डॉ. श्रीगणेश शेळके, डॉ. भीमराव कांबळे, डॉ. शुभांगी कदम
Agriculture Health: सूक्ष्मअन्नद्रव्यांची जमिनीमध्ये कमतरता आणि वनस्पतीमध्ये कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सूक्ष्मअन्नद्रव्ये अन्वेषण योजनेअंतर्गत फुले द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड II पोषक खत तयार केले आहे. यामध्ये लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्मअन्नद्रव्यांची उपलब्धता आहे.
व नस्पतींना सूक्ष्म प्रमाणात लागणारी, परंतु आवश्यक आठ अन्नद्रव्ये आहेत. यामध्ये लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि कोबाल्ट यांचा आवश्यक सूक्ष्मअन्नद्रव्ये म्हणून उपयोग होतो. आणि सोडिअम, सिलिकॉन, निकेल आणि व्हॅनाडिअम यांचा हितकारक सूक्ष्मअन्नद्रव्ये म्हणून पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. आवश्यक सूक्ष्मअन्नद्रव्ये जरी कमी प्रमाणात लागत असली तरी ती वनस्पतीस आपला जीवनक्रम पूर्ण करण्याकरिता आवश्यक असतात.
त्यांचा उपयोग वनस्पतीमध्ये उत्प्रेरक, संप्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फूल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करण्यासाठी होतो. हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळाली नाही तर पिकाचा जीवनक्रम पूर्ण होऊ शकतो, परंतु मिळाल्यास पिकास त्याचा फायदा होतो. उदा. सिलिकॉनचा भात पिकासाठी पुरवठा केल्यास स्फुरद अन्नद्रव्यांचे शोषण वाढते,
भात लोळण्याचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनात १० ते १२ टक्के वाढ होते. झाड किंवा फांदीच्या खालच्या जुन्या पानांवर प्रथमत: वनस्पतीमध्ये चलन होणाऱ्या अन्नद्रव्यांची (उदा. जस्त, मॉलिब्डेनम) कमतरतेची लक्षणे दिसतात. याउलट वनस्पतीतील स्थिर/अचल अन्नद्रव्यांच्या (उदा. बोरॉन, तांबे, लोह, मंगल आणि क्लोरीन) कमतरतेची लक्षणे शेंड्याकडील नवीन कोवळ्या पानांवर दिसतात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य
लोह
हरितद्रव्य निर्मितीचे (ऑक्सीडेशन - रिडक्शन) अभिक्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य.
सायटोक्रोम व फेरडॉक्झीनमुळे वनस्पतीत ऊर्जा निर्माण होण्याच्या क्रियेत मदत.
विविध संप्रेरकाचा घटक असल्यामुळे वनस्पतीतील श्वसनक्रिया, प्रकाश संश्लेषण आणि नायट्रेटचे रूपांतर करण्यास मदत.
वनस्पतीतील प्रथिने तयार होण्याच्या क्रियेत आवश्यक.
वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमधील लेगहिमोग्लोबीन आहे. त्यामुळे कडधान्याच्या मुळावरील गाठीची वाढ होण्यास आवश्यकता आहे.
जस्त
वनस्पतींच्या वाढीसाठी योग्य संप्रेरक (संजीवके) तयार करणे.
ट्रिफ्टोफॅन, ऑक्झिन व इण्डॉल ॲसेटिक आम्लाचा संश्लेषणासाठी उपयोग होतो. त्यामुळे वनस्पतीमधील ऑक्झीन संप्रेरकाची निर्मिती होऊन वनस्पतीची वाढ होते.
स्टार्च (कर्बोदके) निर्मितीच्या कार्यामध्ये मदत.
वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत व पाण्याच्या अभिसरण प्रक्रियेत सहभाग असतो.
प्रकाश संश्लेषण, कार्बन डायऑक्साइड समीकरण आणि प्रथिने संश्लेषणासाठी विकारांना सचेतना मिळते.
बोरॉन
वनस्पतीतील नवीन पेशींची वाढ करण्यास मदत.
परागसिंचन आणि पराग वाढ, पुंकेसराच्या कामास तसेच बी व फळे तयार होण्यासाठी मदत.
वनस्पती शरीरांतर्गत शर्करायुक्त पदार्थांच्या चलनवलनाशी संबंध. वनस्पतीमधील संजीवक निर्मिती.
प्रथिने व अमिनो आम्लाचे विश्लेषण करण्यास मदत, द्विदल पिकांच्या मुळामध्ये नत्र गाठींची निर्मिती.
कॅल्शिअम व नत्राच्या शोषण प्रक्रियेत वनस्पतींना मदत.
मंगल
नत्र संचयन आणि वितचकांना चालना.
प्रकाश संश्लेषणामध्ये हरीतलवक आणि हरीतद्रव्य यांचा विकास. लोहाचे वहन करण्यास मदत.
पिकामध्ये घडून येणाऱ्या प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि विविध सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर.
वनस्पती पेशीमध्ये संयोग पावण्याच्या प्रक्रियेत सहभाग.
संप्रेरकांचा महत्त्वाचा घटक असल्याने वनस्पतींना श्वसनक्रियेत आणि कर्बोदके, प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत.
तांबे
अमिनो आम्ल आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात.
वनस्पतीमध्ये प्रथिने व कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याच्या शरीरक्रियेशी संबंधित आहे.
जीवनसत्त्व ‘अ’ निर्मितीमध्ये मदत.
वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रोत्साहन.
पेशीमय ऑक्सिडेशन रिडक्शन प्रकाश संश्लेषण बाष्पीभवन आणि पराग जनन क्षमता फलन व फळ तयार होण्यासाठी कार्य.
मॉलिब्डेनम
वनस्पतीच्या चयापचय क्रियेसाठी उपयोग. नायट्रेजीनेज, नायट्रेट रिडक्टेज, सल्फर ऑक्सीडेज या विकरांचा घटक.
कडधान्याच्या मुळांच्या ग्रंथीमध्ये नत्राचे स्थिरीकरण, नायट्रोजीनेजच्या अंगभूत रचनेसाठी आणि नायट्रेट नत्राचे अमोनियामध्ये रूपांतर करण्यासाठी उपयोगी.
वनस्पतीमध्ये लोहाचे शोषण व स्थलांतर.
ॲस्कार्बिक आम्लाची (क जीवनसत्त्व) निर्मिती.
फुले द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड II पोषक खत
सूक्ष्मअन्नद्रव्यांची जमिनीमध्ये कमतरता आणि वनस्पतीमध्ये कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सूक्ष्मअन्नद्रव्ये अन्वेषण योजनेअंतर्गत फुले द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड II पोषक खत तयार केले आहे. यामध्ये लोह (२.५ टक्के), जस्त (३टक्का), मंगल (१ टक्का), तांबे (१ टक्का), बोरॉन (०.५ टक्का) व मॉलिब्डेनम (०.१ टक्का) या सूक्ष्मअन्नद्रव्यांचे प्रमाण असणारी शासनमान्य प्रमाणित ग्रेड आहे.
फायदे :
पिकांची शेंड्याकडील वाढ चांगली होते. फुलांची संख्या वाढते, फुलगळ थांबते.
धान्य/ फळ उत्पादनाची गुणवत्ता (रंग/ वजन/आकारमान / चव) वाढते.
पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते, शाकीय वाढ चांगली होते.
पिकाची ओलावा, कीड, रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
पीक उत्पादनामध्ये १५ टक्क्यांनी वाढ होण्यास मदत.
प्रमाण :
तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांसाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी. दुसरी फवारणी ४५ दिवसांनी १०० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी.
भाजीपाला पिकांसाठी पहिली फवारणी शाकीय अवस्थेत (३० ते ३५ दिवसांनी) ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी. दुसरी फवारणी फुले येण्यापूर्वी १०० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी.
फळझाडे : ताण संपल्यानंतर फुले येण्यापूर्वी आणि फळधारणेच्या वेळी १०० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी.
नगदी पिके : ठिबकद्वारे २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून पहिली मात्रा शाकीय अवस्थेत आणि दुसरी मात्रा फुले येण्यापूर्वी द्यावी किंवा ही मात्रा आळवणीद्वारे देता येते.
वापरताना काळजी
फवारणी सकाळी ११ वाजण्याच्या पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.
पोषक ग्रेडमध्ये कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा विद्राव्य खत मिसळून फवारणी करू नये.
फवारणीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याची प्रत चांगली असावी. पाण्याचा टीडीएस ५०० पीपीएमपेक्षा कमी असावा.
- डॉ. श्रीगणेश शेळके ८२७५०३४६९३ (मृद्विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.