New Delhi News : नवे लक्ष्य, नवे रस्ते, नवे विचार, नवी दृष्टी व नवा विश्वास मनात घेऊन विकसित व श्रेष्ठ भारताची निर्मिती करण्यासाठी नवे संसद भवन ऊर्जास्रोताची पूर्तता करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २८) व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे एका शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. त्या वेळी ते संबोधित करीत होते. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश व्यासपीठावर उपस्थित होते.
या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना, मनोज सिन्हा त्याचप्रमाणे या वेळी वायू, नाविक व लष्कर प्रमुखांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाची गरज, भविष्यातील भारताची वाटचाल व समृद्ध वारसा जपण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. जवळपास ४० मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले, की हा ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस लोकशाहीला मिळालेली एक भेट आहे.
त्यांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने होईल. देशातील १४० जनतेच्या स्वप्नांचे प्रतिबिंब या संसद भवनातून पाहायला मिळेल. गेल्या दीड दशकापासून नवे संसद भवन बांधण्यावर विचार सुरू होता. एका दृढ संकल्पातून ही वास्तू साकार झाली आहे. ही वास्तू आत्मनिर्भर भारताची साक्षीदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की आता आपण एका विशिष्ट टप्प्यावर आलो आहोत. शंभर वर्षांपूर्वी याच काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य लढा लढला. त्यातून अनेक देशांनी प्रेरणा घेतली. आज पुन्हा १०० वर्षांनी भारताकडे त्याच दृष्टीने जग पाहत आहे.
जागतिक लोकशाहीचा आधार भारत झाला आहे. भारताची राज्यघटना हा संकल्प आहे. त्याचे प्रतिनिधित्व या नव्या संसद भवनात होणार आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला चालत राहावे लागणार आहे. ही या अमृतकाळाची गरज आहे. यातूनच देशाची अनंत स्वप्ने साकार होणार आहेत. या भूमीत नवे प्राण फुंकण्याचे काम या संसद भवनातून होणार आहे.
गेल्या ९ वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही ऐतिहासिक वास्तू उभी राहिली, याचा आनंद मला आहेच, परंतु त्यापेक्षाही अधिक आनंद मला ४ कोटी लोकांना घरकुल दिल्याचा आहे. ११ कोटी घरांना शौचालय दिल्याचा आहे, ४ लाख रस्ते बांधण्याचा आनंद मला अधिक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
२५ वर्षांनी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हा एक समर्थ भारत निर्माण झालेला जगाला दिसणे आवश्यक आहे. यासाठी या आहुतीत सर्वांनी प्रयत्नांची समीधा टाकण्याची गरज आहे. यासाठी नवे संसद भवन हे एका सृजनाचा आधार होईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदेशाचे वाचन केले. यानंतर संसदेचे नवनिर्मिती भवन व सेंगोल या दोन लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या.
स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त डाक तिकीट व ७५ रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.