
unseasonal Rain अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे (Hailstorm) रब्बी हंगाम अडचणीत आला आहे. गहू, हरभरा (Chana) आणि मोहरी ही प्रमुख पिके ऐन काढणीला (Crop Harvesting) आलेली असताना निसर्गाने घात केला.
आधीच उष्णतेच्या लाटेमुळे या पिकांना फटका बसलेला होता. त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे या पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
येत्या आठवड्यात मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होईल आणि त्याचा परिणाम अन्न महागाई वाढण्यात होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे.
केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक गेल्या अनेक दिवसांपासून महागाईचा दर कमी करण्यासाठी आटापिटा करत आहेत.
सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने घालण्याचा, आयातीला मोकळे रान देण्याचा आणि सरकारी गोदामांतील माल खुल्या बाजारात विक्रीसाठी खुला करण्याचा सपाटा लावला होता. त्यातच यंदा गहू, हरभरा आणि मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
त्यामुळे महागाई कमी करण्यात यश येईल, असा विश्वास सरकारला वाटत होता. परंतु गेल्या काही दिवसांत निसर्गाचा रागरंग बदलल्यामुळे या मनसुब्यावर पाणी पडण्याची चिन्हे आहेत.
गहू उत्पादनात घट झाल्यास सरकारी गोदामांत गव्हाचा मोठा साठा करण्याच्या प्रयत्नांत अडथळा येणार आहे. तर मोहरीचे उत्पादन घटल्यास सरकारला पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवावी लागणार आहे.
पुढील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात गारपीट होईल तसेच प्रति तास ३० किमी वेगाने वादळी वारे वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
रब्बी पिकांना आधीच वाढत्या उष्णतेचा फटका बसला आहे. पुढील दोन-तीन आठवडे पाऊस आणि वादळी वारे राहिले तर उभे पीक जमिनीवर लोळण घेईल आणि काढणी करणे अवघड होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे केवळ उत्पादनात घट होणार नाही तर पिकांची गुणवत्ताही मार खाईल, असे एका ग्लोबल ट्रेडिंग हाऊसच्या मुंबईतील डिलरने सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.