संग्राम चव्हाण, विक्रम गावडे, अमृत मोरडे
Baramati Project: भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती आणि नाबार्ड, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने बारामती तालुक्यातील सहा कोरडवाहू गावांच्यामध्ये हवामान सहिष्णू चारा बँक प्रणाली हा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत, कमी सिंचन क्षेत्र, अनियमित पर्जन्यमान, नापीक किंवा पडीक जमीन यांचा प्रभावी वापर करून, शेती बांध, तळ्याचे काठ आणि पडीक जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यात येत आहे. यामध्ये मेथी घास, दशरथ, मारवेल, अंजन, या चारा पिकांबरोबर सुबाभूळ, हादगा या चारा वृक्ष प्रजातींची लागवड करून वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.
बहुस्तरीय चारा पीक पद्धती
(सुबाभूळ + दशरथ + अंजन + हादगा)
ही एक सघन बहुस्तरीय चारा उत्पादन पीक पद्धती आहे. दुष्काळास सहन करणाऱ्या चाऱ्यांच्या प्रजातींची लागवड करून वर्षभर हिरव्या व पोषणयुक्त चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करता येते.
या पीक पद्धतीमध्ये सुबाभूळ, दशरथ, अंजन आणि हादगा या चारा प्रजातींचा समावेश आहे. हे दहा गुंठे क्षेत्रासाठी बनवले आहे.
लागवड तंत्र
ही बहुस्तरीय चारा लागवड पद्धत प्रामुख्याने शेळीपालनासाठी उपयुक्त आहे, कारण शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या चाऱ्यांची गरज असते. जून ते ऑगस्ट या महिन्यांत पिकांची लागवड करावी.
सुबाभूळ
लागवड १० x ७ फूट अंतरावर उत्तर-दक्षिण दिशेने करावी. थेट बी पेरणी किंवा रूट ट्रेनर / पॉलिबॅगमध्ये तयार केलेल्या रोपांद्वारे लागवड करता येते. बियाणे लागवडीपूर्वी ६० अंश सेल्सिअस गरम पाण्यात
१ ते २ तास भिजवावे. त्यानंतर थंड पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे. दहा गुंठे क्षेत्रात ११० रोपे लावता येतात.
दशरथ
बियाणे लागवडीपूर्वी उगवण क्षमता वाढवण्यासाठी ८० अंश सेल्सिअस गरम पाण्यात ५ मिनिटे बुडवून नंतर थंड पाण्यात रात्रभर भिजवावे. जून ते ऑगस्ट दरम्यान लागवड करावी. सिंचनाच्या सुविधेनुसार डिसेंबरपर्यंत लागवड शक्य आहे. ५०० चौ.मी. क्षेत्रासाठी सुमारे ७०० ते १००० ग्रॅम बियाणे वापरावे. दशरथ बियाणे सुबाभळीच्या दोन रांगांमध्ये आंतरपीक म्हणून ६० x ४५ सेंमी अंतरावर पेरावे.
अंजन
५०० चौ.मी. क्षेत्रातील पेरणीसाठी ६०० ते ८०० ग्रॅम बियाणे लागते. बियाणे पेरताना ते बारीक वाळूसोबत १:४ किंवा १:५ प्रमाणात मिसळावे. (६०० ग्रॅम बियाण्यासाठी २.५ ते ३ किलो वाळू)यामुळे बियाणे एकसारखे पेरता येते.
हलक्या पावसात ६ ते ७ आठवड्यांची रोपे ४५ ते ६० x ४५ ते ६० सेंमी किंवा ५० x ३० सेंमी अंतरावर लावावीत. ५०० चौ.मी. साठी १५०० ते १८०० रोपे लागतात. ४० दिवसांनी कमी उगवण असलेल्या ठिकाणी नवीन रोपे लावावीत. याशिवाय, रूट ट्रेनर किंवा पॉलिबॅगमधील ४५ दिवसांची रोपे वापरता येतात.
पावसाळ्यात २ ते ३ अंकुर असलेली परिपक्व खोडकाडी देखील आयबीए (५०० पीपीएम) द्रावणात बुडवून वापरता येते.
हादगा
या पीक पद्धतीच्या चहूबाजूंनी ७ ते १० फूट अंतरावर हादगा लागवड करावी, यासाठी सुमारे ४५ ते ५० रोपे लागतात. बियाणे लावण्यापूर्वी १२ तास थंड पाण्यात भिजवावे. बी २ ते ३ सेंमी खोलीवर पेरता येते किंवा ४५ ते ६० दिवसांची पॉलिबॅगमध्ये रोपे तयार करून खड्ड्यांत लावावीत.
खत, पाणी व्यवस्थापन
मे महिन्यात लागवडीपूर्वी २ टन शेणखत मिसळावे. लागवडीच्या वेळी १० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि १० किलो पालाशची मात्रा द्यावी. नत्र दोन हप्त्यांत द्यावे. एक हप्ता लागवडीच्या वेळी आणि दुसरा तीन महिन्यांनी द्यावा. लागवड जून महिन्याच्या मध्यापासून ते जुलै अखेरपर्यंत करावी.
पावसाळ्यात केवळ आवश्यकतेनुसार सिंचन द्यावे, हिवाळ्यात दर पंधरा दिवसांनी आणि उन्हाळ्यात दर ७ ते १० दिवसांनी सिंचन करावे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार महिन्यातून एकदा तरी सिंचन द्यावे. सिंचनासाठी रेन पाइप किंवा ठिबक सिंचन वापरावे. कापणीनंतर पिकाला पाणी द्यावे. थोड्याशा प्रमाणात युरिया (५ किलो) आणि सिंगल सुपर फॉस्फेट (१० किलो) द्यावे. जेणेकरून पिकाची पुन्हा लवकर वाढ होते.
देखभाल
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी आणि नंतर ८० ते ९० दिवसांनी खुरपणी करावी; आवश्यकतेनुसार तणनियंत्रण करावे. कापणी करताना धारदार अवजार वापरावे, जेणेकरून खोड चिंबण्याचा धोका टाळता येईल. कापलेल्या भागावर बुरशीनाशक लावावे.
कापणी
अंजन आणि दशरथ पिकाची पहिली कापणी लागवडीनंतर सुमारे ७० ते ८० दिवसांनी फुलोऱ्यात येण्याच्या आधी करावी. धारदार विळ्याने जमिनीपासून ७ ते १० सें.मी. उंचीवर कापणी करावी. त्यानंतर प्रत्येक ५० ते ६० दिवसांनी नियमित कापणी करावी.
सुबाभूळ आणि हादगा या चारा वृक्षांची लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी जमिनीपासून ७५ते १०० सेंमी उंचीवर पहिली शेंडा कापणी करावी. अतिशय थंडीमध्ये हदग्याची कापणी करू नये कारण पुन्हा फुटवा कमी निघतो. पुढे दर ६० दिवसांनी सीकेटरने फांद्या कापाव्यात. मर्यादित सिंचनामध्ये वर्षातून ३ ते ४ कापण्या शक्य होतात. ठिबक सिंचनाचा योग्य वापर केल्यास ६ ते ७ कापण्या मिळू शकतात.
उत्पादन
सुबाभळीपासून पहिल्या वर्षी प्रत्येकी २ ते ३
किलो हिरवा चारा मिळतो प्रती कापणी, आणि पुढील वर्षांत उत्पादन वाढते. हदग्याच्या प्रत्येक झाडापासून २ ते ३ किलो चारा मिळतो. दहा
गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये सुबाभळीपासून दरवर्षी १ ते १.५ टन आणि हदग्यापासून ३०० ते ४०० किलो चारा मिळतो. अंजन गवताचे ३ टन उत्पादन मिळते. दशरथ पिकाचे ५०० चौ.मी. क्षेत्रातून सुमारे ४ टन चारा उत्पादन मिळते. एकत्रितपणे दरवर्षी ८ ते ८.५ टन हिरवा चारा मिळतो.
दुष्काळी परिस्थितीत योग्य व्यवस्थापन केल्यास किमान ५० टक्के उत्पादन मिळू शकते. ही पीक
पद्धती ४ ते ५ वर्षे टिकते. पाणी, खते व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा उपलब्ध होतो.
अर्थशास्त्र
दहा गुंठे क्षेत्रावरील बहुस्तरीय चारा पद्धतीसाठी पहिल्या वर्षीचा एकूण खर्च सुमारे २१,५९४ इतका येतो. यामध्ये नांगरणी, बियाणे, शेणखत, रासायनिक खत, ठिबक सिंचन व्यवस्था, मजुरी आणि इतर किरकोळ खर्च समाविष्ट आहेत.
शेतकऱ्यांना वर्षभरात सुमारे ८.९ टन हिरवा चारा मिळतो. बाजारभाव ४ प्रति किलो गृहीत धरल्यास एकूण उत्पन्न ३५,६०० होऊ शकते. यामधून सुमारे १४,००६ निव्वळ नफा मिळतो. लाभ-खर्च गुणोत्तर १.६५ असून, हे मॉडेल शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
- संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती,जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.