Betel leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Leaf Reddening Disease Management: ‘पाने लाल होणे’ विकृतीचे व्यवस्थापन

Cotton Crop: कपाशी पिकांमध्ये पाने लाल रंगाची होण्याची विकृती दिसून येते. या विकृतीला शेतकरी स्थानिक भाषेत ‘लाल्या’ व इंग्रजीमध्ये ‘लिफ रेडनिंग’ या नावानेही ओळखतात.

Team Agrowon

डॉ. भाऊसाहेब पवार, डॉ. पवन कुलवाल

कपाशी पिकांमध्ये पाने लाल रंगाची होण्याची विकृती दिसून येते. या विकृतीला शेतकरी स्थानिक भाषेत ‘लाल्या’ व इंग्रजीमध्ये ‘लिफ रेडनिंग’ या नावानेही ओळखतात. पानांमध्ये मुख्यतः ॲन्थोसायनिन या रंग द्रव्याच्या निर्मितीमुळे पाने लाल दिसतात. ही कपाशीमधील विकृती असून, बुरशी, जिवाणू अथवा विषाणू यांच्यामुळे पसरणारा रोग नाही. पाने लाल होण्याची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर दिसून येतात.

नंतर हळूहळू संपूर्ण वनस्पतीमध्ये ही लक्षणे पसरतात. याची सुरुवात पानांच्या कडा पिवळसर पडण्यापासून होऊन हळूहळू संपूर्ण पान लाल होते. सामान्यतः पानांचा रंग हिरवा ते पिवळा आणि नंतर लाल होतो. काही वेळा हिरवी पाने थेट लाल रंगात बदलू शकतात. कालांतराने पाने कोरडी पडतात आणि शेवटी गळतात.

पाने लाल पडल्यामुळे बोंडाचे पोषण मंदावते, अशी बोंडे अपरिपक्व अवस्थेत फुटतात. एकंदरीत उत्पादनात मोठी घट होते. कपाशीची पाने लाल होण्यामागे जमीन, हवामान, निवडलेले वाण, खतांचे अयोग्य नियोजन व किडींचा प्रादुर्भाव असे अनेक कारणे आहेत.

कापसाची पाने लाल होण्याची कारणे

हवामान ः हवामानातील बदलांचा कपाशी पिकांवर मोठा परिणाम होऊन पाने लाल होतात. दिवसा उष्ण व रात्रीच्या वेळी १५ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान यामुळे पानातील हरितद्रव्याचे विघटन होऊन ॲन्थोसायनिन हे रंगद्रव्य तयार होते. या रंग द्रव्यामुळे पानांचा रंग लाल होतो.

अन्नद्रव्यांची कमतरता ः ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कापसाच्या झाडाला कमी सूर्यप्रकाश मिळतो. मुसळधार पावसामुळे जमिनीत पाणी साठून झाडाला पोषक तत्त्वे घेणे कठीण होते. सप्टेंबरमध्ये झाडे बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असतात. या अवस्थेत बोंडे विकसित करण्यासाठी अन्नद्रव्ये वापरली जातात. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने लाल होऊ शकतात. ही समस्या पीक फुले आणि बोंड विकासाच्या अवस्थेत असताना जास्त दिसून येते. पानातील नत्राचे बोंडाकडे वहन होते. त्यामुळे पाने पिवळसर होऊन नंतर वाळतात.

विशेषतः हलक्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता, पाण्याची कमतरता किंवा पाणी साचून राहणे यामुळे पोषक तत्त्वाचे वहन कठीण होते. स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने लाल होण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पाने लाल होतात. उदा. मॅग्नेशिअम. लोह आणि मँगेनीजच्या कमतरतेमुळे बोंडे व्यवस्थित उघडत नाहीत, अशा बोंडात बोंडसड दिसून येते. हलक्या जमिनीत पाण्यासोबत नत्राचाही निचरा होतो. तर पाणथळ व चिबड जमिनीत पाणी साचून राहिल्याने अन्नद्रव्याचे व्यवस्थित शोषण होत नाही.

उपाययोजना

काही संकरित वाणामध्ये लालसर पानांची विकृती जास्त प्रमाणात दिसून येते,

त्यामुळे अशा संवेदनशील वाणांचा वापर टाळावा.

जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पीक फेरपालट करावी. एकाच शेतात सतत कापूस पीक घेऊ नये. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

पेरणीची योग्य वेळ पाळा. शक्यतो जून महिन्यात पेरणी उरकून घ्यावी. १५ जुलैनंतर पेरणी करू नये. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत प्रतिकूल पर्यावरणीय रात्रीचे कमी तापमान टाळण्यासाठी वेळेत पेरणी आवश्यक.

शेतात पाणी साचू देऊ नये. चिबड व हलक्या जमिनीत कपाशीची लागवड टाळावी.

पुरेशा प्रमाणात सिंचन करून पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.

खतांचा संतुलित आणि वेळेवर वापर करावा.

माती परीक्षणामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागवडीपूर्वी फॉस्फरस, पोटॅशिअम, सल्फर या खतांची वेळीच पूर्तता करावी.

कापूस पिकामध्ये सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खताचा वापर करून पुरेसा सेंद्रिय कार्बन उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा.

एकूण पिकाच्या १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास लक्षणे दिसेपर्यंत ८-१० दिवसांच्या अंतराने डीएपी किंवा युरियाची (२ टक्के) प्रमाणे (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

पाते व बोंडे लागताना १० ग्रॅम प्रति लिटर (१ टक्का) मॅग्नेशिअम सल्फेटची फवारणी करावी.

तुडतुड्यांचा नियंत्रणासाठी एकरी १५ पिवळे चिकट सापळे लावावेत. रस शोषक किडींपासून पिकांचे संरक्षण करावे.

विकृती आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने लाल होणे यातील फरक कसा ओळखावा?

बहुधा सुरुवातीच्या वाढीच्या काळात कोवळ्या पानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळेही पाने लाल दिसतात. तुडतुड्यांनी पानावर हल्ला केल्यानंतर सुरवातीला कपाशीच्या खालच्या भागातील पाने गुंडाळलेली व आकसलेली दिसतात. त्या पानांच्या कडेला सुरुवातीला पिवळेपणा दिसतो व त्यानंतर एक ते दोन आठवड्यांत पानांच्या कडा लाल होतात. अशा पानांच्या कडा कपाच्या आकारात वर वळतात. पाने त्यांची मजबुती गमावतात. प्रादुर्भावाच्या पुढील अवस्थेत संपूर्ण झाडाची पाने गुंडाळलेली व आकसलेली दिसतात. झाडाची वाढ खुंटते. पाने लाल होण्याच्या विकृतीमध्ये सुरुवातीपासूनच संपूर्ण पानावर लाल चट्टे दिसतात.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.  पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

- डॉ. भाऊसाहेब पवार,

७५८८६०४०९० (कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT