Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Co-Operative Dairy : रायगडमध्ये दूध सहकार संस्‍था डबघाईला

Team Agrowon

Alibaug News : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचा फटका या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कृषिपूरक जोडव्यवसायांवर होत आहे. जिल्ह्यात दुग्ध संकलन करणाऱ्या नोंदणीकृत १३५ सहकारी संस्था आहेत. त्यातील १८ कार्यरत असून त्यांच्याकडून प्रतिदिन १,५७३ लिटर दूध संकलन होते.

जिल्‍ह्यातील एकूण मागणीच्या तुलनेत हे प्रमाण क्षुल्लक असून ११७ संस्‍था अवसायानात निघाल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम दूध उत्पादनावर होत असून रायगडमध्ये दिवसाला पाच लाख लिटर दुधाची कमतरता भासत आहे.

जिल्ह्याला दररोज आठ लाख ३० हजार लिटर दुधाची गरज आहे; मात्र जिल्ह्यात फक्त तीन लाख ३८ हजार लिटर दूध उत्पादित होते. तर, सुमारे पाच लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून दररोज रायगडमध्ये येते.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्रावर आधारित विविध उद्योगांची घसरण होऊ लागली आहे. कृषी क्षेत्र कमी झाले आहे. त्‍यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन व्यवसायात मोठी संधी निर्माण झाल्याने तरुणवर्ग तिकडे आकर्षित झाला आहे. याचा फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे.

रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची; मात्र गेल्‍या काही वर्षांत औद्योगिकीकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने मुबलक हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटत आहे.

मुंबई, पुणेसारखी मोठी शहरे रायगड जिल्ह्यालगत असल्याने तरुण वर्ग नोकरीसाठी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे. कमी झालेली शेतजमीन, पर्यटन क्षेत्रात निर्माण झालेल्‍या संधीमुळे तरुणवर्गाने दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवल्‍याचे दिसून येत आहे. त्यामुळे घरोघरी पशुपालन कमी झाले आहे. गेल्‍या काही वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन सहकारी संस्‍थांमध्ये विकास झालेला नाही. ज्या संस्था जिल्‍ह्यात अस्तित्वात होत्या त्‍याही डबघाईला आल्‍या आहेत. परिणामी, दिवसेंदिवस दुधाची टंचाई जाणवत आहे.

फक्त १८ दूध उत्पादक सहकारी संस्था

दूध उत्पादनवाढीसाठी सहकारी संस्था चांगले काम करतात. यासाठी राज्य सरकारकडून काही सवलतीही संस्थांना दिल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी वेगळ्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु रायगड जिल्ह्यात कार्यालयाचे बहुतांश काम ठप्प झाले आहे.

जनावरांची संख्या कमी

जिल्ह्यामध्ये देशी गायी, संकरित गायी आणि म्हैसवर्गीय जनावरांची एकूण संख्या दोन लाख ३९ हजार १३१ आहे. यातील ३० टक्के जनावरे दूध देणारी आहेत. या जनावरांद्वारे दररोज एकूण तीन लाख ३७ हजार ९७७ लिटर दूध उपलब्‍ध होते. जिल्ह्याला दररोज आठ लाख २९ हजार ७७३ लिटर दुधाची गरज आहे.

तसेच, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढला आहे. जिल्ह्यात दररोज फक्त तीन लाख ३७ हजार ९७७ लिटर दूध उत्पादित होते. उर्वरित चार लाख ९१ हजार लिटर दूध दररोज पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगड जिल्ह्यात येत आहे.

रायगडमधील पशुधन

जनावरे दुग्‍धजन्य उत्‍पादन

देशी गायी १,७०,३८८ ५१,११६ २,०४,४६४

संकरित गायी ६,५१८ १,९५५ २१,५०५

म्हैस वर्ग ६२,२२५ १८, ६६८ १,१२,००८

एकूण २,३९,१३१ ७१,७३९ ३, ३७,९७७

दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत असून शेती क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे जनावरांना आवश्यक हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील तरुण नोकरीनिमित्त शहराकडे जात आहेत. जिल्ह्यात पर्यटन व्यवसायात मोठी संधी असल्याने अनेक जण पर्यटन व्यवसायाकडे वळत आहेत. जिल्ह्यात शेतकरी अल्पभूधारक असून दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते. या सर्वांचा परिणाम येथील दुग्ध उत्पादनावर होत आहे.
- सुदर्शन पाडावे, प्रभारी अधिकारी, दुग्धव्यवसाय विकास विभाग, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT