Chatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२५’ या कृषी प्रदर्शनात गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांची गर्दी अखंडपणे सुरूच राहिली. सोमवारी (ता. १३) शेवटच्या दिवशीही ही गर्दी कायम राहिली. अखंडित वीजपुरवठा व्हावा, बदलते वातावरण तसेच नैसर्गिक आपत्तीवर उपाय शोधले पाहिजेत, अशी मते प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’ जवळ व्यक्त केली.
बदलत्या वातावरणाचा फटका
शेती उत्पादनाला सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका बसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. लोकसंख्या वाढूनही शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, यासाठी शासनाचे धोरण जबाबदार आहे. यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. शेती करणारा यापुढे शिक्षित असला पाहिजे. रात्रीची वीज अतिशय गैरसोयीची आहे. पुरेशा दाबाने आणि दिवसा मिळायला हवी.
- डॉ. एन. आर. शेडगे, डासला, पिरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना
शासनाने उपाय द्यावा
शेतीचा व्यवसाय नुकसानीचा व्यवसाय झाला आहे. शेतीतून शाश्वत उत्पादनाची हमी नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक संकटांवर मात करून पिकविलेल्या शेतीमालाला भाव मिळत नाही. अनेकवेळा उत्पादन खर्चही निघत नाही. पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली शेती कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळामुळे संपून जाते, यावर उपाय शोधण्याची शासनाकडून अपेक्षा आहे.
- विष्णू सुखदेव जावळे, आडगाव, जावळे, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
पीक नुकसानीची भरपाई मिळावी
आमच्या भागात डोंगर असल्यामुळे शेतीला सिंचनाचे पाणी मिळत नाही. परिणामी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गाव डोंगरात असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षी तुरीमध्ये पेरलेले भुईमूग पीक रानडुकरांनी पूर्णपणे फस्त केले. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजना करून शेतकऱ्यांना तत्काळ साहाय्य करावे तरच शेतकरी जगेल.
- नामदेव यशवंतराव पगारे, आडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर
उत्पादनवाढीचे तंत्र द्यावे
शेतीसाठी पाणंद रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. रस्त्याअभावी शेतीकडे जाणे-येणे, शेतीमालांची वाहतूक करण्याचे काम खूप कठीण होते. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून शेती पिकामध्ये नवीन पीक पद्धतीचा अवलंब केला, तर उत्पादनात भर पडेल, यासाठी शासनाने नवीन वाहन विकसित करण्याची गरज आहे. तेच ते पीक घेण्यामुळे जमिनीचा पोतही खराब होत आहे. यासोबतच पारंपरिक देशी पिकाच्या वाणांना शासनाने प्रोत्साहन देऊन त्यात उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान शोधण्याची गरज आहे.
- नरेंद्र दिलीपराव देशमुख, नांदूर, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर
पाझर तलावाचे काम चांगले हवे
पाझर तलावाच्या निकृष्ट कामामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे शेती सिंचनासाठी उपयोग होत नाही. विहीर तसेच कूपनलिका घेतली, तर जलस्रोत कोरडे असल्याने त्याचा काही उपयोग होत नाही. पाण्याचा उपयोग होत नाही. शासनाने पाझर तलावाच्या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सुरेश रावसाहेब साबळे, गेवराई, आगलावे, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.