Krantisurya Mahatma Basweshwar Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : समतेच्या खऱ्या क्रांतीचा उद्‌गाता : महात्मा बसवेश्‍वर

Article by Satish Kulkarni : भारतीय समाजाचा गाडा हजारो वर्षांपासून अनेक चांगल्या- वाईट गोष्टी बरोबर घेऊन चालत आलेला आहे.

सतीश कुलकर्णी

Krantisurya Mahatma Basweshwar Book : भारतीय समाजाचा गाडा हजारो वर्षांपासून अनेक चांगल्या- वाईट गोष्टी बरोबर घेऊन चालत आलेला आहे. त्यात तत्त्वज्ञानाच्या पातळीवर अनेक अलौकिक बाबी आढळत असल्या, तरी त्याच्या आडून येणाऱ्या अनेक वाईट बाबींमुळे समाजातील एका मोठ्या वर्गाला फटका बसत आला आहे. सर्वांत वाईट बाब म्हणजे शोषणकर्ता वर्ग कोणताही असो, तो नेहमी धर्माचा आधार घेतो. आठशे ते हजार वर्षांपूर्वीच्या काळामध्ये तर धर्माचा पगडा मोठा होता. राज व्यवस्थेनेही धर्माच्याच साह्याने स्वतःचे दैवीकरण करून सामान्य माणसाला गुलामीमध्ये ढकलण्याचे काम चालवले होते.

अशा काळामध्ये मध्यभारतातील कर्नाटक व महाराष्ट्रात एक क्रांती घडत होती. जात-पात, स्त्री-पुरुष, वर्ग-पंथ यांच्याही पलीकडे पाहण्याची दृष्टी आणि समतेची खरी नीती राबविण्याचे काम या क्रांतीने केले. कार्ल मार्क्सच्या कितीतरी आधी महात्मा बसवेश्वरांनी समतेची क्रांती रुजवली होती. या चळवळीला भारतीय इतिहासात शरण किंवा लिंगायत चळवळ म्हणून ओळखले जाते. महात्मा बसवेश्वर व त्यांच्या चळवळीचा आढावा प्रा. डॉ. शिवशंकर उपासे आपल्या क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर या पुस्तकातून घेतात. ‘सकाळ प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केले असून, प्रा. राजा शिरगुप्पे यांची प्रस्तावना लाभली आहे.

तत्कालीन समाजावरील धर्माच्या पगड्याचा विचार करता बसवेश्वरांनी धर्माचा, शिव किंवा लिंग या शब्दांचा आधार घेतला असला, तरी त्यातील प्रत्येक शब्दाला वेगळा आणि स्वतःचा आदर्श अर्थ प्राप्त करून दिला. प्रत्येक माणसाने शरीरावरच लिंग धारण करायचे असल्यामुळे देवापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरजच नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. बसवेश्वरांच्या आधी वेदप्रामाण्य, पुराणग्रंथ प्रामाण्य आणि चातुर्वर्ण्य नाकारून गौतम बुद्धांनी समतेचा पुरस्कार केला असला, तरी त्यांच्या भिक्खू संघामध्ये दीर्घकाळ महिलांना स्थान नव्हते.

त्या तुलनेत जातीजातींतील विषमता नष्ट करण्यासोबतच शरण चळवळीने जोपासलेली लिंगनिरपेक्षता ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यातूनच अक्कमहादेवी, नागलांबिका, आयदक्की लकम्मा, रायम्मा, लिंगम्मा, गंगाबिका, निलांबिका, सत्यवती, शिवप्रिया, सातव्वा, रेमव्वे अशा अनेक श्रेष्ठ स्त्री संत निर्माण झाल्या. त्यातही इंद्रियांवर सहज विजय मिळवला असल्याने अक्कमहादेवीचे स्थान सर्वोच्च होते. सतीबंदीसोबतच विधवा विवाहास मान्यता दिली.

बसवेश्वरांनी पहिली धर्मसंसद म्हणजेच अनुभव मंटप स्थापन केले. त्यामध्ये सर्व जातीपंथाचे ७७० सभासद होते. त्यात ३३ स्त्रिया होत्या. येथे सामान्यातील सामान्य माणसांचे विचार ऐकले जात. त्यावर मोकळेपणाने, खुली चर्चा होई. अर्थात, अनुभव मंटपात सदस्य म्हणून समावेश होण्यासाठी नीतीपालनाशी संबंधित काही कडक अटी होत्या. मंटपातील सर्वसंमतीनंतर महत्त्वाच्या विचाराचा समावेश धर्मसूत्रात केला जाई. त्यालाच वचने म्हणतात. यात स्त्रियांनीही रचलेल्या १३५१ वचनांचा समावेश आहे.

त्या काळात अन्य समाजातील महिलांना धर्मग्रंथ वाचण्यासही बंदी होती, हे लक्षात घेतल्यास याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. अनुभव मंटपात अन्य धर्मग्रंथावर चर्चा करण्यापेक्षा सामान्य माणसांच्या स्व अनुभव आणि विचारांना महत्त्व दिले जात होते. त्यातून तयार झालेल्या वचनांचा ‘शून्य संपादन’ हा ग्रंथ तयार झाला. लिंगायत बनण्यापूर्वी मनुष्य कोणत्याही जातीचा असला तरी त्यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार सुरू केला.

आज जातीजातींमध्ये साध्या साध्या कारणावरून विष पेरण्याची कामे आजूबाजूला सुरू असताना बसवेश्वरांचा विचार आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांचे जीवनचरित्र, आदर्श विचार- वचने, सहकारी यांची माहिती आजच्या पिढीसाठी सोप्या भाषेमध्ये देण्याचे काम डॉ. शिवशंकर उपासे यांच्या ‘क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाद्वारे केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT