Nanded News : खरीप हंगामाला सुरुवात झाली, तरी जिल्हा व ग्रामीण बँका सोडल्या, तर राष्ट्रीय व खासगी बँकांकडून पीककर्ज वाटप प्रक्रिया संथपणे सुरू आहे. २४ जूनपर्यंत ७० हजार ८४४ शेतकऱ्यांना ६५४ कोटी १० लाख कर्जाचे वाटप केले आहे. केवळ ३५.८३ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या वेळेपर्यंत ७० टक्के वाटप होणे अपेक्षीत होते. परंतु राष्ट्रीयीकृत राष्ट्रीय व खासगी बँकेच्या संथ गतीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसून शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ज्यांना पीककर्ज मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी तोपर्यंत उधारी, उसनवारी करत बियाणे, खतांची खरेदी केली आहे. एप्रिलपासूनच जिल्ह्यात पीककर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली. परंतु बहुतांश खासगी बँका कर्जाच्या वाटपास सकारात्मकता दाखवत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्याला या वर्षी १८२५ कोटी ७३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ७० हजार ८४४ शेतकऱ्यांना ६५४ कोटी १० लाख कर्जाचे वाटप केले आहे. यात राष्ट्रीयीकृतमध्ये एसबीआय, तर खासगीमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, महाराष्ट्र ग्रामीण आणि डीसीसीकडून चांगले पीककर्ज वाटप होत असले, तरी काही बँकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो. साप्ताहिक अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, ३० जूनपूर्वी कर्ज वितरण झाले तरच ते शेतकऱ्यांच्या उपयोगाला येईल.
कर्जवाटपाचा साप्ताहिक लेखाजोखा
जिल्हा मध्यवर्ती बँकेला ४१६ कोटी ९१ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले. यात २९ हजार २७६ शेतकऱ्यांना २३९ कोटी ३३ लाख रुपये कर्जाचे वितरण केले. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी ५७.४१ इतकी आहे. व्यापारी/खासगी बँकेला ९९३ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात १२ हजार ६२७ शेतकऱ्यांना १६२ कोटी ७२ लाख कर्जाचे वितरण केले. १८.३८ कर्ज वितरणाची टक्केवारी आहे. या बँका कासवगतीने कर्जाचे वितरण करत आहेत. तर ग्रामीण बँक ४१५ कोटी ६६ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले. यात २८ हजार ९४१ शेतकऱ्यांना २५२ कोटी ५ लाख कर्जाचे वितरण केले. ६०.६४ कर्ज वितरणाची टक्केवारी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.