Tomato Pest : टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Tomato Fruit Borer : खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष झाल्यास टोमॅटो पिकाचे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
Pest on tomato and mango
Pest on tomato and mangoAgrowon
Published on
Updated on

डॉ. योगेश मात्रे, डॉ. अनंत लाड

Fruit Borer : खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष झाल्यास टोमॅटो पिकाचे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

फळ पोखरणारी अळीचे शास्त्रीय नाव : हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा (Helicoverpa armigera)
यजमान पिके : ही कीड बहुभक्षी कीड असून, १८१ पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका करते. टोमॅटो, मिरची, भेंडी, कोबीवर्गीय पिके,
घेवडा, वाल, वाटाणा इ. पिकामध्ये आढळते.

जीवनक्रम व ओळख :
या किडीचा पतंग फिकट पिवळसर रंगाचा असतो. प्रौढ मादी अंडी पानाच्या देठावर, तसेच कळ्या व फुलांवर एकेक या प्रमाणे ३०० ते ५०० अंडी देते. अंडी गोलाकार हिरवट पिवळी असतात. ५ ते ७ दिवसांनंतर या अंड्यातून अळी बाहेर पडते. अळीची पूर्ण वाढ होण्यास १४ ते १५ दिवसाचा कालावधी लागतो. अळीचा रंग हिरवट असून, तिच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ५० मिमी लांब असते. अळी जमिनीत झाडाच्या अवती भोवती वेष्टणात कोष अवस्थेत जाते. कोष अवस्था एक आठवड्यापासून ते महिनाभर असू शकते. एक पिढी २५ ते ५२ दिवसांत पूर्ण होते.

नुकसानीचा प्रकार :
अळी सुरुवातीला कोवळी पाने खाते. तसेच कोवळ्या वाढणाऱ्या फांद्या कुरतडून खाते. फळे लागल्यानंतर अळी फळांना छिद्र पाडून आत डोके खुपसून आतील भाग खाते. एक अळी ही २ ते ८ फळांचे नुकसान करू शकते. जवळपास ही कीड पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान करू शकते.

Pest on tomato and mango
Tomato Pests : टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

एकात्मिक नियंत्रण :
- कोळपणी, निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे.
- प्रादुर्भावग्रस्त फळे तोडून नष्ट करावीत. मोठ्या अळ्या हातानी वेचून नष्ट कराव्यात.
- पक्षांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रति एकरी थांबे उभारावेत.
- सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
- लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक १.५ लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात. परिणामी, फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होते.
- घाटे अळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही. (५०० एलई.) या विषाणूजन्य कीटकनाशकाची प्रति हेक्टरी फवारणी ५०० मिलि प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून करावी. त्यामध्ये ५०० मिलि. चिकट द्रव आणि नीळ २०० ग्रॅम मिसळावी.

प्रतिबंधात्मक फवारणी प्रति लिटर पाणी
- निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २ मि.लि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्का विद्राव्य पावडर) ६ ग्रॅम.
- बी.टी. जिवाणूजन्य कीटकनाशक २ ग्रॅम.

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास, रासायनिक कीटकनाशकाची उपचारात्मक फवारणी (प्रमाण - प्रति लिटर पाणी)

क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. किंवा
फ्लुबेंडायअमाइड (२० डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा
इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मि.लि. किंवा
नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) १.५ मि.लि. किंवा
क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा
सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा
डेल्टामेथ्रिन (११ ईसी) ०.२५ मि.लि.

टीप : कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे.

डॉ. योगेश मात्रे (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७,
डॉ. अनंत लाड (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com