Soil Pollution : मातीतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

Soil Conservation : गायरान, वने, पडीक जमिनी आणि परिसरातील झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी, मातीची धूप वेगाने होत आहे.
Soil Pollution
Soil PollutionAgrowon

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. सागर बंड, डॉ. रमेश चौधरी

Soil Health : मातीची धूप आणि प्रदूषण होण्याची काही कारणे ः
- गायरान, वने, पडीक जमिनी आणि परिसरातील झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी, मातीची धूप वेगाने होत आहे.
- शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढत चालला आहे. सोबतच शेतातील काडीकचरा, गव्हाचा भुसा आणि उसाचे पाचट शेतातच जाळले गेल्याने सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त सूक्ष्मजीवही मोठ्या प्रमाणात जळून जातात.
- शहरी आणि कारखान्यातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना सिंचनासाठी वापरले जाणे, हेही माती प्रदूषणाचे मुख्य कारण ठरत आहे.

भूपृष्ठावरील जमीन किंवा माती हा नैसर्गिक घटक असून, त्याचा वापर विविध कारणासाठी केला जातो. (उदा. मानवी वसाहती, शेती, वनस्पती, खाणकाम, उद्योगधंदे, जलसाठे इ.) काही जमिनीवर पावसाच्या अभावामुळे वाळवंटे, ओसाड प्रदेश आहेत, तर मोठा भाग समुद्राने व्यापलेला आहे. भूपृष्ठावरील खडकाळ जमिनीतील खडकांची झीज होऊन त्यापासून ‘मृदा’ (माती) तयार होते. खडकापासून मृदा निर्माण होण्यास हजारो वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे खडकातील मूळ गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. तेथील मृदा ही थोड्या प्रमाणात सुपीक किंवा नापीक असते. या भूमीवरील माती किंवा मृदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणतो. या मृदेमध्ये योग्य ते पोषक द्रव्ये असल्यास, त्यात सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक तितक्या आर्द्रतेचा पुरवठा होत असल्यास अशी जमीन वनस्पतींच्या लागवडीसाठी सुपीक मानली जाते. या मातीवर वातावरणातील तापमानाचाही परिणाम होत असतो.

Soil Pollution
Pollution Control : प्रदूषण नियंत्रणात जैवप्लॅस्टिक मोलाची भूमिका बजावेल

सूर्यापासून मिळणारी उष्णता महत्त्वाची असते. अति थंड हवामानाच्या भागात मृदा बर्फाने आच्छादलेली राहिल्याने तिथे शेती करता येत नाही. तसेच अतितीव्र उष्ण हवामानातही मृदा ही नापीक आणि वाळवंटी असते. येथेही शेती करण्यात अडचणी येतात. पृथ्वीवरील समुद्र, वाळवंट, डोंगराळ, खडकाळ अशा जमिनी वजा केल्यास फारच कमी जमीन वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य असल्याचे आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे योग्य हवामान, योग्य पाऊस मिळणाऱ्या भागातील मृदा ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाढीला योग्य असते. या मृदेतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात. मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपण मानवाने जमिनीच्या सुपीकतेच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमीन, पाणी दैनंदिन रासायनिक घटक आणि विषारी पदार्थांची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळे मोलाची जमीन प्रदूषित व खराब होत आहे.

Soil Pollution
Soil Nutrient Index : मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक

मृदा प्रदूषणाची कारणे
१) जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर-
जमिनीमध्ये उपलब्ध खनिजांचा वापर पिकांच्या पोषणासाठी होत असतो. मात्र गेल्या काही वर्षांत एकामागून एक सलग पिकांची लागवड करत गेल्यामुळे जमिनीमध्ये पोषक घटकांची कमतरता भासू लागली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्यामुळे चांगले पीक उत्पादनही मिळाले. मात्र खताच्या वापरामुळे उत्पादन चांगले येते, हे लक्षात आल्यानंतर खतांचा अनावश्यक वापर सुरू झाला. पिकांच्या संरक्षणासाठी कीडनाशकांचा वापरही वाढला. या दोन्ही घटकांच्या अतिरेकामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण वाढले. जमिनीचा कस कमी झाला. रासायनिक घटकांच्या विषारीपणामुळे शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा नाश होत गेला. कीटकनाशकांतील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फर डायऑक्साईड हे वायू तयार होऊन जमिनीतून असह्य दुर्गंधी येते.

२) शेतीतील सिंचन व मशागत पद्धतींचा वापर-
मोठे पाऊस किंवा अतिरिक्त प्रमाणात दिल्या गेलेल्या पाण्यासोबत ही रसायने व कीडनाशके निचरा होऊन परीसरातील जलस्रोतांमध्ये आणि भूजलामध्येही मिसळली जात आहेत. परिणामी, पिण्याचे पाणीही प्रदूषित बनत चालले आहे.
पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्याने पाणी शेतात साचून राहते. जमिनीच्या खालच्या थरातील क्षार हे वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा असतात. या अनावश्यक पाण्यामुळे व मृदेचा वरचा थर खारट, नापीक व कडक (टणक) बनतो. जास्त पाणी दिल्याने पीकही चांगले येऊ शकत नाही. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले गेले पाहिजे.
शेतातील मशागतीमध्ये नांगरणी, कुळवणी, पेरणी, खुरपणी इ. कामे शेतजमिनीच्या मगदुरानुसार केली पाहिजेत. जमिनीला योग्य बांधबंदिस्ती करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणारी माती व त्यातील सुपीक द्रव्ये वाचवता येतात.
३) पीक पद्धती ः जमिनीत सलग तीच पिके वारंवार घेतल्यास जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण वेगाने कमी होते. मृदा नापीक बनत जाते. पीक पद्धतीमध्ये एकापेक्षा जास्त पिके घेताना जमिनीच्या बेवडाचा, त्यातही कडधान्य किंवा शेंगावर्गीय पिकांचा समावेश करावा. या पिकांच्या मुळांवर गाठी येऊन जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे आणि नत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पिकांच्या शिफारशीप्रमाणे आवश्यकतेइतकेच पाणी किंवा खते देण्याविषषी शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे.


मृदा प्रदूषणाचे परिणाम
१) औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम : जमिनीवर टाकलेला उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरात आणलेल्या रासायनिक टाकाऊ घटक जमिनीवर टाकले गेल्यामुळे ती जमीन नापीक होते. मातीसोबतच हवा, पाण्याचे प्रदूषण वाढते. त्यातील रोगकारक घटकांची वाढ होऊन रोगांच्या साथी पसरतात. टाकाऊ घटकांमध्ये जड धातू किंवा किरणोत्सारी पदार्थ असल्यास ते जलचर, जमिनीवरील वनस्पती, पिके यांच्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. उदा. कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ.

२) जंगलतोडीचे परिणाम : वाढत्या लोकसंख्येच्या गरजांच्या पूर्ततेसाठी जंगलाखालील जमीन वेगाने कमी होत चालली आहे. शेतीसोबतच मानवी वस्त्या, शहरे, कारखाने, विविध प्रकल्प निर्मितीसाठी पहिले आक्रमण हे जंगल क्षेत्र, गायरान, पडीक जमिनी यावर होत आहे. जंगले घटल्याने भूपृष्ठावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड, ओसाड, कोरडी आणि नापीक होतात. असह्य उष्णतेने अनेक जिवांचे बळी जातात. वातावरणातील प्राणवायू व कार्बन डायऑक्साइड यांचा समतोल ढासळतो.

उपाययोजना ः
१) जलसंचयन व जंगलक्षेत्रात वाढ करणे : जमिनीची धूप थांबविण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी अडविण्याची आवश्यकता आहे. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने बांध घालणे, त्या क्षेत्रात लवकर लवकर वाढणाऱ्या वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड करावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या ३३% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरण संतुलित राखण्यासाठी नियम आहे.
२) मशागत व पीक पद्धती ः
शेतीची मशागत उदा. नांगरणी, पेरणी इ. आडव्या दिशेत करावी, मशागती उताराच्या दिशेने करणे शक्यतो टाळावे. शेतात सलग एकच पीक वारंवार घेऊ नये. शेतीतील फेरपालट करताना जमिनीचा कस, मातीची सुपीकता ज्या पिकांनी वाढू शकते तशीच पिके जमिनीमध्ये घ्यावीत. जमिनीवर गवतांचे तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन वाढवावे. त्यामुळे मातीची हानी होणार नाही. मृदा सुपीक तसेच निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत किंवा इतर सेंद्रिय खते वापरावीत. मातीचे प्रदूषण विषारी वायूंमुळेदेखील होते. त्यामुळे शेतातील काडीकचऱ्याच्या ज्वलनामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे जमिनीमध्ये विषारी वायू निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेणे फार महत्त्वाचे ठरेल.

३) सिंचनाची व्यवस्था : पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचनाने जवळजवळ ७० टक्के पाण्याची बचत होते, त्याला प्राधान्य द्यावे.
४) शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांचे प्रमाण कमी करणे : शिफारशीप्रमाणे एकात्मिक खत आणि कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे शेतातील रसायनांचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत होईल. शक्य असल्यास सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरतो.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१
(सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com