Tur crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop Management : तूर पिकातील ओलीत, कीड-रोग व्यवस्थापन

Team Agrowon

जितेंद्र दुर्गे

Tur Pest, Disease : तूर पिकातील समस्या लक्षात घेऊन उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापनाची माहिती आपण मागील लेखापासून घेत आहे. या भागामध्ये पिकाच्या पाण्यासाठी संवेदनशील अवस्था जाणून ओलीत व्यवस्थापन, पिकाच्या विविध अवस्थेतील कीड-रोगाच्या व्यवस्थापनाची माहिती घेऊ.


ओलीत व्यवस्थापन ः

तूर पिकामध्ये शेवरा आणि शेंगांमध्ये दाणे भरणे या दोन्ही अवस्था पाण्यासाठी संवेदनशील असतात. या दोन्ही अवस्थेत असलेल्या पिकाला जमिनीतून पुरेशी ओल मिळाली पाहिजे. त्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या या अवस्थेमध्ये पिकाला ओलीत करावे. सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीन पिकाची काढणी झाल्याबरोबर, त्यानंतरच्या आठवड्यात लगेचच तूर पिकाला ओलीत करावे. वेळच्या वेळी सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन केल्यास फायदेशीर राहते. सोयाबीनच्या रिकाम्या झालेल्या ओळींमध्ये रोटाव्हेटर अथवा तत्सम अवजाराने मशागत करून घ्यावी. या जागेच्या मधोमध दांड पाडून घ्यावेत. या दांडाद्वारे ओलीत करणे सोपे जाते. तुषार सिंचन संच असल्यास, दांडात पाइप टाकूनही स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देता येईल. अशा प्रकारे जमिनीत ओल कमी झालेली असताना शेवरा अवस्थेपूर्वी पाणी दिल्यास फुलोरा अवस्थेवेळी पाणी देण्याची गरज पडणार नाही.

फुलांनी पूर्ण बहरलेल्या पिकामध्ये तुषार सिंचनाद्वारे ओलित करू नये. त्यामुळे फुलगळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. त्यामुळे पाटपाणी किंवा ठिबक सिंचन पद्धती या काळात उपयोगी ठरते. यानंतर शेंगांमध्ये दाणे भरण्याची अवस्था सुरू असताना आवश्यक असल्यास (म्हणजेच जमिनीला भेगा पडलेल्या स्थितीत) पुन्हा ओलीत द्यावे. तूर पिकाची सलग पेरणीमध्ये शेवरा अवस्थेपूर्वी तसेच शेंगांमध्ये दाणे भरताना ओलीत करावे. शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत तुरीचे पीक पूर्णपणे दाटलेले असते. अशावेळी ओलीत करताना येणाऱ्या अडचणी आपण पूर्वीच सोयाबीनच्या जागी पाडलेल्या दांडामुळे टाळल्या जातात. कळ्यांचे रूपांतर फुलांमध्ये होणे, फुलगळ टाळणे, शेंगांमध्ये दाणे योग्य प्रकारे भरणे (म्हणजेच दाण्यांचे वजन वाढविणे) या सर्व बाबी तूर पिकाची उत्पादकता वाढीमध्ये निश्‍चितच महत्त्वाच्या ठरतात. योग्यवेळी ओलीत करणे या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

रोपटे अवस्थेतील मुळे सड :
तुरीच्या रोपावस्थेमध्ये मोठ्या तीव्रतेचा पाऊस झाला तर पिकाच्या बुडाशी जास्त वेळ पाणी साचून राहते. विशेषतः निचरा चांगला नसलेल्या अतिभारी जमिनीमध्ये आणि अधिक दाट पेरल्या गेलेल्या रोपांमध्ये मुळे सडण्याची ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. परिणामी मूळसड होऊन झाडे मरतात. त्यामुळे परत परत खांडणी भराव्या लागतात. मर या बुरशीजन्य रोग व्यवस्थापनासाठी, पेरणीपूर्वी कार्बोक्झिन अधिक थायरम (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम अथवा ट्रायकोडर्मा १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे केलेली बीजप्रक्रिया फायदेशीर असते. जर केली नसेल तर उगवण झाल्यानंतर एकरी एक ते दीड लिटर ट्रायकोडर्मा १५० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. फवारणी पंपाचे नोझल ढिले करून द्रावण सोडत गेल्यास ड्रेंचिंग वेगाने होते.

रोपांच्या बुडाशी पाणी साचू नये, यासाठी तूर पिकाच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी डवऱ्याच्या जानोळ्याला अर्ध्यापर्यंत गच्च दोरी गुंडाळून, हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. तरीही मोठ्या पावसाच्या स्थितीमध्ये पाणी साचून राहण्याची स्थिती निर्माण झाल्यास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम + कार्बेन्डाझिम १ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर पाणी या द्रावणाची ड्रेंचिग करावी. आंतरपीक असल्यास केवळ तूर रोपांच्या मुळांशीच ड्रेंचिग करावे.

कीड व रोग तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला, फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीला व शेंगांमध्ये दाणे भरताना कीड रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. उदा. शेंगा पोखरून त्यामधील दाणे खाणारी अळी, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशीची अळी इ. याच काळात पिकांची अन्नद्रव्याची गरजही वाढलेली असते. त्यामुळे कीडनाशकाच्या फवारणीचे नियोजन करताना विद्राव्य खतांचाही वापर करता येतो. फुलोरा अवस्थेपूर्वी बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास परागीकरणाची क्रिया योग्य प्रकारे होते. कमतरता भासल्यास चिलेटेड झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करता येईल.

फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)
१) शेंगा पोखरून दाणे खाणारी अळी या किडीच्या व्यवस्थापनासाठी,
शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला निंबोळी अर्क (ॲझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम) ०.५ मिलि.
त्यानंतर १२ ते १५ दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट ०.३ ते०.४ ग्रॅम किंवा
फुलोरा अवस्था ७० ते ८०% संपल्यानंतर, क्लोरॅॲन्ट्रानीलीप्रोल ०.२५ ते ०.३ मिलि.
यानंतर फारच आवश्यकता भासल्यास शेंगा पक्व होताना, इंडॉक्झिकार्ब ०.७ मिलि. १.१ मिलि.
(*लाल त्रिकोण असून, अतिविषारी गटात येत असल्याने फारच आवश्यक असल्यास वापर करावा.)
३) खोडावरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी फुलोरा अवस्थेपूर्वी साध्या फवारणी पंपाच्या नोझलला हूड लावून तूर पिकाच्या फक्त खोडावर ओळीच्या दोन्ही बाजूंनी मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीच्या वेळी जमिनीत मुबलक ओल असावी.

४) पीक फांदी अवस्थेत असताना पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही अळी शेंड्याच्या कोवळ्या पानांची गुंडाळी करून त्यात कोषावस्थेत जाते. या अळीमुळे प्रत्यक्षरीत्या नुकसान दिसत नसले तरी पुढील येणाऱ्या तोरंब्याच्या (उपफांद्याची उपफांदी) संख्येत घट होऊन अप्रत्यक्षरीत्या नुकसान होते.
५) फुलोरावस्थेनंतर येणाऱ्या मर रोगामुळे तुरीची झाडे उधळण्याची समस्या उद्‍भवते. यामध्ये प्रथम पानाच्या शिरा पिवळ्या होऊन पाने गळतात. झाडाचे शेंडे मलूल पडून कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीतच वाळते. जमिनीलगत खोडाचा भाग काळा पडतो. खोडांवर पांढरी बुरशीसुद्धा दिसून येते. झाडाचे खोड मुळाकडून शेंड्याकडे चिरून पाहिल्यास आतील नस काळी पडलेली दिसते. याकरिता वर सुचविलेली मर रोगासाठीची उपाययोजना करावी. दरवर्षी या मर रोगाचा प्रादुर्भाव होत असलेल्या शेतात मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे केवळ झाडाच्या खोडावर फवारणी करावी. या वेळी जमिनीत ओल असणे गरजेचे आहे. सोयाबीनमध्ये आंतरपीक तूर असलेल्या पिकामध्ये सोयाबीन कापणी झाल्यानंतर त्वरित ही फवारणी करावी.

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT