माधव गाडगीळ
Indian Agriculture : समाजातील वेगवेगळ्या घटकांतील सुसंवाद, विश्वास, सहकार जर आपण केवळ एका खणातून उचलून दुसऱ्या खणांत भरत असू, आणि असे भरताना संपत्ती वाया जात असेल, तर अशा व्यवहारातून एकूण धनभांडारात घटच होईल. आज हेच चालू आहे. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीची लूट करून कृत्रिम उत्पादनांची संपत्ती वाढवली जात आहे आणि यातून समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत विसंवाद, संघर्ष निर्माण होऊन सामाजिक संपत्तीत घट होत आहे. या चौकटीत फिरस्त्या मेंढपाळीचा विचार करूया.
कृत्रिम उत्पादनांची संपत्ती
फिरस्ती मेंढपाळी हा अगदी कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारा आर्थिकदृष्ट्या अतिशय कार्यक्षम व्यवसाय आहे. या समाजाने धोका कमी करणारे व फायदा वाढवणारे नवे नवे तंत्रज्ञान भराभर आत्मसात केले आहे. जिथे कमी पावसाच्या प्रदेशात ते खूप प्रचलित आहे, त्या कर्नाटकातील जिल्ह्यांत हा व्यवसाय त्या प्रदेशाचे सुमारे ६० टक्के आर्थिक उत्पन्न पुरवतो.
नैसर्गिक संपत्ती
आज आपल्या अधिकाधिक तापणाऱ्या जगात कर्बाची साठवणूक वाढवणे व मिथेन सारख्या वायूंचे प्रमाण आटोक्यात ठेवणे या दोन महत्त्वपूर्ण आवश्यकता आहेत. संपूर्ण जीवनक्रमाचा विचार करता पशुपालनाच्या इतर पद्धतींपेक्षा फिरस्त्या पशुपालनात कर्बाच्या सर्वांत कमी पाऊलखुणा दिसतात. गोठ्यात दिल्या जाणाऱ्या खुराकाहून फिरस्त्या मेंढ्या वेगवेगळ्या वनस्पतींवर चरतात आणि त्यामुळे त्यांचे मिथेन उत्पादन बरेच कमी असते.
फिरस्त्या चराईतून महत्त्वाच्या परिसेवा पुरवल्या जातात. बारा तासांच्या अवधीत शेतात व इतर चराईच्या प्रदेशात भरपूर वाढलेली तण व इतर शाक वनस्पती यांचे अत्यंत उपयुक्त पोषक पदार्थांत रूपांतर केले जाते. एका दिवसात प्रत्येक मेंढीचे ०.३ लिटर दूध व दीड किलो लेंड्या असे उत्पादन असते. कर्नाटकातील तुम्कुरू व बेल्लारी या दोन जिल्ह्यांच्या प्रत्येकी १.३ कोटी मेंढ्या आहेत. यांच्यातील ८० टक्के फिरस्त्या मेंढपाळीत सहभागी असतात. म्हणजे दर वर्षी त्यांच्या मेंढ्या १.७ कोटी लेंडी खत निर्माण करतात. यांतून ८.८: १: ६.५ N:P:K म्हणजे बाजार भावाप्रमाणे हे ७२ कोटी रुपयांचे उत्पादन आहे. या खेरीज खूप मोलाचे सूक्ष्म जीव, पाचक रस, शाक वनस्पतींच्या बियांचा प्रसार इत्यादी परिसेवा पुरवल्या जातात.
मानवी संपत्ती
उदाहरणार्थ, ज्ञान, विज्ञान, आरोग्य, समाधानकारक काम - मेंढ्या दररोज २५ किलोमीटर चालल्यामुळे त्यांच्या मांसात अगदी कमी चरबी असते. गोठ्यातील मेंढ्यांच्या अधिक चरबी असलेल्या मांसापेक्षा हे जास्त आरोग्यवर्धक आहे, त्याला भावही जास्त मिळतो.
सामाजिक संपत्ती
म्हणजे समाजातील वेगवेगळ्या घटकांतील सुसंवाद, विश्वास, सहकार. शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात रात्रीच्या मुक्कामासाठी मुद्दाम बोलावतात व त्याच्या मोबदल्यात काही शिधा अथवा पैसे देतात. रात्रभरात मेंढ्यांच्या लेंड्यांमुळे शेताला उत्तम सेंद्रिय खताचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची रासायनिक खताची गरज कमी होते. या एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा पारंपरिक विकसित झालेल्या चालीरीतींमुळे समाजाच्या या दोन घटकांत विश्वासाचे, सहकाराचे नाते प्रस्थापित झालेले आहे.
फिरस्ते पशुपालन हा राष्ट्र - समाजहिताच्या दृष्टीने सर्वतोपरी हितकारक व्यवसाय आहे आणि त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. परंतु आपल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सुशिक्षित नागर समाजाच्या दृष्टीने हा सामान्य लोकांचा व्यवसाय टाकाऊ आहे. या सामान्य लोकांपासून पूर्णपणे दुरावलेल्या वर्गाला जंगल खाते हेच निसर्गाचे रक्षण करेल, असे वाटते, व फिरस्त्या पशुपालकासारख्या लोकांना छळून त्यांच्याकडून लाच उकळणे हा ज्यांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
असे जंगल खाते कायम त्यांच्या विरोधात कारवाया व प्रचार करण्यात मग्न असते. सेवाभावी संस्थासुद्धा त्यांना मदत करण्यासाठी सरसावत नाहीत. त्यांच्या समाजातील राजकारणी केवळ आरक्षण आरक्षण असा हाकाटा करत त्यांच्या नैसर्गिक संसाधनाबद्दलच्या महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. महाराष्ट्र शासन एक वेगळेच वायफळ नाटक करीत आहे. थोरल्या बाजीरावांच्या सेनेत फिरस्त्या पशुपालकांपैकी पुणे जिल्ह्यातले होळकर लढवय्ये सामील होते. त्यांच्या इंदूर संस्थानातील कुशल प्रशासक राणी अहिल्याबाई पशुपालकांचे आदरस्थान आहे. त्यांच्या नावाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे ठेवण्यात आलेले आहे.
परंतु आज आशेचे किरण दिसू लागले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्याला ७७ वर्षे झाली असूनही सामान्य लोकांपर्यंत शिक्षण अगदी मर्यादित प्रमाणात पोचले आहे. पण फिरस्त्या मेंढपाळांच्या समाजातूनही काही सुशिक्षित नेतृत्व आता पुढे येऊ लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात पावसाळ्यात मुक्काम करणाऱ्या मेंढपाळ तांड्यातील एक युवक सौरभ हटकर याला त्यांनी चंद्रपूरला शिकायला पाठवला आणि तिथे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी हस्तगत केली.
त्याने वनाधिकार कायद्यातील तरतुदी समजून घेऊन आपल्या समाजाचे प्रबोधन केले. २०१५ नंतर स्मार्टफोन परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध झाल्यामुळे ते ग्रामीण समाजातील लोकांपर्यंत पोहोचले आहेत. स्वतःच्या व्यापारी हितसंबंधांना पोसण्यासाठी स्मार्टफोनवर काही कंपन्यांनी देवनागरी लिपी वापरत मराठीत व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज महाराष्ट्रातील स्मार्टफोनवरील ८० टक्क्यांपर्यंत संवाद मराठीत चालतात. इंग्रजी भाषेचे मराठीत नेटके भाषांतर होण्याच्या सुविधा दिवसेंदिवस सुधारत आहेत. शिवाय गुगलवर वेगवेगळ्या ॲप्सद्वारे प्रचंड ज्ञानभांडार खोलले गेले आहे.
या सगळ्याचा फायदा घेत सौरभ हटकरने २०२२ मध्ये वेगवेगळ्या चळवळी सुरू केल्या. यातील पहिली म्हणजे टपाल सत्याग्रह. त्या साली गांधी जयंतीपासून मुख्यमंत्र्यांना वन विभागाची झोटिंगशाही थांबवा, अशी १०,००० पोस्ट कार्ड पाठवली गेली. त्याच वर्षी विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात ५००० मेंढपाळांचा मोर्चा काढला गेला. बहुधा याचाच परिणाम म्हणून यंदाच्या पशू गणतीत फिरस्त्या पशुपालकांच्या पशुधनाची गणती होणार आहे. आता मला आशा आहे की स्मार्टफोनवरच्या व्हॉट्सॲप व झूमसारख्या सुविधा वापरत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या लोकांचे परस्पर संवाद चालू राहतील व त्यांच्या बळावर लोकांच्या चळवळी अधिकाधिक बळकट होतील आणि आपल्या लोकशाहीला खराखुरा अर्थ निर्माण होईल.
(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.