Micronutrients : रोग प्रतिकारकक्षमता वाढविणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये

Crop Micronutrient Management : पिकांची प्रतिकारकक्षमता आणि संतुलित अन्नद्रव्यांचा वापर यामध्ये मोठा सहसंबंध आहे. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, तांबे, बोरॉन यांसारख्या अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाची आहेत.
Micronutrients
MicronutrientsAgrowon
Published on
Updated on

डॉ. अशोक डंबाळे, रामप्रसाद जोगदंड

Immune-Boosting Micronutrients : वनस्पतींच्या वाढीसाठी सर्व जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये बहुतेक शेतकऱ्यांना माहिती असतात. मात्र कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, तांबे, बोरॉन या सारख्या अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे शेतकरी दुर्लक्ष करताना दिसतात.

या अन्नद्रव्यांंची कमतरता निर्माण झाल्यास वनस्पतींमध्ये रोगकारक जिवाणू, बुरशी अथवा विषाणूंच्या शिरकावासाठी अनुकूल स्थिती तयार होते. त्यामुळे पिकांची प्रतिकारकक्षमता आणि संतुलित अन्नद्रव्यांचा वापर यामध्ये मोठा सहसंबंध आहे. पिकाची प्रतिकारक्षमता वाढविण्यामध्ये अन्नद्रव्यांची भूमिका लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव

पिकाच्या आंतरभागामध्ये एखादा अपायकारक घटक (उदा. जीवाणू, विषाणू किंवा बुरशी) प्रवेश करतो आणि तो पिकाच्या शरीरक्रियेतील विविध जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये स्वतःच्या वाढीसाठी आवश्यक असे काही बदल घडवून आणतो. परिणामी, वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचे शोषण, वहन आणि उपयोग या क्रियांवरही अनिष्ठ परिणाम होतो. त्याची लक्षणे बाहेरून विविध मार्गांने दिसतात.

सामान्यपणे वनस्पतीमध्ये अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण असताना वनस्पती अनेक अर्थाने सुदृढ असते. ती कीड व रोगांना अधिक प्रतिकारक असते. मात्र अन्नद्रव्यांच्या प्रमाणात कमतरता किंवा आधिक्य निर्माण झाल्यामुळे रोगांच्या वाढीसाठी वनस्पती आणि पर्यायाने संपूर्ण पीक संवेदनशील होते. त्यामुळे पिकांच्या पोषणाकडे लक्ष देऊन सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास फायदा होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. उत्पादनात वाढ मिळते.

Micronutrients
Micronutrient Management : रब्बी पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रोग नियंत्रणात अन्नद्रव्यांचे महत्व

केवळ पिकाच्या वाढीसाठीच नव्हे, तर संभाव्य रोग प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी विविध अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत. त्यासाठी खतांचा योग्य मात्रेमध्ये वापर करणे आवश्यक असते. पिकांची उत्तम वाढ आणि आरोग्यासाठी संतुलित पीक पोषणास प्राथमिकता दिली पाहिजे. त्यानंतरही रोग अथवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास कीड व रोग व्यवस्थापनावर भर द्यावा. आपले शेतकरी अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाऐवजी पीक संरक्षणावर अधिक भर देतात. खरेतर विविध रोगांच्या प्रतिबंध किंवा नियंत्रणासाठी विविध अन्नद्रव्ये उपयोगी ठरतात.

उदा. कॉपर, झिंक व मँगेनीज व अन्य सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त संयुगे. स्फुरद आणि कॅल्शिअम यांची विविध संयुगे. जमिनीद्वारे विशिष्ट प्रकारच्या बुरशी व जिवाणूचा प्रादुर्भाव होऊन पिकांना विविध प्रकारचे रोग होतात. विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या पिकांमध्ये जमिनीतून होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने आढळून येतो. विविध सूक्ष्म अन्नद्रव्याचा जमिनीद्वारे संतुलित वापर केल्यास जमिनीतून प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी राखणे शक्य होते. उदा. मँगेनीजमुळे विशिष्ट प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव व प्रसार कमी होऊ शकतो.

अन्नद्रव्यांचे विशिष्ट परस्परसंबंध

पिकांमध्ये सर्व अन्नद्रव्यांचे विशिष्ट परस्परसंबंध आहेत. त्यामुळे पिकामधील सर्व शरीरक्रिया व्यवस्थित चालू असतात. जर त्यांच्या प्रमाणात बदल झाला तर शरीरक्रियावर परिणाम होतो. पर्यायाने पिकांतील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

उदा. मोलाब्द या अतिसूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास नायट्रेट रिडक्टेस या विकराचे प्रमाण कमी होते. कारण त्यात मोलाब्दचे दोन रेणू असतात. नायट्रेट रिडक्टेस विकरामुळे नत्राचे रुपांतर प्रथिनांमध्ये होत असते. ही प्रक्रिया मोलाब्द कमी झाल्यास थांबते.

Micronutrients
Micronutrient : सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या पद्धती

पिकांतील पेशीभित्तिकांचा विकास करून त्यांची जाडी वाढवणे. यामुळे पेशीमध्ये अपायकारक घटकांचा शिरकाव रोखता येईल.

पिकांत रोगास अटकाव करणाऱ्या नैसर्गिक पदार्थाची निर्मिती करणे. उदा. अँटीऑक्सिडंट, फ्लेवोनॉइड, फायटोअलेक्झिन्स

पद्धत एक : पिकांतील पेशीभितीकांचा विकास करून त्यांची जाडी वाढवणे. पेशीभितीका पातळ किंवा बारीक असल्यास पेशीमधून अन्नद्रव्ये काही प्रमाणात दोन पेशीमधील भागात येतात. त्यावर बुरशीचे तंतू वाढू शकतात. परिणामी रोगाचा प्रसार होतो. मात्र पेशिभित्तिका योग्य त्या जाडीची असल्यास पेशीतून अन्नद्रव्ये बाहेर येत नाही. थोडक्यात बुरशींच्या वाढीसाठी पोषक वातावरण नसते. एका अर्थाने बुरशीजन्य रोगास प्रतिकारक क्षमता तयार होते. यासाठी पालाश हे खत उपयोगी ठरू शकते. पालाश हे प्रथिने, स्टार्च व सेल्युलोज हे घटक तयार होण्यासाठी आवश्यक असते. त्यातील सेल्युलोज हा पेशीभित्तिकेचा घटक आहे. पालाश कमी असल्यास सेल्युलोज प्रमाण कमी राहून पेशीभित्तिका पातळ किंवा बारीक होते. अशा पेशीमधून अन्नद्रव्यांची गळती होऊ शकते. म्हणजेच शर्करा (स्टार्च तयार होण्यासाठी आवश्यक घटक) आणि अमिनो आम्ल (प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक घटक) यांचे प्रमाण दोन पेशीमधील भागामध्ये वाढते. यामुळे बुरशीजन्य रोगाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते, प्रतिकारकक्षमता कमी होते.

पद्धत दोन : पिकांत रोगांस अटकाव करणाऱ्या विविध नैसर्गिक पदार्थाची निर्मिती करणे.

अ) बोरॉन : रोगप्रतिकारक्षम पदार्थ तयार करण्यासाठी बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य महत्वाची भूमिका बजावते. बोरॉनमुळे रोगास सुरुवात होत असलेल्या ठिकाणीच त्याला अटकाव करणाऱ्या नैसर्गिक पदार्थांची निर्मिती केली जाते.

ब) कॉपर : बुरशीजन्य रोगावर उपाय म्हणून कॉपर (तांबे) या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला जातो. जर पिकामध्ये तांब्याची कमतरता असेल तर बुरशींना अटकाव करणाऱ्या लिग्निनची निर्मिती होत नाही. लिग्नीन तयार न होण्यासोबतच शर्करा जमा होत असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

विविध अन्नद्रव्यांचे रोग प्रतिबंधात्मक कार्य

क्र. अन्नद्रव्ये प्रतिबंधात्मक कार्य

१. नत्र अ) अति प्रमाणात नत्राचा वापर: अति हिरवेगार पीक, जास्त वाढ झाल्यास अपायकारक घटकांचा (पॅथोजन) परिणाम होतो.

ब) नत्राचे अतिशय कमी प्रमाण: पिकाची वाढ खुंटल्यास अपायकारक घटक परिणाम करतात.

२. स्फुरद डाऊनी मिल्ड्यूचा प्रतिबंध होतो.

३. पालाश अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापराकरिता विशेषत: नत्राचा वापर योग्य प्रमाणात होतो. पिकांच्या गुणवत्तेत वाढ होते. उदा. प्रथिनांच्या प्रमाणात वाढ. पालाशमुळे थंड वातावरणात पिकांची वाढ व विकास योग्य प्रमाणात होतो.

४. कॅल्शिअम अपायकारक जिवाणू, बुरशी यांचा पेशीमध्ये शिरकाव न होऊ देणे. कॅल्शिअम हा पेशीभित्तिकेचा घटक आहे.

५. जस्त जस्त कमतरतेमुळे पानावर शर्करा साचते. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन भुरी रोगाचा प्रसार होतो. जर जस्ताचे प्रमाण योग्य असल्यास बुरशी प्रसारास अटकाव होतो.

६. बोरॉन जस्ताप्रमाणेच बोरॉन अन्नद्रव्यांमुळे बुरशीजन्य रोग प्रतिबंधात्मक कार्य घडते.

७. तांबे अन्नद्रव्य म्हणून असणाऱ्या गरजेपेक्षा १० ते १०० पट जास्त बुरशीनाशक म्हणून वापर करावा लागतो.

८. मँगनीज जमिनीद्वारे विशिष्ट प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यास मँगनीज मदत करते.

डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com