Nashik News : ‘शासन आपल्या दारी’या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे जवळपास ८ मंत्री शनिवारी (ता. १५) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या कार्यक्रमात शेती, सिंचन, उद्योग, महिला सक्षमीकरण या विषयावर जोरदार भाषणे झाली.
सरकार सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांसोबत राहील, अशी गर्जना झाली. मात्र जिल्ह्यात आजवर झालेल्या घोषणांबाबत मौन दिसून आले. त्यामुळे सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा जोरात; मदतीची कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यांनी राजकीय भूमिका मांडून विरोधकांचा शासकीय कार्यक्रमात समाचार घेण्यात धन्यता मानली; परंतु त्यांनीच केलेल्या घोषणेचा त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. लेट खरीप कांद्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र आता खरीप हंगाम सुरू होऊनही ते मिळालेले नाही.
एप्रिलमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री अयोध्येचा दौरा आटोपून तातडीने जिल्हा दौऱ्यावर आले. त्या वेळी पाहणीदरम्यान सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ दिवसांतच आपल्याला मदत मिळेल, असे आश्वस्त केले होते. मात्र याही घोषणेला तीन महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दिलेला शब्द सरकार पाळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिवसा बारा तास वीज व सिंचन सुविधा बळकटीकरणाची घोषणा केली. शेतीविकासासाठी मूल्यवर्धनाला चालना देण्याचे अधोरेखित केले. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनीही जिल्हा बँकेच्या मुद्द्याला हात घालत आर्थिक नाडी सुरळीत करण्याचा शब्द दिला.
गरज पडल्यास पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन प्रश्न सोडवणार असेही जाहीर केले. गेल्या दीड महिन्यापासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकार शब्द पाळणार का, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
फक्त घोषणा असतात. फोटोसेशन होते. सामान्य जनता, शेतकरी व शासन यांच्यामध्ये खूप मोठी दरी.
लोकांना बस करून ओढून ताणून आणले; शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले.
अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे सरकारवर आता विश्वास उरला नाही.
‘शासन आपल्या दारी’ नाहीतर शेतकरी सरकारच्या दारातच उभा
शासन फक्त घोषणाबाजीपुरते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.