
A Conversation with Bharat Ganeshpure : मोबाइलचा भस्मासूर सगळीकडे पसरण्याच्या आधी गावात पारावर तर शहरात देखील चहा टपरीसह अनेक ठिकाणी मित्र एकत्रित येत गप्पाचे फड रंगत होते. त्यातून एकमेकांचे सुख, दुःख शेअर होत होते. अडचणींवर मार्ग निघत असे. कधी गमतीजमतीतून निखळ हास्य फुलत होते. आता प्रत्येक जण आत्मकेंद्रित झाला आहे. त्यामुळे हसण्यासाठी रिल्स किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील विनोदी मालिका हाच जणू एकमेव पर्याय उरला आहे, अशी खंत कृषी पदवीधर तसेच हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली.
तुमचे मूळ गाव कुठले? जडणघडण कशी झाली?
आमचे कुटुंबीय मूळचे दर्यापूर (अमरावती) येथील आहे. माझे वडील शिक्षण विभागात होते. ते नोकरीच्या निमित्ताने अमरावतीत असल्याने माझे बालपण याच शहरात गेले. अकरावी, बारावीत चांगले गुण मिळाले. त्यानंतर बी.ए. म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचा मानस होता. परंतु वडिलांनी कृषीकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कृषी शिक्षणामुळे वेगळा आनंद मिळाला आणि दृष्टिकोनही बदलला. कला, वाणिज्य शाखेत जाण्याऐवजी या शिक्षण प्रणालीचा चांगला फायदा झाला, असे मी मानतो.
कृषी शिक्षण घेतल्यानंतर अभिनय क्षेत्र का निवडले?
नववी, दहावीत असताना शालेयस्तरावरील काही नाटकांत भाग घेत होतो. आवड वाढत गेली. या दरम्यान नाटकांचे भरपूर प्रयोग केले. परंतु ते स्थानिक स्तरावर असल्याने अभिनय क्षेत्रात पदार्पणासाठी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कला क्षेत्राची आवड असल्याने संधीच्या शोधात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत दाखल झालो. अभिनयाच्या पहिल्या संधीकरिता अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले. अखेरीस १९९९ मध्ये पहिली संधी मिळाली. त्यानंतर दूरदर्शनवरील काही मालिका, मराठी सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका करण्यास सुरुवात केली.
वऱ्हाडी भाषेमुळे काय फायदा झाला?
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातून प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी मराठवाडी भाषा काही अंशी नावारूपास आणली होती. त्यामुळे ही भाषा फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरात होती. परंतु वऱ्हाडी भाषा नावारूपास आणणे अडचणीचे होते. प्रायोगिक तत्त्वावर टीव्ही मालिकांमध्ये काही प्रमाणात वऱ्हाडी भाषेचा वापर सुरू केला. ‘निशाणी डावा अंगठा’सारख्या काही चित्रपटांतही या भाषेचा चांगला वापर झाला. मात्र ‘फू बाई फू’मध्ये खऱ्या अर्थाने वऱ्हाडी बोलीभाषेला व्यासपीठ मिळाले, असे वाटते... प्रेक्षकांचा वऱ्हाडी बोलीतील विनोदाला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे प्रोत्साहन मिळत गेले. पुढे स्क्रीप्टही तशा प्रकारच्या तयार होत गेल्या. आता अनेक नाटकांमध्ये याचा सर्रास उपयोग होतो. ‘फू बाई फू’ दोन वर्षे आणि ‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका तब्बल दहा वर्षे सुरू होती. ‘चला हवा येऊ द्या’चे आठ-नऊ देशांत सादरीकरण झाले. या सगळ्यांतून वऱ्हाडी भाषेचा प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे सिद्ध होते.
दैनंदिन आयुष्यात वाढलेल्या ताणतणावाबद्दल काय सांगाल?
आजकाल आनंदाचे क्षण कोणीच शेअर करीत नाही. आता केवळ दुःख सांगितले जाते. शेती, दागिने किंवा काही खरेदी केले तरी आता सांगितले जात नाही. कारण दृष्ट लागेल, डोळ्यावर येईल असा समज झाला आहे. त्यातून समाजात नकारात्मकता वाढीस लागली आहे. परिणामी, एखादी विशेष बाब आपल्याकडे असण्याचा आनंद उरला नाही. आपल्याकडे जे काही आहे, ते असण्याचे समाधान नाही. परंतु दुसऱ्याकडील छोटीशी वस्तू पाहून दुःख मात्र अधिक होते. एकंदरीत परिस्थिती पाहता गाव वरून शांत भासत असले, तरी गावातील प्रत्येक जण अस्वस्थ आहे हे जाणवते. याला बऱ्याच अंशी मोबाइल जबाबदार आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी म्हणून कर्मकांड, बुवाबाजीचा आधार घेतला जातोय. हे दुर्दैवी चित्र सर्वदूर आहे. आता प्रत्येक जण मोबाइलच्या आहारी गेला आहे. मला असे वाटते, की पुढील काही वर्षे ही स्थिती कायम राहील. त्यानंतर या परिस्थितीचा कंटाळा येईल आणि हातातील मोबाइल सुटेल, हे नक्की.
आजच्या एकंदर राजकीय स्थितीविषयी काय वाटते?
राजकारण्यांचा एकमेकांवर विश्वास नाही, तर आपण त्यांच्यावर कसा विश्वास टाकणार, अशी आजची राजकीय परिस्थिती आहे. एखाद्यावर गैरप्रकाराचा आरोप झाला की लगेच तो सत्ताधारी गटात सहभागी होतो. त्यानंतर तत्काळ त्याला क्लीन चिट मिळते. गैरप्रकार करणाऱ्याला शिक्षा होणे ही गोष्ट आता दुर्मीळ झाली आहे. शिक्षेचा बडगा केवळ सर्वसामान्य लोकांसाठी असतो.
सध्याच्या शेती समस्यांबद्दल काय सांगाल?
कृषिप्रधान देश आणि संपन्न शेती ही केवळ आता परिकथेतील कल्पना वाटते. कांदा, टोमॅटो, तूरडाळ वा इतर शेतीमालाच्या किमती जरा वाढल्या की शहरी भागातून महागाई वाढल्याची ओरड होते. त्यानंतर तत्काळ महागाई कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरमुळे मात्र महागाई वाढत नसावी, कारण त्याविषयी कोणीच ओरडत नाही. ही कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन उत्पादकांचे जिणे अवघड झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीत सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. सर्व प्रकारच्या निविष्ठांचे आणि मजुरीसह इतर व्यवस्थापनाच्या बाबींवरील खर्चही वाढला. त्याचा विचार करता सोयाबीनचे भाव आतापर्यंत १० ते १२ हजार रुपयांवर जाणे आवश्यक होते. तो का गेला नाही, याची चिंता शेतकरी सोडून कोणालाच नाही, ही देखील एक शोकांतिकाच आहे. मोठ्या संख्येत असलेल्या शहरी मतदार आणि ग्राहकांचा विचार करून सरकार स्तरावर धोरण ठरवले जाते. ते ठरवताना शेतकऱ्यांचा तसूभरही विचार होत नाही. देशात तूर, हरभरा, सोयाबीन, कपाशीचे उत्पादन चांगले झाले असताना त्याच वेळी या शेतीमालाच्या आयातीचा निर्णय घेतला जातो. आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव पडतात.
जमीन आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याबद्दल काय वाटते?
शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठांच्या वापरावर भर दिला आहे. त्यात त्यांची चूक नाही. त्यातून उत्पादकता वाढली. परिणामी दर कमी असले, तरी वाढीव उत्पादकतेच्या माध्यमातून काही अंशी नुकसान कमी करणे शक्य होते. मात्र त्याचे जमीन आरोग्यावर परिणाम झाले हे देखील तितकेच खरे आहे. रासायनिक निविष्ठांचा भडिमार होत असल्याने जमिनीचा पोत खालावला. नजीकच्या काळात उत्पादकता कमी झाली आहे. शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनाही या गोष्टीची जाणीव झाल्याचे लक्षात येते. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांशी बोलताना अन्य कोणत्या समस्या जाणवतात?
ताकदीचा अभिनय होण्यासाठी जो प्रश्न आपण मांडणार त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतो. त्यातून अनेक प्रश्न लक्षात येतात. सध्या शेतीकामी मजूर उपलब्ध नसणे हा प्रश्न शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. त्याची दखल घेत शासनस्तरावरून उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्याकरिता काही तरी धोरण ठरवावे लागणार आहे. मोफत अन्नधान्य योजना बंद करावी लागेल. त्याऐवजी शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम किंवा धान्य देण्याचे धोरण शासनाने अंगीकारावे. अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नाही तर मग आधीच तुकड्यात विभागली गेलेली शेती पडीक राहण्याचा धोका वाढेल.
शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे...
पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती. आता कुटुंब विभक्त होत आहेत. त्यातून शेती आणि संपत्तीचे विभाजन होते. तुकड्यातील शेतीतून गरजांची पूर्तता होत नाही म्हणून नाइलाजाने उत्पन्नाचे एकमेव साधन असलेली शेती विकली जाते. ही शेती गावातीलच एखादा शेतकरी विकत घेत नाही तर शहरातील अनेक जण इन्व्हेस्टमेंट म्हणून जादा पैसे मोजून ती खरेदी करतात. यातून मूळ शेतकरी मजूर होत असल्याचे भीषण वास्तव आहे. हे संकट टाळण्यासाठी एकमेकांशी असलेला वैरभाव विसरून सामूहिक शेतीचा पर्याय अवलंबिणे गरजेचे आहे. यातून शेतीचा खर्च विभागला जातो आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचीही उभारणी शक्य होते. परंतु आपले दुर्दैव म्हणजे आठ ते दहा फुटांचे आपले निव्वळ बांध (धुरे) आहेत; त्यावरूनही वर्षानुवर्षाचे वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी एकत्र येणे हे मोठे आव्हान आहे.
तुम्ही स्वतः शेती करणार का?
अभिनय क्षेत्रामुळे गावी आणि शेतीसाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. आता थोडा वेळ मिळत असल्याने हा काळ आनंदी जावा याकरिता शेती हाच एकमेव पर्याय वाटतो. त्यानुसार चांदूर रेल्वे मार्गावर बोडणा येथे सहा एकर शेती खरेदी केली आहे. या क्षेत्रात फळबाग फुलविण्याचा मानस आहे. शेतीची आजची स्थिती बघता पारंपरिक शेती करण्याऐवजी फळबाग लावली तर काहीशी निश्चिंतता राहते. शेती फुलविण्यापूर्वी काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना भेटी दिल्या. त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनाचे बारकावे जाणून घेतले. आता मोसंबीसह इतर विविध फळपिके घेण्याचा विचार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.