डॉ. किरण मालशे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे
Coconut Products : दरवर्षी २ सप्टेंबर हा ‘जागतिक नारळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळ पिकाविषयी जागरूकता निर्माण करून त्याच्या लागवडीस प्रोत्साहन देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
देशामध्ये सुमारे २१.९९ लाख हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीखाली आहे. त्यातून सुमारे २०,७३१ लाख एवढे नारळ उत्पादन मिळते. त्यापैकी राज्यामधून २२.३६ लाख इतके नारळ उत्पादन मिळते. राज्यात सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारळ उत्पादन घेतले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये (जि. रत्नागिरी) हे केंद्र या नारळ पिकामध्ये विशेष संशोधन करत आहे.
दरवर्षी २ सप्टेंबर हा ‘जागतिक नारळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक मंगलप्रसंगी ‘श्रीफळ’ म्हणजेच नारळाला विशेष मान असतो. नारळापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ, काथ्या निर्मिती अशी विविध उत्पादने तयार केली जातात. नारळाचा प्रत्येक भागाचा वापर करता येतो. त्यामुळे बाजारात नारळ आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. नारळाचे घरगुती स्तरावर मूल्यवर्धन वाढविण्यासाठी व्हर्जीन कोकोनट ऑईल (नारळ तेल काढणे) निर्मितीचे तंत्र प्रमाणित करण्यात आले आहे. नारळ लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तसेच नारळ विकास मंडळ, कोची यांच्या विविध योजना आहेत. यामुळे नारळाचे क्षेत्र विस्तार, खत व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन, सूक्ष्मसिंचन, सेंद्रीय शेती, मूल्यवर्धन यासाठी चालना मिळत आहे.
संशोधनातून तंत्रज्ञान प्रसार ः
भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राने अधिक उत्पादन देणारी नारळाची ‘प्रताप’ ही जात विकसित केली आहे. लागवडीसाठी लक्षद्विप ऑर्डीनरी, फिलीपाईन्स ऑर्डीनरी या जातींसह टी x डी आणि डी x टी या संकरित जातींची देखील शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे नारळ उत्पादकांना स्थानिक जातीपेक्षा या जातींपासून प्रति माड ४० ते ५० नारळांचे अधिक उत्पादन मिळत आहे.
खत अन् सिंच व्यवस्थापन महत्त्वाचे..
नारळ लागवडीमध्ये शिफारशीप्रमाणे काटेकोर अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास उत्पादनात ४ ते ५ पट वाढ मिळू शकते. हे विविध प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर योग्य करून (पाणी, जमीन व सूर्यप्रकाश) नारळाचे प्रति हेक्टर उत्पादन दुप्पट ते तिप्पट करता येते.
खत व्यवस्थापनासोबत उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
आंतरपीक पद्धती ः
नारळ बागेत विविध आंतरपिकांची लागवड देखील करता येते. योग्य आंतरपीक पद्धतीची निवड केल्यास अधिक आर्थिक फायदा होण्यास मदत होते. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नारळ बागेत भाजीपाला, फळपिके, मसाला पिके, औषधी वनस्पती, फुलझाडे इत्यादींची आंतरपिके व मिश्रपिके म्हणून लागवड करता येते.
पीक संरक्षण ः
नारळावर प्रामुख्याने गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, काळ्या डोक्याची अळी, चक्राकार पांढरी माशी आणि कोंब कुज रोग इत्यादी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यांच्या नियंत्रणासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विविध शिफारशी केल्या आहेत. सध्या नारळ लागवडीमध्ये ईरिओफाईड माईट या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी ही संशोधन हाती घेण्यात आले आहे.
नारळ लागवडीची पंचसूत्री ः
- योग्य जातीची निवड
- योग्य अंतरावर नारळ लागवड
- अन्नद्रव्ये व्यवस्थापन
- योग्य आंतरपिकांची निवड
- वेळेवर कीड-रोग व्यवस्थापन.
नारळ दिनाचा मुख्य उद्देश ः
येत्या काळात नारळ उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी नारळ उत्पादक शेतकऱ्यांनी नारळ लागवडीसाठी पंचसुत्रीचा वापर करून नारळ उत्पादनात सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे
- नारळ उत्पादकता वाढविणे.
- नारळ पिकाचा क्षेत्र विस्तार करणे.
- उत्पादन खर्च कमी करणे
- नारळावर आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे.
- सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे.
- नारळापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती अन् त्यांचा वापरास प्रोत्साहन देणे.
- नारळ शेतीमध्ये उद्यमशीलता विकसित करणे.
आदी उद्देश साध्य करणे शक्य होईल.
- डॉ. किरण मालशे, ९४०५८५६०५६
(डॉ. मालशे हे कृषिविद्यावेत्ता, डॉ. घवाळे हे संशोधन अधिकारी तर
डॉ. वानखेडे हे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ म्हणून प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.