे उत्पादन हाती आले. तर यंदा म्हणजेच २०२३-२४ मध्ये ३४० ते ३४२ लाख कापूस गाठींचे देशात उत्पादन शक्य आहे. सप्टेंबर २०२४ अखेर ही अधिकृत आकडेवारी समोर येईल. उत्पादनात पुढेही अशीच घट होत राहिली तर देशातील वस्त्रोद्योगासमोर कापूस टंचाईचे संकटही येवू शकते. गुलाबी बोंड अळीमुळे प्रक्रिया उद्योगातही दर्जेदार कापसाचा पुरवठा कमी होत आहे. तसेच रुई, धाग्याचा दर्जाची घसरतो, असा मुद्दाही आहे.

गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादन कमी होत आहे. देशात कोट्यवधींचे नुकसान शेतकरी सहन करीत असून, शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक्षम, गुलाबी बोंड अळीला रोखणारा चांगला कापूस वाण हवा आहे. अन्य देशांत जनुकीय सुधारणांचा (जीएम) कार्यक्रम कापूस पिकात सुरूच असतो. आपल्याकडे या बाबत समाधानकारक चित्र दिसत नाही. यामुळे कापूस उद्योगही संकटात सापडत आहे.
संदीप पाटील, संचालक, जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT