Book Review : वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी मोलाचा ऐवज

Article by Aishwarya Patekar : तुमच्या वाचनाला पुरून उरणारे, तुमची वाचनसमज वाढवून वाचनाचा परिपूर्ण आनंद देणारे ‘वाचनवाटा’ हे आदिनाथ चव्हाण लिखित एक पुस्तक मराठी साहित्यात दाखल झाले आहे.
Book
BookAgrowon
Published on
Updated on

Vachanvata Book : वाचक पुस्तक का वाचतो, या ढोबळ प्रश्‍नाचं उत्तरही ढोबळ आहे. सामान्यपणे पुस्तकाचा आशय, माहिती समजून घेण्यासाठी वाचक पुस्तक वाचतो. खऱ्या अर्थाने पुस्तक वाचणे म्हणजे आशयाच्या पलीकडे जाऊन समजून घेणे.

लेखकाने लिहिलेल्या शब्दांतून प्रतिबिंबित होणारा लेखकाचा इतिहास, भूगोल, त्याचे लेखनकर्तृत्व, त्याची शैली, त्याचे विचार, त्याची लेखनभूमी या साऱ्या बाबी जाणून घेत पुस्तक वाचल्यास वाचक समृद्ध होत जातो. अशा वाचनापर्यंत वाचक पोहोचतो का, या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते.

आपल्या वाचनसंस्कृतीला लागलेल्या ग्रहणाविषयी सर्वांना माहिती आहे, त्याविषयी मी आणखी शब्द खर्ची घालत नाही. मात्र तुम्हाला वाचनाची खरेच आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या वाचनाला पुरून उरणारे, तुमची वाचनसमज वाढवून वाचनाचा परिपूर्ण आनंद देणारे ‘वाचनवाटा’ हे आदिनाथ चव्हाण लिखित एक पुस्तक मराठी साहित्यात दाखल झाले आहे. इंग्रजी साहित्यात रुळलेल्या ‘बुक ऑन बुक्स’ प्रकारातील पुस्तकांचे दालन हल्ली मराठीमध्येही समृद्ध होऊ लागल्याची पोहोचपावती हे पुस्तक देते.

कोणत्याही पुस्तकापर्यंत पोहोचण्याआधी त्याच्या कर्त्याची भूमिका समजून घेतली पाहिजे. पुस्तकांवर लेखकाची नितांत श्रद्धा असून, वाचनाने जगणे समृद्ध करणारी रसद पुरवली असल्यामुळे तो वाचनाशिवाय राहू शकत नाही, असे त्याचेच म्हणणे आहे. ‘‘वाचनात होणारा बौद्धिक विकास, विवेकपूर्ण विचारक्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते.

Book
Book Review : शेतकऱ्यांच्या शोषणाचा इतिहास

एकुणात काय, तर वाचनाशिवाय माणसाला जगता येतं, यावर माझा विश्‍वास नाही. त्यामुळे न वाचणारी माणसं जगण्यासाठी कोणता आधार घेतात, याचं कुतूहलपूर्ण आश्‍चर्य मला नेहमीच वाटत आलं आहे,’’ अशी भूमिका तो मांडतो. त्यांनी स्वतः मराठीतील उत्तम साहित्य वाचून आपला मोर्चा जागतिक साहित्यातील उत्तम ग्रंथापर्यंत वळवला. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक वाचकाची अभिरुची वेगळी असली, तरी प्रत्येकाला वाचनानंद दिल्याशिवाय हे पुस्तक राहणार नाही.

प्रत्येक माणसाचा जसा रहिवासाचा म्हणून मुक्काम पोस्ट असा पत्ता असतो, तसाच पत्ता पुस्तकालाही असतो. त्यापर्यंत पोहोचायचे तर पुस्तकाचा मुक्काम शोधत त्याच्या पत्त्यावर जावेच लागते. उत्तम, दर्जेदार पुस्तकांचा पत्ता नेमकेपणाने देण्याचे काम आदिनाथ चव्हाण यांनी वाचनवाटा या पुस्तकातून केले आहे.

Book
Book Review : कुमार ते ‘गंधर्व’ घडण्याची कथा!

या वाटांवरून जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका करण्याचा अनुभव नक्कीच समृद्ध करणारा आहे. इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र अशा विषयांतील जागतिक साहित्यातील एकेक अनमोल नक्षत्र ते दाखवतात. ते आपल्याला लिओ टॉलस्टॉय, हेन्री डेव्हिड थोरो, खलिल जिब्रान, ऑस्कर वाइल्ड, अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज ऑरवेल, बर्ट्रांड रसेल, गॅब्रियल गार्सिया मार्केझ, सिग्मंड फ्रॉइड, सिमोन द बोव्हुआर आदी महानुभावांच्या विचारविश्‍वाची यात्रा घडवतात.

या पुस्तकातील प्रत्येक लेख विश्‍व वाङ्‍मयातील अजरामर कृतींचे रसग्रहणात्मक सार आहे. ‘साहजिकच हे लिखाण मूळ पुस्तक वाचल्याचा आनंद देते,’ अशा सार्थ शब्दात अतुल देऊळगावकर यांनी प्रास्ताविकात या पुस्तकाची पाठराखण केली आहे. त्याचा प्रत्यय प्रत्येक लेखाचा वाचन आस्वाद घेतल्यावर येत राहतो. ओघवती लेखनशैली आणि शब्दांचा नेमका-नेटका वापर यांमुळे या वाचनवाटांवरचा प्रवास आनंददायी ठरला आहे.

आदिनाथ चव्हाण यांच्या वाचनाने अक्षरशः थक्क व्हायला होते. असे वाचन अगदी मराठी साहित्याच्या प्राध्यापकाचेही मी पाहिलेले नाही. मुळात लेखक जसा जन्मावा लागतो, तसाच वाचकही जन्मावा लागतो.

‘ॲग्रोवन’मधून जेव्हा मी ‘मला भावलेलं पुस्तक’ ही लेखमाला वाचत होतो, तेव्हाच असे वाटले, की वाचनसंस्कृती वाढीच्या दृष्टीने हा खूप मोलाचा ऐवज आहे. तो पुस्तकाच्या रूपाने समोर यायला हवा. पुस्तके वाचून भारावून जाण्यापेक्षाही त्यातील विचार, त्याचा लेखक, त्याचा प्रदेश, त्याची संस्कृती अशा अनेकविध वैशिष्ट्यांचा मागोवा लेखक घेतात.

त्यामुळे मराठी वाचनसंस्कृतीत ‘वाचनवाटा’ या पुस्तकामुळे महत्त्वपूर्ण भर पडली आहे. पाच अनोख्या शीर्षकाच्या विभागात विभागलेले हे पुस्तक ३८ अभिजात वैश्‍विक ग्रंथांचा रसिला परिचय करून देते. ‘सकाळ प्रकाशना’ची निर्मिती आणि निशांत चव्हाण यांचे देखणे मुखपृष्ठ पुस्तकातील आशय ठसठशीत करणारे ठरले आहे. जागतिक साहित्याच्या समृद्ध वाचनाचा वस्तुपाठ देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

ऐश्‍वर्य पाटेकर ९८२२२९५६७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com