Ahilyanagar News : राज्यात यंदा रब्बी हंगामात आतापर्यंत ज्वारीची १४ लाख २४ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या ८१ टक्के आतापर्यंत ज्वारी पेरली आहे. यंदा पावसाळ्यातील पावसाची स्थिती आणि लवकर पेरण्या सुरू झाल्याने ज्वारी क्षेत्र वाढेल, असा अंदाज होता. मात्र फारशी वाढ झाली नाही. अजून कृषी विभागाचा अंतिम पेरणी अहवाल निश्चित झालेला नाही, मात्र ज्वारीचा पेरणी कालावधी संपल्याने आता फारसे क्षेत्र वाढेल असे दिसत नाही.
राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत रब्बीची ५६ लाख ७२ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १२४ टक्के पेरणी झाली आहे. यंदा आतापर्यंतच पेरणीने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहु हे प्रमुख पीक आहे. यावर्षी पावसाळ्यात पाण्याची स्थिती चांगली होती.
त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाकडून बांधला जात होता. मात्र यंदाही फारशी ज्वारी क्षेत्रात वाढ झालेली नाही. आतापर्यंत ज्वारीची १४ लाख २४ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आता ज्वारी पेरणीचा कालावधी संपल्यात जमा आहे. कृषी विभागाने अजून अंतिम पेरणी अहवाल निश्चित केला नसला तरी ज्वारीचे क्षेत्र आता फारसे वाढेल असे दिसत नाही. विदर्भासह काही जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र अल्प आहे.
राज्यात २६ डिसेंबरपर्यंत राज्यात गव्हाची १० लाख ५४ हजार ५५०, मकाची ४ लाख १ हजार ७०८, हरभऱ्याची २५ लाख ७४ हजार ४१८, करडईची ३१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा गव्हाची ३ लाख ६७ हजार हेक्टर, मकाची १ लाख ६५ हजार हेक्टर आणि हरभऱ्याची ५ लाख ७२ हजार हेक्टरवर गतवर्षीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. यंदा गहु, कांदा, मकाचे क्षेत्र रब्बीत वाढत असल्याचे दिसत आहे.
बाजारात आवक, पण दर नाहीच
राज्यात डिसेंबरपासून बाजारात ज्वारीची आवक सुरू होते. फेब्रुवारीत आवक अधिक होत असते. ज्वारीसाठी अहिल्यानगर बाजार समिती प्रसिद्ध आहे. सध्या येथे दररोज तीनशे क्विंटलपर्यंत आवक होत आहे, मात्र ज्वारीला यंदाही फारसा दर नसल्याची स्थिती आहे. सध्या बाजारात प्रति क्विंटलला तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच दर मिळत आहे. ग्राहकांची मागणी असूनही खर्चाच्या तुलनेत सध्या दर मिळत नाही. अनेक वर्षांपासून ज्वारीच्या दरात फारसी वाढही झालेली नाही. त्यामुळे ज्वारीचे सुधारीत वाण असूनही केवळ दर नसल्याने आणि मिळणारा दर परवडत नसल्यानेच ज्वारीचे क्षेत्र वाढत नाही असे जाणकार सांगतात.
जिल्हानिहाय ज्वारीचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
नाशिक ः ४,०८४, धुळे ः १२,०१६, नंदुरबार ः ५,७३६, जळगाव ः ४८,२१७, अहिल्यानगर ः १,४८,४९३, पुणे ः ८५,२५४, सोलापूर ः २,४०,१९४, सातारा ः १,२९,२७४, सांगली ः १,१८,५२२, कोल्हापूर ः ११,२३०, छत्रपती संभाजीनगर ः ३०,३३०, जालना ः ८२,८७७, बीड ः १,५४,१२४, लातुर ः ३५,०१२, धाराशीव ः १,६१,६६१, नांदेड ः ३२,७९४, परभणी ः ८९,३३१, हिंगोली ः १३,२०२, बुलडाणा ः १२,९८५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.