Conversation with Pratap Marode :
जगभर सेंद्रिय शेतीबाबत काय स्थिती दिसून येते?
हवामान बदल आणि मानवी आरोग्याची काळजी यामुळे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. अनियंत्रित पद्धतीच्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि कमी होत चाललेली पिकांची उत्पादकता, घटलेले उत्पन्न यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. कोरोनानंतर ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढलीय. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढलीय. जगभरातील १८८ देशांमध्ये स्वित्झर्लंडच्या फिबिल (FIBL) संस्थेने सर्वेक्षणात केले.
त्यानुसार जगभरात सुमारे ९६.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे आणि सुमारे ४५ लाख शेतकरी सेंद्रिय शेती करतात. सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रफळानुसार पहिल्या तीन देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि अर्जेंटिनाचा क्रमांक लागतो. जगभरातील सेंद्रिय उत्पादनांची उलाढाल सुमारे १३४.८ अब्ज युरो एवढी आहे. त्यात अमेरिका (५८.६ अब्ज युरो), जर्मनी (१५.३ अब्ज युरो) आणि चीन (१२.४ अब्ज युरो) हे देश आघाडीवर आहेत.
तैवानच्या सेंद्रिय परिषदेत कुठल्या विषयांवर चर्चा झाली?
तैवानच्या नांहुआ विद्यापीठात झालेल्या २१ व्या जागतिक सेंद्रिय परिषदेमध्ये सुमारे ६५ पेक्षा अधिक देशातील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत सेंद्रिय जीवनपद्धती आणि संस्कृती, सेंद्रिय शेतीतील ज्ञान आणि पद्धतींची देवाण-घेवाण, सेंद्रिय तत्त्वांवर आधारित विक्री पद्धतीत वाढ आणि शाश्वत व सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठीची धोरणे हे चार विषय अजेंड्यावर होते.
परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तैवानचे कृषिमंत्री यु-सी-कुन यांनी सेंद्रिय शेतीविषयी आपल्या सरकारची भूमिका मांडली. तैवानमधील सेंद्रिय शेतीचा प्रवास आणि २०१८ मध्ये सेंद्रिय शेतीच्या धोरणांचे कायद्यात झालेले रूपांतर याची माहिती त्यांनी दिली. आयफोम (IFOAM) च्या अध्यक्ष कॅरेन मापुसा यांनी जगभरातील सेंद्रिय शेतीच्या चळवळींचा आढावा घेतला. इनोफोच्या (INOFO) अध्यक्षा आणि ‘आयफोम'च्या सदस्य शमिका मोने यांनी जागतिक सेंद्रिय चळवळीमध्ये शेतकऱ्यांचे योगदान याबद्दल सांगितले.
त्यासोबतच भारतातील सेंद्रिय शेती आणि देशी बियाण्यांची परंपरा यावर त्यांनी भाष्य केले. भारतात एकेकाळी भाताच्या एक लाख १० हजार जाती उपलब्ध होत्या. त्यापैकी आता १४०० जाती शिल्लक आहेत. त्यांच्या संवर्धनाविषयी काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबत भारतातील बीजोत्सव, सेंद्रिय महोत्सव याबद्दल त्यांनी सांगितले. इनोफोच्या वतीने ‘खरा शेतकरी कोण?’ हा प्रबंध या परिषदेत प्रकाशित करण्यात आला.
परिषदेत धोरणात्मक मुद्यांवर काय विचारमंथन झाले?
आयफोमकडून आरोग्य, निसर्ग, पारदर्शकता आणि सुरक्षितता ही सेंद्रिय शेतीची चार प्रमुख तत्त्वे ठरवण्यात आली आहेत. तसेच सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट करण्यासाठीची धोरणे निश्चित करण्यात आली. या धोरणांमधून सेंद्रिय शेतीच्या चळवळीचे सदस्य आणि सहयोगी घटकांना एकत्र करणे, नवीन सदस्यांसोबत भागीदारी तयार करणे, जागतिक पातळीवरील कृती कार्यक्रम निश्चित करणे अपेक्षित आहे.
जगभरातील सेंद्रिय शेती चळवळीला बळकट करण्यासाठी कृतिकार्यक्रम ठरवण्यात आला. जागतिक पातळीवरील सेंद्रिय शेतीसाठी बाजारपेठा आणि धोरण विकसित करणे, जागतिक पातळीवर सेंद्रिय चळवळीचे नेतृत्व तयार करणे, सेंद्रिय शेतीचा विकास करण्यासाठी जगभरातील पारंपरिक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालणे अशा धोरणात्मक उपायांवर सविस्तर चर्चा झाली.
सेंद्रिय शेती करत असताना येणाऱ्या अडचणींतून कसा मार्ग काढता?
सध्याच्या काळात शेती करणे हीच अतिशय अवघड गोष्ट आहे. सेंद्रिय शेती करणे ही तर तारेवरची कसरत आहे. सेंद्रिय शेती करताना प्रामुख्याने मजूर समस्या, हवामान बदल, बाजारपेठ, कीड व रोग व्यवस्थापन या अडचणी येतात. या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
एकत्रितपणे शेतमालाची विक्री करण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी ‘फ्रेंड्स ऑफ अर्थवर्म’ ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. मजुरांची समस्या सोडवण्यासाठी सोप्या यंत्रांचा वापर, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी देशी बियाण्याचा वापर करणे इत्यादी उपाय करत असतो.
मुळात शेतीमधील अडचणी आणि समस्यांचा डोंगर न संपणारा आहे, पण आपण स्वतः पिकवलेले रसायन अवशेषमुक्त अन्न स्वतः खाणे आणि लोकांना खाऊ घालणे यातून मिळणारे समाधान वेगळे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्याची उमेद टिकून राहते.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनांना अपेक्षित दर मिळतो का?
सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही. शेतकरी जेवढे कष्ट, मेहनत एखादे पीक पिकवण्यासाठी घेतो, त्या तुलनेत त्याला मोबदला मिळत नाही. सेंद्रिय उत्पादने जर नेहमीच्याच बाजारपेठेत विकली गेली तर त्यांना सामान्य दर मिळतात. पण आम्ही आमच्या शेतातील सगळ्या पिकांवर प्रक्रिया करतो.
त्यातून अधिकचे दर मिळतात. ग्राहकांना जोडून घेऊन त्यांना जर सेंद्रिय उत्पादनांची चव, आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगितला तर नक्कीच चांगले दर मिळतात. यासाठी सोशल मीडियाचा खूप चांगल्या प्रमाणात वापर करणे शक्य आहे. आम्ही आमची उत्पादने विकण्यासाठी व्हाट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्याचा चांगला फायदा होत आहे.
सेंद्रिय शेतीला किती भवितव्य आहे?
सेंद्रिय शेती हे शहरी लोकांच्या डोक्यातील खूळ आहे, अशी टीका बऱ्याचदा केली जाते. सेंद्रिय शेती करणाऱ्या आणि या विषयावर बोलणाऱ्या लोकांची टिंगलटवाळी केली जाते. आपण फक्त शंभर वर्षांपूर्वीची शेती पाहिली तर भारतातील जवळपास सगळी शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात होती, हे लक्षात येईल.
अल्बर्ट हॉवर्ड यांच्या ‘ॲन अग्रीकल्चरल टेस्टामेंट’ या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती आहे. नजीकच्या भविष्यात फक्त सेंद्रिय शेतीच टिकून राहील. हवामान बदल आणि वाढत चाललेली नापिकी यावर फक्त सेंद्रिय शेती हाच एकमेव उपाय दिसतो. मुळात रासायनिक शेतीमध्ये कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. शेतकरी या व्यवस्थेत फसला आहे. अमेरिकेतील रॉडेल इन्स्टिट्यूट गेल्या ४० वर्षांपासून सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास करत आहे.
तैवानला झालेल्या परिषदेत मी रॉडेल इन्स्टिट्यूटचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अँद्रू स्मिथ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सेंद्रिय शेतीतून माणूस, जमीन, पिके आणि पर्यावरण या सगळ्यांचे आरोग्य जपले जाते तर रासायनिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य तर बिघडतेच पण शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा घटत जाते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इथून पुढच्या काळात शेतीचे भविष्य सेंद्रिय शेती हेच असेल.
आपण स्वतः सेंद्रीय शेती करीत आहात. त्याविषयी काय सांगाल?
माझ्या वडिलांनी शेती करताना गेल्या ५० वर्षांपासून जास्तीत जास्त एकात्मिक शेती पद्धतीचा वापर केला. त्यामुळे आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहिला. आम्ही गेल्या नऊ वर्षांपासून ३७ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. सुरुवातीपासून आम्ही जमिनीला भरपूर बायोमास (हिरवळीचे खत, गवत आणि पिकांचे अवशेष) दिला आहे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताचा आम्ही उपयोग करतो.
आमच्याकडे २५ जनावरे आहेत. त्यांचे मूत्र गोळा करून त्याचा वापर करतो. जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर इत्यादीचा वापर करतो. कीड व रोग व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे आणि जैविक निविष्ठांचा वापर करतो. तण नियंत्रणासाठी ब्रश कटर वापरतो. आम्ही जवळपास ३० प्रकारची पिके घेतो.
यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर, केळी, हरभरा, सीताफळ, हळद, गहू, सफेद मुसळी, उडीद, मूग, ज्वारी यांचा समावेश आहे. जवळपास सगळ्या पिकांवर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री करतो. नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवणे, कापसापासून कापड निर्मिती हे विशेष प्रयोग आहेत. आम्ही आमच्या शेतात कोणत्याही प्रकारचे जीएम (जनुकीय परावर्तित) बियाणे वापरत नाही. जवळपास सगळे गावरान बियाणे वापरतो.
प्रताप मारोडे ७५८८८४६५४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.