Interview with Manikrao Khule : रब्बी पिकांसाठी पोषक थंडी यंदा असेल का?

Manikrao Khule, Retired Scientist of the Meteorological Department : सर्व परिस्थितीचा रब्बी पिकांवर काय परिणाम होईल? याविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मग डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात थंडी कशी राहील? पुढील तीन महिन्यांत तापमानात खरंच जास्त राहणार आहे का? ‘ला निना’ची परिस्थिती काय आहे? या सर्व प्रश्‍नांविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी साधलेला संवाद.
Manikrao Khule, Retired Scientist of the Meteorological Department
Manikrao Khule, Retired Scientist of the Meteorological Department Agrowon
Published on
Updated on

Conversation with Manikrao Khule, retired scientist of the Meteorological Department : राज्यात सध्या अनेक भागांत थंडी वाढली आहे. मात्र थंडीत चढ-उतार सुरू आहेत. नुकतेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमानात वाढ झाली होती. तसेच राज्याच्या काही भागांत थंडी कमीच आहे. यंदा रब्बी पेरण्या आघाडीवर आहेत. पिकेही जोमात आहेत. रब्बी पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. पण हवामान विभागानेही पुढील तीन महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज दिला आहे. यामुळे या सर्व परिस्थितीचा रब्बी पिकांवर काय परिणाम होईल? याविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मग डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात थंडी कशी राहील? पुढील तीन महिन्यांत तापमानात खरंच जास्त राहणार आहे का? ‘ला निना’ची परिस्थिती काय आहे? या सर्व प्रश्‍नांविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी साधलेला संवाद.

यंदा अद्यापही कडाक्याची थंडी जाणवत नाही. याचे कारण काय?

महाराष्ट्रातील वातावरण हे उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा तीन ऋतूंनी युक्त अशा उष्ण कटिबंधातील कोरड्या व ओलसर हवामानाचे आहे. किनारपट्टीवरील हवामान हे उच्च आर्द्रतेचे दमट तर सामान्य तापमानाचे असते व अंतर्गत भागात टोकाची ताप व थंडीचे असते. कडाक्याच्या थंडीचा अत्युच्च काळ अजून येत आहे. त्यासाठी वाट पाहावी. त्यामुळे आता लगेच थंडी जाणवत नाही, असा निष्कर्ष काढता येणार नाही.

यंदा तापमान जास्त राहण्याचा अंदाज असल्याचे बोलले जाते. या रब्बी पिकांवर काय परिणाम होऊ शकतो?

तीन महिन्यांचा दीर्घ पल्ल्याच्या तापमानाचा अंदाज हा तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असा दिला आहे. तरी तापमान खूप अधिक असेल आणि थंडी अजिबात असणार नाही, असा सरसकट अर्थ घेऊ नये. थंडी तीन महिने जाणवणारच आहे. शिवाय ‘ला-निना’चे वर्तन काय असेल, यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मात्र तापमान जास्त आणि थंडी मुळीच नाही, असा अर्थ अंदाजाचा काढू नये. रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होणार नाही. तसेच यंदा उन्हाचा ताप फेब्रुवारीपासून वाढेल अशी शक्यता सध्या जाणवत नाही.

Manikrao Khule, Retired Scientist of the Meteorological Department
Interview with Bharat Ganeshpure : आत्मकेंद्रितपणामुळे समाजात नैराश्‍य वाढले

डिसेंबर महिन्यात पुढील पंधरवड्यात थंडी कशी असेल?

संपूर्ण डिसेंबर महिन्यात पहाटे ५ वाजता किमान आणि दुपारी ३ वाजता कमाल अशी दोन्हीही तापमानाने ही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहेत. म्हणजेच दरवर्षी जी थंडी महाराष्ट्रात जाणवते त्यापेक्षा कमी थंडी या वर्षी जाणवणार आहे. दिवसाचे कमाल तापमान मात्र नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरी इतके जाणवू शकते. थंडीच्या लाटा जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, धाराशिव, वाशीम आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी, तर उर्वरित महाराष्ट्रात त्या सरासरी इतक्या जाणवू शकतात.

हे विश्‍लेषण जरी सूक्ष्म पातळीवरील असले, तरी या वर्षीचा डिसेंबर महिना महाराष्ट्रासाठी काहीसा उबदार जाणवू शकतो. आता कमी थंडीचा वरील अंदाज हा महाराष्ट्रासाठी जरी डिसेंबर महिन्याचा असला तरी एकंदरीतच संपूर्ण हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण या वर्षी कमीच असण्याची शक्यता जाणवते. त्यातही नेहमी अधिक थंडी जाणवणाऱ्या महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, पूर्व-नगर आणि जालना या पाच जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण या वर्षी अधिकच कमी असू शकते, असे वाटते. खरे तर याच जिल्ह्यात हिवाळी रब्बी हंगामात थंडीवर घेतले जाणारे कांदा पीक अधिक असते. म्हणजेच येथील कांदा पिकावर काहीसा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे वाटते.

थंडीची लाट केव्हा घोषित केली जाते?

एखाद्या ठिकाणच्या पहाटे ५ वाजेच्या दैनिक किमान तापमानाच्या आधारावर भारतीय हवामान खाते त्या ठिकाणची थंडीची लाट घोषित करते. एखाद्या ठिकाणी जेव्हा पहाटे ५ वाजेचे किमान तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअस अंशांनी घसरते, तेव्हा भारतीय हवामान खाते त्या ठिकाणी थंडीची लाट घोषित करते.

या पुढील काळात पाऊस किंवा गारपिटीची शक्यता आहे का?

‘ला-निना’ अजून आलेला नाही आणि येण्यासाठी शक्यता असली, तरी फक्त दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. ‘ला - निना’च्या शक्यतेवर महाराष्ट्रातील २६ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

Manikrao Khule, Retired Scientist of the Meteorological Department
Interview with Indrajit Bhalerao : अध्यात्माचे लोकशाहीकरण करणारा कबीर

महाराष्ट्रातील थंडी कोणत्या घटकांवर अवलंबून असते?

महाराष्ट्रातील थंडी प्रामुख्याने पश्‍चिमी प्रकोपे, थंड हवेचे पुंजके, रिज तयार होणे, हिमाच्छादन, आर्टिक व अंटार्क्टिकवरील बदल आणि सैबेरियातील थंडीवर अवलंबून असते. पश्‍चिमी प्रकोपामुळे उत्तर गोलार्धातील सुमारे ३० ते ६० अक्षांशांमधील समशीतोष्ण क्षेत्रांतील, म्हणजेच आपल्या देशाचा विचार केला तर उत्तरेकडे दिल्ली, पंजाब, हरियाना, पश्‍चिम उत्तर प्रदेश उत्तराखंडपासून लेह-लडाख व काश्मीरपर्यंत उत्तरेकडे तर सिक्कीम आसामकडील राज्यांपर्यंत पूर्वेकडे अशा समशीतोष्ण क्षेत्रांत वातावरणीय अस्थिरता निर्माण करणारे, अल्पजीवी ठरणारे अस्थायी व क्षणिक असणारे पश्‍चिमेचे वारे वाहतात.

ज्यामुळे उत्तर भारतात हिवाळ्यात हिमवृष्टी व पाऊस पडत असतो. थंड हवेचे पुंजके हे जमिनीवरील एकसमान तापमान आणि आर्द्रता असलेले व हजारो मैल पसरू शकणाऱ्या थंड हवेच्या पुंजक्यांना अधिक उंचीवरील वारे एखादे वाहन चालवावे तसे वाहनाच्या स्टिअरिंगप्रमाणे हवी ती दिशा देऊन सुकाणू प्रमाणे नियंत्रित करत असतात. थंडीला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातात. उत्तर भारतात जेव्हा हिमवर्षावातून बर्फाची चादर पसरते तेव्हा महाराष्ट्रात थंडीच्या लाटा घुसण्याची प्रक्रिया वेगाने घडून येते. आणि हिमवर्षाव तेव्हाच होतो जेव्हा एकापाठोपाठ पश्‍चिमी प्रकोपे मार्गस्थ होत असतात.

महाराष्ट्रात थंडीचे चढ-उतार सहसा कसे असतात?

महाराष्ट्रात थंडी दरवर्षी सहसा तीन टप्प्यांत आढळते. पहिला टप्पा हा २४ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतच्या ३७ दिवसांचा असतो. पहिला टप्पा हा २४ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंतच्या ३७ दिवसांचा असतो. एखाद्या वर्षी थंडी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू होते. भले थंडीची सुरुवात माफक झाली असली, तरी हंगामाची घडी व्यवस्थित बसवली जाते. या वर्षीच्या २०२४ च्या हिवाळी हंगामातील पहिल्या टप्प्यातील चढत्या थंडीने कार्तिक पौर्णिमेदरम्यानच्या तीन दिवस वगळता गेल्या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात पहाटे पाच वाजेचे किमान तापमान हे नेहमीच सरासरीच्या खालीच राहिले आहे. पण रब्बी पिके, फळ-बागा व इतर भाजीपाला पिकांना मदतच केली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेतील या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी ही जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील थंडी १ डिसेंबर ते २६ जानेवारीपर्यंतच्या ५७ दिवसांतील असते. या टप्प्यातील थंडी ही अत्युच्च असते. याच थंडीवर संपूर्ण रब्बीचा हंगाम अवलंबून असतो. चालू वर्षी या टप्प्यातील थंडीचा विचार करता असे जाणवते की जानेवारी महिन्यात जर ‘ला- निना’ची उपस्थिती राहिली, तर महाराष्ट्रासहित संपूर्ण वायव्य भारतात जानेवारी महिन्यात सर्वाधिक व त्यानंतर खालोखाल फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटांची संख्या अधिक असू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील तीव्र थंडीचा काळ रब्बी पिकांना लाभदायक ठरू शकते, असे वाटते.

तिसऱ्या टप्प्यातील थंडी महाराष्ट्रात साधारण २७ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंतच्या सरासरी २० दिवसांची असते. अर्थात, कधी कधी ही थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंतही टिकते. परंतु ती नेहमीच असते असे नाही. मात्र ला-निना वर्षात अशी थंडी फेब्रुवारीअखेरपर्यंतही टिकते. या वर्षीची तिसऱ्या टप्प्यातील थंडी ही सुद्धा ला-निनावरच अवलंबून आहे.

रब्बी पिकांसाठी थंडी का आवश्यक असते?

पिकास थंडी महत्त्वाची असून जमिनीलगत नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अधिक हवेच्या घनतेमुळे हवेचा दाब उच्च असतो. तर शेतजमीन आकुंचनामुळे जमीन रंध्रे मोकळी होतात. पिकाचा श्‍वासोच्छ्‌वास चांगला होऊन मुळी सक्षम होते आणि हे केवळ पेरकांद्यात घडू शकते. उन्हाळ लागवड कांद्यात फेब्रुवारी

ते मे दरम्यान हे घडत नाही. कारण थंडी उपलब्धतेचा आलेख झुकतीकडे कललेला असतो. इतर गहू, हरभरा आणि ज्वारीसारख्या रब्बी पिकांनाही या प्रक्रियेचा लाभ होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com