Devendra fadanvis  Agrowon
ॲग्रो विशेष

Purandar Airport : नवीन विमानतळामुळे पुण्यात सगळ्यात मोठे एक्सपोर्ट मार्केट उभं राहील ; फडणवीस यांचे जगताप-शिवतारेंना एकत्र येण्याचे आवाहन

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेजुरी, ता. पुरंदर येथे आज झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पुण्याच्या नवीन विमानतळाच्या प्रश्नांसाठी काॅंग्रेस आमदार संजय जगताप आणि माजी आमदार विजय शिवतारे यांना एकत्र येण्याची आवाहन केले.

Team Agrowon

Shasan Aplya Dari Jejuri : पुण्याच्या नवीन प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील उद्योगाला आणि शेतीलाही फायदा होणार आहे. तसेच या परिसरात सर्वात मोठे एक्सपोर्ट मार्केट उभे राहू शकेल. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकिय अभिनिवेश न ठेवता आमदार संजय जगताप आणि माजी आमदार विजय शिवतारे यांना एकत्र यायला हवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ७) जेजुरी, ता. पुरंदर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, राहुल कुल, माजी आमदार विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण ३४९ कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील १०९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी फडणवीस म्हणाले, पुण्याच्या विकासासाठी नवीन विमानतळ होणे गरजेचे आहे. या विमानतळाशिवाय पुण्याचा विकास होऊ शकत नाही. माझी आपण हात जोडून विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन अडचणी सोडवल्या पाहिजे. मला निवडणूक लढवण्यासाठी पुरंदरला यायचे नाही. मी नागपूरमधूनच लढणार आहे. पण या नवीन विमानतळामुळे पुणे जिल्ह्याचे २० वर्षांचे कल्याण होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पातून पाण्याची मागणी वाढ आहे. मात्र, आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योगाला द्यावे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील काही वर्षांपासून राज्यात अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. पण सरकार गतिमान असून महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहे. या परिसरात उभे राहत असलेल्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी खंबीर आहे. विकासाची गंगा तुमच्या दारात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांनी साथ दिली पाहिजे.

अजित पवार म्हणाले, आपल्या भागाचा विकास व्हायचे असेल तर त्याग करायला हवा. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच नवीन  विमानतळाचे काम सुरू आहे. पण काही ठिकाणी त्यास विरोध होत आहे. आपल्याला समाजाचे भले करायचे आहे. विकास योजनांसाठी जमीन लागते. पण ती मर्यादीत आहेत. त्यावर आपण मार्ग काढला पाहिजे. विकास करत असताना ज्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा योग्य मोबदला दिला जाणार आहे, असा शब्द पवार यांनी दिला.


.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या  हस्ते नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा,  पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र,  विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड,  निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.  यावेळी  नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली. 

E Pik Pahani : खरीप २०२५ च्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत; शासन निर्णय जारी

Nagpur Winter Session: छावणीच्या थकित बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’

Nagzari Rehabilitation: नागझरीचे पुनर्वसन अडकले लालफितीत

Lift Irrigation Scheme: सांगोला तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत हरभरा जास्त, तर ज्वारीची पेरणी कमी

SCROLL FOR NEXT