Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीपालकांचे गाव

Sheep Rearing : कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या माडग्याळ (जि. सांगली) परिसरातील रहिवाशांना मेंढी संगोपनामुळे मोठा आधार मिळाला आहे. सहा सात दशकांपासून सुरू झालेल्या व्यवसायामुळे आज गावात ८८३ मेंढ्या आहेत.
Madgyal Sheep
Madgyal Sheep Agrowon
Published on
Updated on

Animal Care : सांगली जिल्ह्यातील जत तालुका आजही दुष्काळाशी लढतोय. याच तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले माडग्याळ गाव. तसे तुलनेने या मोठ्या गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या घरात. येथील बाजारपेठही मोठीच. तालुक्यातील अन्य गावांप्रमाणेच हा सारा दुष्काळी परिसर. येथील शेतकरी प्रामुख्याने पावसावर आधारित मटकी, हुलगा, बाजरी, तूर अशी पिके घेतात. जरी म्हैसाळचे पाणी काही भागात पोहोचले असले तरी तालुक्यात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष.

उष्ण तापमान, अवर्षणप्रवण आणि जिकडे पाहावे तिकडे पसरलेले बोडके माळरान. अलीकडे काही शेतकऱ्यांनी पाण्याची काहीबाही सोय करत द्राक्ष आणि डाळिंबाची लागवड केलेली दिसत असली तरी या भागातील बहुसंख्य शेतकरी दुसऱ्याच्या शेतात राबण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आणि भूमिहीनांचा मुख्य उद्योग म्हणजे पशुपालन. त्यातही मेंढीपालनावर प्रमुख भर. कारण येथल्या माळरानावर वाढणाऱ्या खुरट्या गवतांवर त्याच चांगल्या वाढू शकतात. माडग्याळी या नावानेच या भागातील मेंढ्याही ओळखल्या जातात.

Madgyal Sheep
माडग्याळ मेंढी संशोधन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत 

पिढीजात व्यवसाय...

केवळ शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने या परिसरात मेंढीपालन सुरू झाले.मेंढीपालन सुरू केले. गावातील बहुतांश शेतकरी आपल्या आजोबांच्या आधीपासूनच (सहा ते सात दशकांपासून) मेंढीपालन करतात. जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये खेडोपाडी, प्रत्येक वाडी वस्तीवर, तांड्यावर, घरासमोर माडग्याळी मेंढी पाहायला मिळते. हा स्थानिक मेंढी काटक असून, अवर्षणग्रस्त आणि प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची तिची क्षमता आहे. येथील माळरानावर खुरट्या झाडांची व गवताची कमी नसली तरी दुष्काळामध्ये मेंढ्यांच्या चराईसाठी दूरपर्यंत जावे लागते.

मेंढ्याच्या जिवावर शेती केली बागायती

रायाप्पा बंडगर, विठ्ठल बंडगर सांगतात की, गावातील बहुतांश शेतकरी माडग्याळी मेंढीचे पालन करतात. प्रत्येकाकडे एक खंडी ते दोन खंडी मेंढ्या (एक खंडी म्हणजे २० मेंढ्या). यातून गरजेनुसार त्याची विक्री करू करतो. परिसरातील शेतकरी पालनासाठी घरातूनच खरेदी करू लागले.

यातून सुमारे वर्षाकाठी दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न हाती येते. यातून कुटुंबाला जगवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशातून शेतीमध्ये, घरामध्ये सुधारणा करायची धडपड असते. पहिल्यांदा शेतीला पाण्यासाठी बोअर, विहीर घेऊन कोरडवाहू शेतीला थोडे का होईना पण पाणी पाजण्याची व्यवस्था केली जाते.

त्यातून पावसातील खंडामध्ये पिके जगवली जातात. थोडे पाणी अधिक असेल, रब्बीची पिके हाती लागतात. वर्षभर पाणी पुरण्याचा अंदाज असलेल्या असामी ऊस, द्राक्ष, डाळिंब अशा नगदी पिकाकडे वळतात. एकेकाळी कुसळं उगवणाऱ्या जमिनीमध्ये कोरडे वातावरण मानवणारी ही पिके डौलाने उभी दिसतात. त्यातून चलन सुरू झाल्यामुळे अनेकांची परिस्थिती सुधारली आहे.

Madgyal Sheep
Madgayal Sheep Rearing : मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढी

दिल्लीतील स्पर्धेत पहिल्या क्रमांकाने मिळाले नाव

१९९१-९२ ची गोष्ट. गावातील मेंढीपालन करणाऱ्या पांडुरंग निकम यांना दिल्ली येथे शासनाच्या वतीने भरवल्या जाणाऱ्या मेंढ्याच्या स्पर्धेची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. धाडस करत निकम हे एक मेंढी रेल्वेतून दिल्लीला घेऊन पोहोचले. त्या स्पर्धेमध्ये देशभरातून मेंढ्या आलेल्या होत्या.

त्या सर्व मेंढ्यातून निकम यांच्या मेंढीला पहिला क्रमांक मिळाला. ही देखणी मेंढी कोणत्या ठिकाणाहून आली, अशी मोठी चर्चा झाली. निकम यांनी माडग्याळवरून आली, असे सांगितले. त्यातून या मेंढीच्या जातीला ‘माडग्याळी मेंढी’ असे नाव मिळाल्याचे पांडुरंग निकम आणि गावकरी सांगतात. त्याच नावाने ती राज्यभर प्रसिद्ध झाली.

माडग्याळ गावचा बाजार ठरतो महत्त्वाचा

माडग्याळ येथे गेल्या साठ ते पासष्ट वर्षांहून अधिक काळ दर शुक्रवारी माडग्याळ येथे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. तो राज्यभरात प्रसिद्ध आहे. या बाजारात पंचक्रोशीतील माडग्याळी मेंढ्या विक्रीला येतात. खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकातील व्यापारी बाजारात येतात.

माडग्याळी मेंढी चांगल्या वजनाच्या असतातच. शिवाय त्यांचे मांसही चवीला चांगले असते. पर्यायाने बाजारात स्पर्धा वाढूनही दर चांगले मिळतात. कोकण, गोवा, कोल्हापूर, खेड व पुणे या भागातून माडग्याळी मेंढीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या भागातील व्यापारीही बाजारात दृष्टीस पडतात.

बाजारात खरेदीसाठी आलेले व्यापारी नेहमी मेंढपाळांच्या संपर्कात असतात. बाजारात येण्यापूर्वीच अनेकांना फोन जातात. आपल्याला साधारण किती मेंढ्या लागणार, याचा अंदाज दिला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा चांगला माल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होते.

Madgyal Sheep
Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीची नोंद कधी घेणार?
  • प्रामुख्याने मांसासाठी माडग्याळी मेंढीची खरेदी विक्री होते.

  • वजन वाढीसाठी मेंढीला दूध, पेंड, ज्वारी, असा खुराक दिला जातो.

  • साडेआठ हजार ते ६० हजारापर्यंत दर मिळतो.

  • मिरज, सांगली, विजापूर येथील व्यापाऱ्यांकडून नियमित खरेदी.

  • २०१९ पशुगणनेनुसार पंचक्रोशीतील

माडग्याळी मेंढी दृष्टिक्षेप गावाचे नाव. मेंढ्याची संख्या

  • माडग्याळ ८८३

  • व्हसपेड ६१२

  • असंगी ३२५

  • कुलाळवाडी २३६०

  • राजोबावाडी ४६६

  • गुड्डापूर ४०४

  • एकूण ५०५०

माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये

  • काटक, प्रतिकूल परिस्थितीत टिकण्याची क्षमता.

  • पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग.

  • फुगीर नाक. (पोपटाच्या चोचीसारखे)

  • लांब पाय, निमुळती व लांब मान.

  • अठरा महिन्यांतून दोनदा प्रजोत्पादन.

  • जुळ्या कोकरांना जन्म देण्याची क्षमता.

  • चार ते पाचव्या महिन्यांपासून कोकराची विक्री करता येते.

  • १५ किलोपासून ते ५० किलोपर्यंत वजन

गेल्या चाळीस वर्षांपासून माडग्याळी मेंढी सांभाळतोय. कोरडवाहू शेती असल्याने कुटुंबाला प्रगती मेंढ्यामुळे झाली आहे. मेंढ्या विक्रीतून एक -दोन एकर अशी शेती विकत घेत आज सहा एकर शेती केली आहे. तिला एक विहीर, एक बोअरवेलची जोड देत बागायती केली. धाडस करत दोन वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग लावली आहे.
- माळाप्पा नरसप्पा हाक्के, माडग्याळ, ता. जत
लहान मोठ्या धरून दोन खंडी मेंढ्या आहेत. लई अडचणीत मेंढ्या जपल्या आहेत. जपलेल्या मेंढ्यांना स्पर्धेतही नेतो. बक्षिसे मिळाली तर बाजारातही दर चांगला मिळतो. मेंढीपालनातून घरखर्च तर चांगला चालतोच, पण चार पैसे शिलकीला पडतात. या शिलकेतूनच दहा वर्षांपूर्वीच नवीन घर बांधलं. पूर्वी केवळ खरिपात पावसावर पिके घ्यायचो. पाच वर्षांपूर्वी थोडी जागा विकत घेत विहीर पाडली. पाइपलाइन केली. सुमारे १५ ते १७ लाखांचा रग्गड खर्च आला. पण डगमगलो नाही. दोन वर्षांपासून ऊस घेत आहे.
मारुती लक्ष्मण बंडगर, ९१५८४५९८३८, माडग्याळ, ता. जत
माडग्याळचा मेंढी-शेळीचा बाजार हा आमच्या हक्काचा आहे. तिथे अपेक्षेप्रमाणे दर मिळतात. पण बकरी ईद, रमजान ईद यांसारख्या सणाला मोठी मागणी असते. दरही वाढून मिळतो. आमच्या सारख्या दुष्काळी भागात या माडग्याळी मेंढ्याच्या जिवावरच घर चालतेय, असे म्हणायला हरकत नाही.
- रायाप्पा बाळाप्पा बंडगर, माडग्याळ, ता. जत
मेंढी पालन हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. माझ्याकडे वीस मेंढ्या आहेत. वर्षातून तीन मेंढ्याची विक्री करतो. त्यातून मिळणाऱ्या दीड ते दोन लाखांमध्ये कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागतो.
तानाजी कुलाळ, ९३०७२७८६६४ कुलाळवाडी, ता. जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com