यशवंत जगदाळे
Vegetable Production : कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी पिकांच्या वेलींना योग्य आधार मिळाला, तर त्यांची चांगली वाढ होते. दर्जेदार उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार द्यावा. आच्छादनामुळे पाणी देण्याचा कालावधी १० ते १५ दिवसांपर्यंत वाढविता येतो.
सध्या तापमानाचा पारा वाढत आहे, त्याचबरोबरीने उन्हाळी हंगामासाठी दुधी भोपळा, काकडी, कलिंगड, ढोबळी मिरची, खरबूज, कारली, दोडका, कांदा, भेंडी, गवार, मिरची आणि टोमॅटो इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे. तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास भाजीपाला पिकांची फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन
कमी पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांची निवड करावी.
पीक फेरपालट करून जमिनीतील आर्द्रता टिकवावी, सुपीकता वाढवावी.
पाणी देण्याचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, पिकाची वाढ, वाणाचा प्रकार यांचा विचार करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
कमी पाणी असलेल्या भागात आच्छादनाचा वापर करावा.
वाणाची निवड
उष्णता आणि कोरड्या हवामानाला सहन करणारी वाण निवडावेत.
अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणाऱ्या वाणाची लागवड करावी. स्थानिक बाजारात चांगला दर मिळणाऱ्या वाणांची निवड करावी.
कमी पाण्यात तग धरणारी वाण निवडावीत.
जलद वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.
खत व्यवस्थापन
पिकांसाठी खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, कारण उन्हाळ्यात उच्च तापमान व कमी आर्द्रता यामुळे पिकांची वाढ मर्यादित होऊ शकते. योग्य खत नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार खतांच्या मात्रा ठरवाव्यात. पिकांना शिफारशीनुसार पीकनिहाय खतांच्या मात्रा द्याव्यात. नत्र, स्फुरद, पालाश यांचे संतुलित प्रमाण आवश्यक आहे.
झिंक, मॅंगेनीज, लोह, बोरॉन यांची कमतरता टाळण्यासाठी फवारणी किंवा ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे गरजेचे असते.
संतुलित खतांचा वापर करून झाडांची प्रतिकारशक्ती वाढवावी.
आच्छादनाचा वापर
उन्हाळ्यात जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. आच्छादनामुळे माती थंड राहते
आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, ज्यामुळे
पिकांना पुरेसा ओलावा मिळतो.
आच्छादन केल्याने सूर्यप्रकाश थेट मातीवर पडत नाही, त्यामुळे तणांची वाढ मर्यादित राहते. तण कमी असल्याने पिकांना अन्नद्रव्ये आणि पाणी अधिक प्रमाणात मिळते.
सेंद्रिय आच्छादन (उदा. गवत, पालापाचोळा,
ऊस पाचट) हळूहळू कुजते, जमिनीत सेंद्रिय
पदार्थ मिसळले जातात. मातीची सुपीकता वाढते,
पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
प्लॅस्टिक आच्छादनाची जाडी साधारणतः
३० मायक्रॉन असते किंवा मल्चिंग पेपर
(जाडी १००० मि.मी) चंदेरी, लाल, पांढरा, हिरव्या रंगाची निवड करावी. आच्छादनामुळे पाणी देण्याचा कालावधी १० ते १५ दिवसापर्यंत वाढविता येतो, पाण्याची बचत होते.
फॅब्रिक कव्हर, पॉलिस्टर कापड
फॅब्रिक कव्हर, पॉलिस्टर कापडाचा (८० जीएसएम) रंग पांढरा असतो. याच्या वापरामुळे २० टक्क्यांपर्यंत पीक उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादनात २२ टक्क्यांपर्यंत वाढ होते. भाजीपालावर्गीय पिकांवर विषाणू रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. हे वापरण्यास सोपे व उत्पादनास फायदेशीर आहे. पिकांच्या वाढीकरिता सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. पिकांचे तीव्र उन्हापासून संरक्षण होते.
कलमी भाजीपाला रोपांची लागवड
वांगी, टोमॅटो, मिरची, कलिंगड व खरबूज या पिकांच्या कलमी रोपांची लागवड करावी. ही रोपे रोग प्रतिकारक्षम असतात.
रोप मातीतून येणाऱ्या सूत्रकृमींना बळी पडत नाही.
जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते.
पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होत असल्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.
भाजीपाला पिकासाठी खतांची मात्रा व पाणी कमी लागते.
फळांचा आकार, उत्पादन ३०-३५ टक्के वाढते, गुणवत्ता सुधारते.
उत्पादन देण्याचा कालावधी कमीतकमी ३५ दिवस आणि जास्तीत जास्त ६० दिवसापर्यंत वाढतो.
- यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७
(प्रकल्प प्रमुख, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.