Carrot Grass Agrowon
ॲग्रो विशेष

Carrot Grass : स्थलांतर करायला लावणारे गाजर गवत

Team Agrowon

अभिजित कुपटे

Indian Agriculture : मी काही दिवसांपूर्वी पुण्यात आकाशवाणीच्या कार्यालयात जागतिक सायकल दिनाविषयीचा कार्यक्रम आटोपून पिंपरी-चिंचवडमधल्या रावेत इथे सायकलीवर परतत होतो. पिंपळे निलख इथे सायकल ट्रॅकवर वादळाने पडलेला मोठा साइन बोर्ड आडवा आला. त्यामुळे मला उतरून चालावं लागलं. शेजारी एक गृहस्थ चालत होते. त्यांना सहज विचारलं, की तुम्ही इथलेच का? उत्तर आलं, ‘‘नाही. मी चंदगडचा. इकडं मुलीकडं आलोय.’’

चंदगड हे नाव ऐकून मी खूष झालो. मी मूळचा गारगोटी गावाचा. आपल्या भागातला माणूस भेटला म्हणून मी अजूनच मोकळा झालो आणि आमच्या मस्त गप्पा रंगल्या. चंदगड, पारगड, तिलारी आणि लाल गारगार मातीत अलगद जाऊन आलो. त्यांनी आपलं नाव सांगितलं आमगोंडा रामगोंडा बिरादार. त्यांनी आपली हकिकत सांगायला सुरू केली. ते म्हणाले, ‘‘मी लष्करातून नाईक पदावरून निवृत्त झालोय. माझं मूळ गाव जतजवळ मुचंडी. पण मला गाजर गवताची म्हणजे काँग्रेस गवताची ॲलर्जी आहे. त्यामुळे मी मूळ गावी स्थायिक झालो नाही. तर जास्त पावसाच्या ठिकाणी जिकडं हे गाजर गवत उगवत नाही अशा म्हणजे चंदगड तालुक्यात कागणी गावात स्थललांतरित झालो बघा. स्वामीकार रणजित देसाई यांच्या कोवाड जवळच हे गाव आहे.’’

१९६० च्या दरम्यान पडलेल्या दुष्काळात अमेरिकेमधून भारतात लाल मिलो (गहू) आयात करण्यात आला होता. त्याच्या बरोबर हे गवत भारतात आलं. त्या वेळी काँग्रेस पक्षाचं सरकार असल्यामुळे बहुधा त्याला काँग्रेस गवत हे नाव पडलं असावं.

माणसांच्या गरजा, शिक्षण आणि व्यवस्था त्याला स्थलांतर करायला भाग पाडतात. प्राणी, मधमाश्यासुद्धा स्थलांतर करतात. माझ्यासारखे असंख्य चाकरमानीपण शहरात अलगद स्थालांतरित होतात. पण चक्क गाजर गवतासारख्या निसर्गसृष्टीतील स्थलांतरित वनस्पतीमुळे एखाद्याला आपल्या जन्मगावी परतणं अशक्य व्हावं, हे माझ्यासाठी नवीन ज्ञान होतं.

आमगोंडा बिरादार यांनी १९८० मध्ये मॅट्रिक संपवून बरेलीला भारतीय सेनेत सिग्नल विभागात ऑपरेटर-शिपाई म्हणून रुजू झाले. गावी सुट्टीला येणं-जाणं असायचं. एका सुट्टीत गावाकडं रानात गाजर गवत उपसल्यावर रेल्वेने परत जाताना तोंड सुजलं. पुढच्या प्रत्येक सुट्टीला गावी जाताना पुण्यापासून पुढं मिरजला पोहोचल्यावर तोंडाला, त्वचेला काहीतरी त्रास होत असल्याचं जाणवायचं आणि गावात आल्यावर हे वाढत गेलं. त्यामुळे गावी जाणं बंद केलं. सिकंदराबादला बदली झाली. तिथं ॲलर्जी टेस्ट केली आणि गाजर गवताची ॲलर्जी असल्याचं निदान झालं. मिल्ट्रीत गेलेला माणूस गावात येत नाही उलटसुलट चर्चा सुरू झाली. हा गडी उगाचच गाजर गवतावर का शंका घेतोय म्हणून भाऊबंद, गावकरी बुचकळ्यात होते.

दरम्यान, वेळोवेळी जिकडं असं गवत नाही अशा भारतभरातील वेगवेगळ्या प्रदेशात बदलीच्या वेळी पोस्टिंग असं त्यांचं समीकरण जमलं होतं. नंतर भारत सरकारच्या शांतिसेनेचा भाग म्हणून काही काळ श्रीलंकेत गेला. मग सिकंदराबाद, त्रिवेंद्रम, पतियाळा अशा १७ वर्षांच्या सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त झाल्यावर जतजवळच्या गावी परत आल्यावर आमगोंडा यांचं तोंड सुजलं. फॅमिली डॉक्टरनं चंदगडमध्ये थोडे दिवस राहून बघण्याचा सल्ला दिला. मग त्यांनी १९९८ पासून कुटुंबकबिल्यासह या गावात मुक्काम हलवला. १० गुंठे शेत खरेदी केलं. तिथं छोटं घर बांधलं.

आमगोंडा यांनी त्यांना असलेल्या ॲलर्जीची बरीच माहिती सांगितली. या प्रकारच्या ॲलर्जीचं नाव एबीसीडी म्हणजे Airborne contact dermatitis (ABCD) असं आहे. रसायने, झाडं, गवत किंवा परागकण यामुळे ही ॲलर्जी होऊ शकते. संपर्कात येणारी उघडी त्वचा बाधित व्हायला सरू होते. सूज, रॅशेस, खाज, श्‍वसनाचे त्रास, दमा अशी अनेक लक्षणं असतात. माणसागणिक वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. या ॲलर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिल्या श्रेणीत थेट संपर्क आल्यानं, दुसऱ्यात अगदी जवळ आल्यानं आणि तिसऱ्या श्रेणीत एक फर्लांग दूर असलं तरी त्वचेला त्रास होतो. माझी ॲलर्जी ही तिसऱ्या श्रेणीतली आहे, मास्क घातला तर चेहऱ्यावरचा तेवढा भाग वाचतो. उन्हात असा भाग सूर्यकिरणांच्या संपर्कात आला की मग इथली त्वचा नाजूक होऊन थेट करपून लालसर होते.

स्वतः शेती करणारे आणि कीटकशास्त्रातले तज्ज्ञ असणारे डॉ. अंकुश चोरमुले यांना मी याबद्दल माहिती विचारली. त्यावर ते म्हणाले, ‘‘ही गाजर गवतामुळे होणारी ॲलर्जी व्यक्तिसापेक्ष आहे. साधारण शेतात काम करणाऱ्या मजूर तसेच शेतकरी मित्रांना बऱ्याच वेळेस याचा त्रास होतो. पण प्रमाण कमी-जास्त असते. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी. अशी काही लक्षणं दिसत असतील तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा.’’

आमगोंडाही असाच सल्ला देतात. त्यांनी स्वतः मिरजेतले त्वचारोग तज्ज्ञ कद्दू डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेली आहे. ते डॉक्टर मध्यंतरी वारले. पण अजूनही गाजर गवत असणाऱ्या भागात जाताना आधी त्या डॉक्टरांनी सुचविलेल्या गोळ्या-औषधं आमगोंडा घेतात. शिवाय पथ्यपाणी आहेच. सध्या कोल्हापूरच्या काही त्वचारोग तज्ज्ञांकडून ते वेळोवेळी सल्ला घेत असतात. पण गाजर गवतापासून लांब राहणे हा सर्वांत जालीम उपाय असल्यांचंही ते सांगतात. ॲलर्जीच्या लक्षणातून बरं व्हायला पूर्ण दोन दिवस खर्ची पडतात.

आमगोंडा यांच्या गावात आणखी चार जणांना अशाच प्रकारची ॲलर्जी आहे. पण त्यांना आपल्या जीवनमानात बदल न करता आल्यानं आणि कायमच गाजर गवताचा संपर्क येण्याचंच काम असल्यानं त्यांनी तात्पुरता उपाय स्टिरॉइड इंजेक्शनांचा वापर सुरू केला. त्याचा असर महिन्याभरात ओसरतो आणि पुन्हा त्रास सुरू होतो. मग पुन्हा इंजेक्शन घ्यावं लागतं. या स्टिरॉइडचे माणसाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. कधीच भरून न येणारं नुकसान होतं. आमगोंडा यांनाही अनेकांनी हा उपचार सुचविला होता. पण फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यामुळं त्‍यांनी त्या मार्गाला जायचं टाळलं. त्वचारोग तज्ज्ञ या स्टिरॉइडच्या विरोधात आहेत. तसेच डोंगराच्या देवीला नवस बोलला तर हा त्रास कमी होईल, अशा अंधश्रद्धेलाही आमगोंडा बळी पडले नाहीत.

आमगोंडा सध्या चंदगडला रमलेत. १० गुंठ्यांत छोटं घर आहे. घराबाहेर मागेपुढे आंबा, चिकू, फणस, आवळ्याची झाडं आहेत. खाण्यापुरता भाजीपाला पिकवतात. जत भागात माहितीही नसलेल्या कर्टुली, कारली, काटेली अशा रानभाज्यांची संगत आहे. शिवाय परसबागेत त्यांनी हौसेने लावलेल्या शेंगा, सुपारी, खाऊची पाने, ब्रु कॉफीची झाडे, मिरीची झुडपे आहेत. इथे शेतात ते कुठल्याही त्रासाविना आनंदाने राहत आहेत. इथल्या निसर्गसंपन्न, प्रदूषणमुक्त इलाक्यात राहिल्याने जन्मभूमी असलेल्या मूळ गावाचा आणि ॲलर्जीचा विसर पडतो, असेही ते सांगतात. गाजर गवतामुळे स्थलांतर केल्यामुळे ते नकळत एका श्‍वाश्‍वत जीवनशैलीचा भाग बनले आहेत. त्यांचं मूळ गाव असलेल्या जत भागात पुरेसं पाणी नाही. तरीही आहे ती शेती सध्या त्यांचे भाऊबंद करतात. शेवटी आपण जिथं राहतो, जे आपल्याला मानवतं ते आपलं गांव असं सांगायला ते विसरत नाहीत.

तर अशी ही आपल्या ध्यानीमनी नसणाऱ्या, दुर्लक्षित पण अत्यंत संवेदनशील आणि थेट मानवी आरोग्यावर, जैवविविधतेवर अतिक्रमण करणाऱ्या गाजर गवताची गोष्ट. या अशा गोष्टींवर बरंच संशोधनही होत असतं. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3339593/ या लिंकवर क्लिक केल्यावर त्याची एक झलक तुम्हाला दिसेल.

९९२३००५४८५

(लेखक अभियंता, ट्रेकर व सायकलपटू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT