Seed Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Modern Seed Bank : काळाची गरज ओळखून बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन (बाएफ) संस्थेने उरुळीकांचन येथील संशोधन प्रक्षेत्रावर स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक पद्धतीची बियाणे बॅंक उभारली आहे.

Team Agrowon

अमित गद्रे

Crop Seed Conservation : देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन केले आहे. या जाती संबंधित भौगोलिक परिस्थितीत चांगल्या वाढतात. पारंपरिक जातींचे सुधारित जातींच्या तुलनेत उत्पादन कमी आहे, परंतु या जातींचा कमी उत्पादन खर्च, अधिक पोषणमूल्य तसेच कीड, रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या काळातही प्रतिकूल परिस्थितीत या स्थानिक जाती निश्चितपणे चांगले उत्पादन देतात.

विशिष्ट चव, रंग आणि सुगंधासाठी या जाती प्रसिद्ध आहेत. जैवविविधता संवर्धन, अन्न आणि पोषण सुरक्षेच्या दृष्टीने या जातींचे संवर्धन सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे. स्थानिक जातींमधील वेगवेगळ्या गुणवैशिष्ठांचा उपयोग नवीन जातींचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक जातींचे पोषण मूल्य आणि संशोधनाची गरज ओळखून ‘बाएफ’ संस्थेने उरुळीकांचन येथील संशोधन प्रक्षेत्रावर संवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने बियाणे बॅंक उभारली आहे.

बियाणे बॅंकेला सुरुवात

उरुळीकांचन येथील ‘बाएफ’ संस्थेच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये २०१५ मध्ये स्थानिक जातींचे संवर्धन आणि संशोधनासाठी शीत बियाणे बॅंकेची उभारणी केली. याबाबत माहिती देताना संस्थेतील प्रमुख शास्रज्ञ डॉ. विठ्ठल कौठाळे म्हणाले, की गावपातळीवर स्थानिक जातींची स्वस्थळी लागवड आणि संवर्धन करताना दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते.

काही जाती नष्ट होण्याची भीती आहे. भविष्यातील संशोधनासाठी या जनुकीय ठेव्याचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने शीत बियाणे बॅंकेची उभारणी केली. महाराष्ट्र राज्यात गावपातळीवर स्वस्थळी संवर्धन होत असलेल्या नऊ पिकांच्या ६०० स्थानिक जातींचे संवर्धन या बॅंकेत करण्यात आले आहे. या ठिकाणी भात, मका, ज्वारी, नाचणी, वरी, राळा, मोरबंटी, चवळी, हुलगा, मटकी, वाटाणा, काळा वाटाणा, उडीद, मसूर याचबरोबरीने वाल घेवड्याच्या पंधरा स्थानिक जातींच्या बियाणांची साठवणूक केली आहे.

बॅंकेमध्ये बियाणे सुरक्षित राहण्यासाठी पाच अंश सेल्सिअस तापमान आणि ३३ टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करण्यात आली आहे. या वातावरणात बियाण्याची उगवण शक्ती ८ ते १० वर्षांपर्यंत टिकून राहते. सुरक्षिततेच्या दृष्टीने बियाण्याच्या आकारानुसार सुमारे २५० ते १००० ग्रॅम बियाणे विशिष्ट प्रकारच्या डब्यामध्ये साठविलेले आहे. त्यामुळे गरजेनुसार हे बियाणे बाह्यस्थळी संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

बँकेमध्ये साठविलेल्या बियाण्यांची दरवर्षी उगवण शक्ती तपासली जाते. यामुळे प्रत्येक बियाण्याचा पुनरुज्जीवन कालावधी ठरवता येतो. बँकेमध्ये अपेक्षित तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी काही अंशी विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ४० टक्के वीजबिलामध्ये बचत होत आहे.

विविध संस्थांचे सहकार्य

पीक जातींच्या संवर्धनामध्ये राज्यातील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य जैवविविधता संस्था, नागपूर तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय पीक आनुवंशिक संशोधन ब्युरो,

राष्ट्रीय पीक वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण या देशपातळीवरील संस्था तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचाही समावेश आहे. महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत पारंपरिक जातींच्या संवर्धनाचे हे मॉडेल महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांसाठी उपयोगी ठरले आहे.

पारंपरिक पीक जातींचे संवर्धन

महाराष्ट्रातील पाच हवामान विभागातील सुमारे साठ गावांमध्ये सर्वेक्षण. लागवडीखालील सर्व पिके तसेच पारंपारिक जातींबाबत नोंद.

प्रमुख बियाणे संवर्धकांच्या माहितीचे संकलन. प्रत्येक जातीचे विशेष गुणधर्म, जात टिकून राहण्याची किंवा कमी होण्याची कारणे, पारंपारिक महत्त्व, औषधी व इतर वापराबाबत नोंद.

अधिक पाण्यात तग धरणाऱ्या, नुसत्या ओलाव्यावर येणाऱ्या, न लोळणाऱ्या, उंच वाढणाऱ्या तसेच विविध खाद्य पदार्थ निर्मितीसाठी उपयुक्त जातींचे संकलन. आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक महत्त्वाच्या जातींचे संकलन, संवर्धन व गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास.

२००९ पासून संस्थेतर्फे पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रमाला जव्हार (पालघर) येथून सुरुवात. स्थानिक जातींच्या पारंपरिक ज्ञानाचे संकलन, शास्त्रीय अभ्यास आणि प्रसार. २०१४ पासून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासनाच्‍या सहकार्याने महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प, अंतर्गत जव्हार (पालघर), अकोले (नगर), जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रमाची सुरवात .

प्रामुख्याने भात, नाचणी, वरई, राळा, मोरबंटी, मका, ज्वारी, वाल घेवडा, चवळी, भाजीपाला पिके, कंद पिके तसेच जंगली भाज्या, जंगली फळांचे सर्व्हेक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन.

१७३ जंगली अन्न वनस्पतींचा अभ्यास. पदार्थ बनविण्याच्या पद्धतीचे संकलन.

३१ ठिकाणी प्रक्षेत्रीय संवर्धनास सुरुवात.

भात, मका, ज्वारी पिकांच्या ५३ स्थानिक जातींची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पीक वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरणाकडे नोंदणी.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पीक आनुवंशिक संशोधन ब्युरोकडे २०० जातींची नोंदणी.

सहा पिकांच्या ४९ स्थानिक जातींची ६० टन बियाणे निर्मिती. गावपातळीवर सहा ठिकाणी बियाणे बँकांची सुरुवात. त्यांच्यामार्फत बियाणे देवाण घेवाण आणि विक्री.

आंबेमोहोर, काळभात, रायभोग, खडक्या, वालय अशा निवडक जातींच्या तांदळाची ‘फार्मिंग मोन्क’ ब्रॅण्डने विक्री.

भात, नाचणी, वरई, मका, ज्वारी पिकांच्या १०८ जातींच्या पोषण मूल्यांचा अभ्यास.

भाताच्या ४८, मका पिकाच्या १६ जातींचा जनुकीय अभ्यास.

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे जव्हार, अकोले आणि धडगाव येथील तीन बियाणे संवर्धन गटांना प्रत्येकी दहा लाखांचा ‘राष्ट्रीय जीनोम पुरस्कार’.

महाराष्ट्राबरोबर गुजरात, ओदिशा आणि उत्तराखंड राज्यात पीक जाती संवर्धांनामध्ये दोनशेहून अधिक बियाणे संवर्धकांचा सक्रिय सहभाग.

१५ राज्यांमध्ये शीत बियाणे बॅंकेची उभारणी

हवामान बदलाच्या काळात ताण सहन करणाऱ्या विविध पिकांच्या स्थानिक जातींचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन आणि संशोधन ‘बाएफ’ संस्थेच्या प्रक्षेत्रावर होत आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक जाती महत्त्वाच्या आहेत. पिकांच्या स्थानिक जातींमध्ये विविधता आहे. मानवी आणि पशू आरोग्याच्या दृष्टीने या जातींमध्ये पोषणमूल्य अधिक आहे. त्यामुळे अशा जातींचा अभ्यास करून बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या जातींची विविधता टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने संस्थेच्या उरुळीकांचन येथील संशोधन प्रक्षेत्रावर शीत बियाणे बॅंकेची उभारणी केली आहे. बाएफ संस्था १५ राज्यांमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातील पिकांच्या स्थानिक बियाण्यांच्या संवर्धनासाठी आम्ही त्या ठिकाणच्या संशोधन प्रक्षेत्रावर शीत बियाणे बॅंकेची उभारणी करत आहोत. यातून देशभरातील विविध पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन आणि संशोधन शक्य होत आहे.

डॉ. भरत काकडे, (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त, बाएफ संस्था)

डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१

(प्रमुख शास्त्रज्ञ, बाएफ, उरुळीकांचन, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT