Onion Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Pest Disease Management : कांदा पिकातील रोग, किडींचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. सुरेश गावंडे

Onion Crop Management : बहुतांश ठिकाणी खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड होऊन पीक जवळ जवळ ४५-६० दिवसांचे झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात रांगडा कांद्याची रोपवाटिका दिसून येते. सध्या प्रामुख्याने मूळकुज, करपा रोग आणि फुलकिडे, कंद किंवा खोड कुरतडणाऱ्या अळीचा कांदा पिकावर मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कांदा पिकावरील रोग

काळा करपा :

रोगकारक बुरशी ः कोलीटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्‍स

लक्षणे - सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढून पाने वाळतात आणि कांद्यांची वाढ होत नाही.

खरिपात रोपवाटिकेतील रोपांवर सुद्धा हा रोग आढळतो. रोपांची पाने काळी पडून वाळतात. रोपे मरतात. पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण व सतत पडणारा पाऊस यांमुळे या रोगाचे प्रमाण वाढते.

उपाय : पुनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. खरिपातील कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. तसेच शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रति हेक्टर ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.

जांभळा करपा :

रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया पोराय (Alterneria porri).

हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत आढळतो.

लक्षणे ः पानावर सुरुवातीस लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. जांभळा करपा खरीप हंगामात रोपवाटिका, बीजोत्पादन व कांदा उत्पादन अशा सर्व पिकात होतो. रब्बी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असल्यास या रोगाची तीव्रता वाढते. रांगडा कांद्यावरसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

तपकिरी करपा :

रोगकारक बुरशी ः स्टेमफिलियम व्हेसिकॅरियम (Stemphylium vesicarium).

या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो.

लक्षणे ः पिवळसर, तपकिरी रंगांचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ

होऊन, वाकून मोडून पडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो.

उपाय :

पिकांची फेरपालट, बीजप्रकिया, रोपे लावताना कार्बेन्डाझिमच्या द्रावणाचा वापर करून या रोगाची तीव्रता कमी करता येते.

मूळकुज :

रोगकारक बुरशी ः फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम (Fusarium oxysporum).

खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये या रोगाची तीव्रता अधिक असते.

लक्षणे ः या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे जातो. नंतर पाने सुकून कुजतात. मुळे कुजतात व रोप सहज उपटून येते. मुळे काळसर तपकिरी रंगाची होतात. अधिक तापमान, अधिक आर्द्रता, पाण्याचा निचरा न होणे इत्यादी कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

उपाय : पिकाची फेरपालट करावी. जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात तापू द्यावी. थायरम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळून बी पेरावे. शेणखतासोबत ट्रायकोडर्मा व्हिरीडी एकरी ५ किलो या प्रमाणात मिसळावे.

वरील तिन्ही प्रकारच्या करपा रोग व मूळकुज नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे नियंत्रणाचे वेळापत्रक ठरविल्यास फायदा होतो.

(फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी)

पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी, मेटीराम २ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन २ ग्रॅम.

पुनर्लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी, ॲझोक्सिस्ट्रॉबीन अधिक डायफेनोकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.

पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी, हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.

पुनर्लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी, प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम.

फवारणी करताना चिकटद्रव्याचा वापर करणे आवश्यक आहे.

कांदा पिकावरील किडी

फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी) :

कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान करणारी प्रमुख कीड आहे.

ओळख ः फुलकिड्यांचा रंग पिवळसर तपकिरी, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे. किडीची जास्त संख्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत असते. पिले व प्रौढ कीटक पानाचा रस शोषतात. असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढुरके ठिपके पडत असल्याने त्याला ‘टाक्या’ या नावाने ओळखले जाते.

असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात व वळतात. रोपावस्थेत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास महत्त्वाची पाने वाळल्यामुळे कांदे पोसत नाहीत. कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात. कांदा साठवणीत टिकत नाही. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून काळा करपा या रोगांच्या बुरशीस सहज शिरकाव करता येतो. फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते.

उपाय : कांद्याची रोपे लावण्याच्या १५ दिवसांपूर्वी शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावल्यास कांदा पिकाच्या कडेने सजीव कुंपण तयार होते. रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर या द्रावणात २ तास बुडवून नंतरच लागवड करावी.

फवारणी प्रति लिटर पाणी

प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा फिप्रोनील १ मि.लि.

ही कीटकनाशके आलटून-पालटून फवारावीत.

चिकटद्रव्य मिसळून कमीत-कमी ४ ते ५ फवारण्या आवश्यक असतात.

कंद किंवा खोड कुरतडणारी अळी :

ओळख ः अळी साधारणपणे ३५ मि.मी. लांब आणि राखाडी रंगाची असते. या किडीच्या अळ्या कांद्याच्या जमिनीखालचा भाग कुरतडतात. रोप पिवळे दिसू लागते आणि सहजगत्या उपटून येते.

उपाय : पूर्वीच्या हंगामातील पिकाची धसकटे वेचून घ्यावीत. बटाटा पिकानंतर कांदा पीक घेऊ नये.

कार्बोफ्युरान (१० जी) एकरी ४ किलो या प्रमाणात लागवडीनंतर वाफ्यात घालावे. पिकाची फेरपालट करावी.

एकात्मिक पीक संरक्षण ः

१) हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. त्यामुळे दोन हंगामांमध्ये बराच काळ अंतर राखून रोगजंतूंचा किंवा किडींचा जीवनक्रम तोडता येईल.

२) रोपवाटिकेत व शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी हेक्टरी १.२५ किलो ५०० किलो शेणखतात १५ दिवस आधी मिसळून जमिनीत टाकावे.

३) प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी.

४) पिकाची फेरपालट करावी.

५) पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये.

६) रोपांची मुळे लागवडीपूर्वी दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.

७) रोपे नेहमी गादीवाफ्यांवर लावावीत.

८) फवारणी करताना कीडनाशक द्रावणात १ लिटर पाण्यात ०.६ मि.लि. चिकटद्रव्याचा उपयोग करावा.

९) फुलकिडे व रोग यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी.

१०) एकच कीडनाशक सारखे वापरू नये. सतत एकच कीडनाशकांचा वापर केल्यास किडींची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून वेगवेगळी कीडनाशके आलटून-पालटून वापरावीत.

११) पानांवरील रोग व कीड (करपाचे तिन्ही प्रकार आणि फुलकिडे, अळी) यांच्या नियंत्रणाकरिता :

फवारणी प्रति लिटर पाणी

(अ) पुनर्लागवडीच्या ३० दिवसांनंतर, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम

पुनर्लागवडीच्या ४५ दिवसांनंतर, ट्रायसायक्लॅझॉल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि.

पुनर्लागवडीच्या ६० दिवसांनंतर, हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि.

किंवा,

(ब) पुनर्लागवडीच्या ३० दिवसांनंतर, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम.

पुनर्लागवडीच्या ४५ दिवसांनंतर, प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक कार्बोसल्फान २ मि.लि.

पुनर्लागवडीच्या ६० दिवसांनंतर, कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि.

(क) पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी, मेटीराम २ ग्रॅम अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन २ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ मि.लि.

पुनर्लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी, ॲझोक्सिस्ट्रॉबीन अधिक डायफेनोकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.

पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी आणि ७० ते ७५ दिवसांनी, हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि.

०२१३५-२२२०२६,

डॉ. शैलेंद्र गाडगे, (वरिष्ठ शास्रज्ञ - कृषी विस्तार), ०९९२२४९०४८३

(भाकृअनुप – कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT