Onion Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Pest Management : कांद्यावरील करपा रोग, फुलकिडीचे व्यवस्थापन

Crop Disease Control : बदलत्या हवामानामुळे कांदा पिकामध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिकूल हवामान स्थितीमध्ये कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकात सुमारे ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय गावडे, मीनल पोखरकर

Onion Farming Solutions : बदलत्या हवामानामुळे कांदा पिकामध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिकूल हवामान स्थितीमध्ये कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकात सुमारे ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. कांदा पिकावर काळा करपा, तपकिरी करपा, जांभळा करपा या रोगांचा तसेच मावा, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नुकसानीच्या प्रकारानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे.

काळा करपा (Anthracnose)

रोगकारक बुरशी : कोलेटोट्रीकम ग्लेओस्पोराइड्स

लक्षणे

पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळ राखाडी ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढतात. या काळ्या बुरशीचे प्रमाण वाढल्यावर पाने वाळतात.

रोगग्रस्त पात आकुंचल्यासारखी होऊन कोलमडते.

रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.

पोषक हवामान

अयोग्य निचरा, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस.

दमट आणि उबदार हवामानात बुरशीची वाढ झपाट्याने होते.

हा रोग कुजलेल्या झाडांचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि कांदा यांच्या मार्फत पसरतो.

जमिनीतून पावसाच्या थेंबामार्फत एक झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार होतो.

उपाययोजना

योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी.

लागवड सरी वरंब्यावर करावी.

रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. वाफ्यामध्ये पाणी साचू देऊ नये.

पुनर्लागण करतेवेळी रोपे, कार्बेन्डाझिम (०.१ टक्का) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझॅब (६३ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) या प्रमाणे दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.

तपकिरी करपा

कांदा तसेच बीजोत्पादनाच्या पिकावर अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

प्रसार : हवेमार्फत

साधारण १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रतेत प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.

लक्षणे

पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरील भागांवर दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.

फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाळून मोडतात.

उपाय

पेरण्यापूर्वी बियाणास ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात २० मिनिटांसाठी बुडवून ठेवावे. जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य होईल.

प्रादुर्भाव दिसताच प्रति लिटर पाण्यात,

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा

क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा

हेक्झाकोनॅझोल १ मिलि

या प्रमाणे मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.

प्रभावी नियंत्रणासाठी कांदा उत्पादक भागात सामूहिकपणे एकाच वेळी रासायनिक फवारणी नियंत्रण करावे.

रासायनिक फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी

फवारणी सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ४ ते ७ या वेळेतच करावी.

नियंत्रण प्रभावी होण्याकरिता फवारणी द्रावणात १ मिलि स्टिकर प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळावे.

जमिनीत पुरेसा वापसा असताना फवारणी करावी.

एकच कीटकनाशक सतत वापरू नये. कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फुलकिडे

रब्बी व उन्हाळी कांद्यामध्ये फुलकिडी, मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

या किडींमुळे उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होते.

या किडी बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतात.

फुलकीड

फुलकिडे लहान, पिवळ्या रंगाचे असून, पिकाच्या गाभ्यामध्ये व पातीतील रस शोषून घेतात.

रसशोषण केल्यामुळे पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन आणि गुणवत्तेत घट येते.

पातीचा गाभा उचकून पाहिल्यास किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

प्रादुर्भावाच्या अवस्था

प्रारंभिक अवस्था : लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत, पानांचे शेंडे पिवळे पडतात. पाने वाकडी होतात.

नंतरची अवस्था : पानांवर पांढरे किंवा चांदीसारखे डाग दिसतात. यालाच ‘टाक्या’ असे म्हटले जाते.

गंभीर प्रादुर्भाव : संपूर्ण झाड बुरसटलेले दिसते आणि पिकांची वाढ खुंटते.

पिले आणि प्रौढ फुलकीड पाने खरडून पानांतील रस शोषून घेतात. किडीने रसशोषण करताना केलेल्या जखमांमधून जांभळा, काळा आणि तपकिरी करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास प्रभावी कीड नियंत्रण मिळविणे शक्य होते.

एकात्मिक व्यवस्थापन

निंबोळी अर्क ५ मिलि किंवा अझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.

कांदा लागवडीच्या ३० दिवसआधी पिकाभोवती दोन ओळी मका किंवा एक ओळ मका आणि एक ओळ गहू लागवड करून फुलकिड्यांच्या हालचाली प्रतिबंधित करता येतात.

माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

नत्राचा संतुलित वापर करावा. नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

लागवडीनंतर ७ ते ८ दिवसांनी, एकरी ४० निळे सापळे पिकाच्या उंचीप्रमाणे लावावेत.

लागवडीनंतर ३० दिवसांनी, लेकॅनीसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या करा.

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास, (फवारणी ः प्रति लिटर पाणी)

फिप्रोनिल (५ टक्के एससी) २ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा

प्रोफेनोफॉस (५० टक्के ई.सी) १ मिलि किंवा

कार्बोसल्फान (२५ टक्के ईसी) २ मिलि

(लेबलक्लेम शिफारशी आहेत.)

- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०, (डॉ. दत्तात्रय गावडे हे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे येथे, तर मीनल पोखरकर या कीटकशास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

Banana Price: बऱ्हाणपूर येथे केळीला कमाल २८०० रुपये दर

Ashwagandha Farmers Crisis: अश्वगंधावरील निर्बंधांमुळे शेतकरी अडचणीत

Rural Economy: सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत : मोहोळ

Modern Education: विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पायाभूत सुविधा देणे गरजेचे; उपमुख्यमंत्री पवार

SCROLL FOR NEXT