Ranbhaji Mahotsav 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Tribal Vegetable Festival: रानभाज्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे कळावेत यासाठी राज्यभरात विविध रानभाजी महोत्सव आयोजित केले जातात. असाच एक महत्त्वाचा महोत्सव आज (ता.२३) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पार पडला.

Swarali Pawar

Pune News: महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनानंतर शेतीचा हंगाम सुरू होतो, ज्यामुळे बाजारपेठांमध्ये ताज्या भाज्यांची आवक वाढते. याच काळात, अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या जंगलांमध्ये बहरतात. या रानभाज्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे कळावेत यासाठी राज्यभरात विविध रानभाजी महोत्सव आयोजित केले जातात. असाच एक महत्त्वाचा महोत्सव आज (ता.२३) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पार पडला.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने, आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाचा उद्देश लोकांना रानभाज्यांचं महत्त्व, त्यांचं पोषणमूल्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देणं हा होता. आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक खाद्य पदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी, आदिवासी सामाजिक संघटना, शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि सर्व नागरिकांनी उपस्थित रहावं, असं आवाहन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि महोत्सवाचे आयोजक प्रदीप देसाई यांनी केलं होतं.

महोत्सवामध्ये आदिवासी बांधवांनी गोळा केलेल्या विविध भाज्या आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. आदिवासी लाभार्थी, आदिवासी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी महोत्सवात सक्रीय सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये रानभाज्या आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीचे एकूण ५७ स्टॉल होते. महोत्सवात वेगवेगळ्या रानभाज्यांचे, खाद्यपदार्थांचे आणि गोड्या पाण्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल होते.

यामध्ये ग्राहकांनी विविध खमंग खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेतला. दिंडा, तेरा, रुखाळू, भारंगी, बेंद्री, रानकेळी, हाडसांधी अशा अनेक वेगवेगळ्या रानभाज्या महोत्सवात उपलब्ध होत्या. भारंगी भाजी, भोकरीची भाजी, लोतीची भाजी, सुकवलेली मोहाची भाजी, काटेसायर भाजी, सुकवलेली भोकरीची भाजी, करटोली, कोकमाची कढी, शेंगदाण्याच्या पोळ्या, कुरडू, देठ भाजी, काटेमाठ, आलिंब भाजी असे दुर्मिळ आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद ग्राहकांनी घेतला. गोड्या पाण्यातील खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे मासे, खेकडे होते. माशांमध्ये कटला, पोपट, बांगडा, रोहू, वाळंज असे माश्यांचे भरपूर प्रकारही या महोत्सवात होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये रानभाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु दळणवळण आणि आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागातील आदिवासी बांधव उत्पादनांना शहरांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचंही देसाई म्हणाले. त्यासाठी आदिवासी बांधवांच्या उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया आणि विक्री करण्यासाठी आदिवासी विभागाने महाट्राईब ब्रॅण्ड तयार केला आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले तर शिवाजीराव आढाळराव पाटील यांनी अध्यक्षपद भुषवलं. तर आमदार शरद सोनवणे, बाबाजी काळे आणि सुनिल शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या भागातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या महोत्सवाला हजेरी लावली. महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमातील लोकनृत्य, लोकगीते, लेझीम या कलाप्रकारांमध्ये आदिवासी बांधव आनंदाने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

SCROLL FOR NEXT