Soil Organic Carbon Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

Indian Agriculture : सेंद्रिय खते आणि पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. जमिनीची संरचना सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.पीक काढणीनंतर उर्वरित अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.

Team Agrowon

प्रियंका दिघे, डॉ. राहुल नवसारे

Agriculture Management of Soil Organic Carbon : वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये पालापाचोळा, चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतामधून सहज उपलब्ध होतात. यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असते. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरविली जाते. ज्या जमिनीमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते ती शेतीसाठी अयोग्य ठरते.

जमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा चार टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो, तेव्हा याची सुपीकता चांगली असते.सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असतो. उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात. ते मृत झाल्यावर त्यांच्या विघटनामधून ही सर्व मूलद्रव्ये पिकांना पुन्हा सहजपणे उपलब्ध होतात.

सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. मात्र जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते.

सेंद्रिय खते आणि पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. हे गुणोत्तर जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय पदार्थ कुजण्यास वेळ लागतो. हे गुणोत्तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतात १२:१ ते २०:१ यादरम्यान अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६० टक्क्यापेक्षा जास्त असावे.

सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे :

सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ टक्का) असण्याची मुख्य कारणे शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण, पीक फेरपालट न करणे, मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते.

सेंद्रिय कर्बाचे फायदे :

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या वापरामुळे ९० ते ९५ टक्के नायट्रोजन, १५ ते ८० टक्के फॉस्फरस आणि ५० ते २० टक्के सल्फरचे स्थिरीकरण करते.

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या वाढीमुळे जमिनीतील निष्क्रिय खनिज द्रव्ये सक्रिय स्वरूपात आणली जातात.

सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीव वाढीस प्रोत्साहन देते, कारण जमिनीतील सूक्ष्मजीव कर्बावर आपली उपजीविका करत असतात. हे कर्ब त्यांना जमिनीतील अन्नद्रव्ये, पालापाचोळा, मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मिळते. याच बरोबर विघटनामधून सूक्ष्मजीव वनस्पतीसाठी आवश्यक मूलद्रव्येदेखील जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वनस्पती जमिनीतील सूक्ष्म जिवांवर अवलंबून असतात.

सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे जमिनीतील खनिजद्रव्यांचे स्थिरीकरण वाढते. जमिनीतील अन्नद्रव्यांची धारणक्षमता वाढून त्यांना एकत्रित बांधून ठेवते.

जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिरता वाढल्यामुळे जमिनीची विद्युत वाहकता सुधारते.

जमिनीच्या योग्य मूलद्रव्ये पुरवठ्यामुळे जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते.

जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. या सेंद्रिय पदार्थांचे विघटन झाल्यानंतर ह्युमस आणि ह्युमिक ॲसिड तयार होते. ह्यूमस जमिनीची सुपीकता वाढविते. जमिनीची संरचना सुधारण्यास मदत करते.

ह्युमसचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते.

या पोकळीमुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते.

जमिनीची संरचना सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. यामुळे झाडांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

पाणी निचरा होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये दिलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता वाढून त्यांचा ऱ्हास कमी होतो.

सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे उपाय :

सेंद्रिय खतांकडे वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरविणारे स्रोत एवढ्यापुरतेच पाहू नये. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास रासायनिक जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील स्थिर झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्थितीत येतात. पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेचे शेणखत, सेंद्रिय घटक वापरावेत.

ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे.

सेंद्रिय खत चांगले कुजवावे, अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला, तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून तणे, किडी, अपायकारक बुरशींचा प्रसार होतो, हे लक्षात घ्यावे.

सेंद्रिय खत आपल्या शेतावरच तयार करावे किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळ खत तयार करावे.

हिरवळीची पिके, शेतातील पिकांचे अवशेष, काडीकचरा, पालापाचोळा यांच्यावर कुजण्याची प्रक्रिया करून याचाही उपयोग सेंद्रिय कर्बाच्या निर्मितीसाठी करता येतो.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाययोजना :

पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी, जेणेकरून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण होते.

शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे.

क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके पेरून ४० दिवसांनी गाडावीत. उसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.

उभ्या पिकांत निंबोळी पेंडीचा वापर करावा.

पीक काढणीनंतर उर्वरित अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा.खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.

चोपण जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा व भूसुधारकांचा (उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा.

कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.

जैविक खतांचा बीज प्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून योग्य प्रमाणात वापर करावा.

ठिबक सिंचन किंवा तुषार सूक्ष्मसिंचनाद्वारे पाणी तसेच खतांचे नियोजन करावे.

संपर्क : प्रियंका दिघे, ९६६५५१२३५८

(मृद् व कृषी रसायन शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT