Market Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali Season : खूप खरेदी म्हणजे खूप आनंद...

Market Update : सध्याचे दिवस सणासुदीचे आहेत. हळूहळ मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. कशासाठी? फक्त वस्तूंसाठी? नाही. वस्तू तर फक्त एक माध्यम आहे.

संजीव चांदोरकर

Diwali Shopping: सध्याचे दिवस सणासुदीचे आहेत. हळूहळ मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. कशासाठी? फक्त वस्तूंसाठी? नाही. वस्तू तर फक्त एक माध्यम आहे. काही वर्षांपूर्वी मार्केटने लोकांना सांगितले, सतत हॅमर केले, की ‘खूप खरेदी केली की खूप आनंद मिळतो.’

पिढ्यान्‌पिढ्या आर्थिक विवंचनेत काढलेल्या, अनादी भुकेल्या कोट्यवधी नागरिकांना वाटले, की ‘मार्केट’ तर अगदी आपल्या मनातलंच सांगतंय. लोकांना खरे तर पोहोचायचे असते ‘आनंदा’च्या गावाला. ते त्यांच्या डीएनएमध्ये प्रोग्रॅम्ड आहे. आनंदाच्या गावाला पोहोचणे, मनमुराद आनंद घेणे हेच तर जीवनाचे ईप्सित आहे. मार्केटने या भौतिक वांचितावस्थेचा, मानसिकतेचा अभ्यास करून ‘आनंद’ म्हणजेच जास्तीत जास्त खरेदी असे समीकरण हॅमर केले. ते साधी राहणी, नैतिकतेचा उपदेश करून जाणारे नाही.

मार्केटने शासनाच्या धोरणकर्त्यांच्या मदतीने आनंदाच्या गावाला पोहोचणारा रस्ता नेहमीच बाजारपेठेतून जाईल अशी आखणी केली. आनंदाच्या गावाला पोचण्यासाठी दुसरा रस्ताच नाही ठेवला. बाजारपेठेचा हा रस्ता होता मायावी. चालता चालता कोणीतरी अदृश्य शक्ती रस्त्यावरून जाणाऱ्यांना हाताला घेऊन बाजारपेठातील कोणत्या तरी दुकानात घेऊन जात असते.

खरेदी करायचे ठरवले नसताना लोक अगदी नको असणाऱ्या गोष्टी खरेदी करून दुकानातून बाहेर पडत असतात. लोक दुकानदारांना विचारत असतात, ‘का हो, या खरेदीवर ‘आनंद’ मिळणार होता ना फ्री?’ दुकानदार हसून म्हणतात, ‘हो, टाकलाय ना पॅकिंगच्या आत.’

हे सगळे जोरात सुरू होते. पण हवे तेवढे लोक मार्केटमध्ये येईनात. त्याचे कारण पुन्हा मार्केटच होते. मार्केट पुरेसे रोजगार निर्माण करत नव्हते. पुरेसे वेतन देत नव्हते. सगळे काही स्वतःच बनवत असल्यामुळे स्वयंरोजगार निर्माण होत नव्हते. त्यामुळे लोकांकडे वस्तूंच्या खरेदीसाठी हवे तेवढे पैसेच नव्हते.

मग मार्केटने बँका, स्मॉल बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या, मायक्रो फायनान्स, सूक्ष्म वित्त, गोल्ड लोन, बाय नाऊ पे लेटर, विना तारण, विना कारण, डिजिटल लेंडिंग... अशा नानाविध यंत्रणा कामाला लावल्या. जगभरातून भांडवल वाहत येऊ लागले. आता तर मार्केटने शासनाला सांगून लाडक्या बहीण, भावांच्या नावाखाली डायरेक्ट कॅश द्यायला लावली आहे. लोक खरेदी करताहेत; बचतीची सवय गटारात फेकून दिली आहे. मिळेल तेथून कर्ज ओराबाडताहेत. मग अनेक महिने अनेक वर्षे ती कर्जे फेडताहेत. ईएमआय भरण्यासाठी पैसै नाहीत म्हणून कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज काढत आहेत. कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एवढे भांडवल वाहत येत आहे की कर्ज घेणाऱ्यांपेक्षा कर्ज देणाऱ्यांचा उत्साह जास्त आहे.

आपल्या हातातल्या पिशवीत त्या पॅकेटच्या आत दुकानदाराने ‘आनंद’ देखील पॅक केला आहे, याच आनंदात लोक आपापल्या घरी पोहोचताहेत. पॅकिंग उघडताहेत, नवीन वस्तुमालाला हुंगताहेत, चव घेताहेत, स्पर्श करताहेत, त्यांना छान वाटतंय.

शेवटी ‘आनंद’ आपल्या घरात आलाय याच धुंदीत लोक असताना विक्रमादित्याच्या खांद्यावरून निसटून जंगलात झाडावर जाऊन लटकणाऱ्या त्या प्रेतासारखा ‘आनंद’ लोकांच्या घरातून निसटून परत परत बाजारपेठेतील दुकानात जाऊन लटकत आहे! त्याचा डाव सफल होत आहे. कारण आनंदाला शोधत लोक परत परत बाजारात, दुकानांत जात आहेत. अजून वेगवेगळ्या वस्तू विकत घेत आहेत. निसटलेला तो ‘आनंद’ मिळविण्यासाठी...

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT