Vegetable Market : भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध खिर्डी

Khirdi Vegetable Market : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी गाव भाजीपाला पिकांत प्रसिध्दीस आलं आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता थेट विक्रीवर इथल्या शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी गाव भाजीपाला पिकांत प्रसिध्दीस आलं आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता थेट विक्रीवर इथल्या शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जलसंधारण, ठिबक, सिंचन, उत्पादनक्षम शेतीचे बांध, बीजोत्पादन व पूरक व्यवसायांच्या माध्यमातून खिर्डीच्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत विस्तारले आहेत.

भाजीपाला म्हटलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी (ता. खुलताबाद) गावाचं नाव पुढे येतं. सुमारे अडीच ते तीन हजारांपर्यंत गावची लोकसंख्या तर क्षेत्र ७६१ हेक्‍टरच्या आसपास आहे. गावाला तीन बाजूंनी डोंगर आहे. सुमारे ७०० च्या आसपास विहिरी तर १०० हून अधिक शेततळी आहेत.

गावाच्या शिवारात पूर्वी खरीप व रब्बी हंगामातील पिकं असायची. अलीकडील वर्षात गावकऱ्यांनी सुधारित शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखलं. जलयुक्‍त शिवार अभियान, पाणी फाउंडेशन, सकाळ रिलिफ फंड आदींच्या माध्यमातून नाला खोली- रुंदीकरण, डीप सीसीटी , माती नाला व सिमेंट बांध आदी कामे झाली. त्यातून जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढली.

हंगामी टिकणारे शिवारातील पाणी अधिक काळ टिकू लागलं. आज कपाशी, मक्याखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याजागी कांदा, टोमॅटो, पालेभाज्या, मिरची, वांगे, बीटरूट, काकडी, मुळा, गाजर, वाल, बटाटा आदी आदी भाजीपाला पिकांनी गावाचे ७० टक्‍के शिवार व्यापले आहे. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी शेतकरी त्यात पॉली मल्चिंगचा वापर करतात.

सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, उन्हाळ्यात कलिंगड, मोसंबी, सीताफळ, आंबा, सागामध्ये सीताफळ आंतरपीक, साग, चिंच आदी विविधताही गावात आढळते. खासगी व सरकारी कंपन्यांसोबत कांदा व सोयाबीनचे बीजोत्पादन शेतकरी करतात. यातील कांदा पिकात सुमारे १५ तर सोयाबीन बीजोत्पादनात सहभागी शेतकऱ्यांची संख्या दोनशेपर्यंत आहे.

Vegetable Market
Mumbai Vegetable Market : पावसामुळे भाजीपाला मार्केटवर थेट परिणाम, तब्बल ९० हजार पालेभाज्या जुड्या फेकल्या

शेतकरी करताहेत थेट विक्री

छत्रपती संभाजीनगरमधील जाधववाडीसह परिसरातील गावांतील आठवडी बाजारांत खिर्डी गावचे सुमारे दीडशे शेतकरी थेट विक्री करतात. एकट्या संत सावता गटातील ४० शेतकरी त्यात क्रियाशील आहेत. गटातील ज्येष्ठ शेतकरी दत्तू धोतरे यांच्याकडून थेट विक्रीची प्रेरणा अन्य शेतकऱ्यांना मिळाली आहे.

या पद्धतीतून बाजारातील दरांपेक्षा २० ते २५ टक्‍के दर जास्त मिळून या शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत झाले आहे. बाजारपेठ व ग्राहकांच्या मागणीचा सविस्तर अभ्यास तसेच गटातील एकमेकांशी चर्चा यातून कोणता भाजीपाला किती क्षेत्रावर घ्यावा याचा अंदाज त्यांना आला आहे. दिल्ली आणि भोपाळ येथील बाजारपेठांमध्ये आपला टोमॅटो पाठविण्याचे काम येथील शेतकरी करताहेत. या प्रयत्नामुळे त्यांच्या टोमॅटोला चांगला दरही मिळत आहे.

Vegetable Market
Vegetable Market : नुकसानीमुळे भाजीपाला आवक घटली

गावात शेळी-मेंढीपालन आणि दुग्धव्यवसायही केला जातो. दहा ते १२ शेतकऱ्यांकडे दहा ते १५ पेक्षा अधिक गायी, म्हशी, दोन-चार शेळ्या आहेत. गावात एकूण हजारांपेक्षा अधिक पशुधन असावे. दुधाची विक्री तसेच शेणखताचा शेतात वापर होतो.
...................................................................
खिर्डी गावची प्रगती (ठळक बाबी)

-संत गाडगे बाबा ग्राम स्वच्‌छता अभियानात तालुक्‍यात तसेच सुंदर
ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक.
-पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ गावातील संत सावता गट तालुक्‍यात प्रथम.
-नैसर्गिक शेती प्रकल्पात १२५ शेतकऱ्यांचा यंदा सहभाग
-ग्रामस्थांच्या योगदानातून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण.
-दोन ते तीन किलोमीटर नाल्याचे खोलीकरण
-८ ते १० शेतकऱ्यांकडे कांदा चाळ
-बटाट्याचे क्षेत्र वाढते आहे झपाट्याने.
-गावात दोन ‘क्लिनिंग- ग्रेडिंग’ केंद्रे, तीन अवजारे बॅक, तीन शेतकरी उत्पादक कंपन्या. शेतमाल खरेदी केंद्र, दूध संकलन केंद्र.

संपूर्ण गावाच्या सहभागातून जलसंधारणाची काम यशस्वी झाली. पाण्याचा ताळेबंद मांडला. त्यानुसार हळूहळू पीक पद्धती बदलली. तीन पाणंद रस्ते लोकसहभागातून मोकळे केले. साडेतीन लाख रुपये स्व खर्चातून एक रस्ता तयार केला. गावची आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न आहे. ग्रामसभेतील निर्णय एकविचाराने घेतो व त्यानुसार अंमलबजावणी करतो.

ज्ञानेश्वर मातकर- ९८२२७१५९७१
(सरपंच)

बारामती कृषी विज्ञान केंद्रात (जि. पुणे) येथे फूलशेतीचे प्रशिक्षण घेतले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून पॉलिहाऊस उभारत जरबेराची लागवड केली आहे. आठ महिन्यांपासून त्यातून उत्पादन सुरू झाले आहे.
विजय कमलाकर वरकड,९८८१०३०४८८

गटाने शेती करण्याचे फायदे खिर्डी गावच्या ग्रामस्थांनी ओळखले. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार गावात वाढला आहे. कृषी विभागाच्या योजना मदतीला आहेतच.
सोनाली भानुदास पाटील- ९३२५१५२८११
(कृषी सहाय्यक, खिर्डी)

साधारण दोन एकरांत भाजीपाला घेतो. छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात व प्रसंगी व्यापाऱ्यांना विक्री करतो. थेट विक्रीतून २० ते २५ टक्‍के अधिकची मिळकत होते.
कृष्णा कचरू गोरे- ९८६०९७०६३७

दीड एकर शेतीला मी दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. चारावर्गीय पिकेही घेतली आहेत.
सुमारे १८ म्हशी व दोन गायींचा सांभाळ करतो. बजाजनगर भागात दुधाचे रतीब सुरू केले
आहे. ८० पेक्षा अधिक ग्राहक अनेक वर्षांपासून जोडले आहेत.
फकीरचंद दवंडे

कंपन्यांसाठी कराराने कांदा बीजोत्पादन कराराने करणारे गावात अनेक शेतकरी आहेत. त्यातून उत्पादन व उत्पनात हमी मिळते. मी दहा वर्षापासून या शेतीत असून त्यातून माझे अर्थकारण सुधारले
आहे.
अशोक मातकर- ७९७२७३४२२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com