Hingoli News : जिल्ह्यात यंदा ता. २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या मॉन्सूनोत्तर (अवेळी) पावसामुळे २ लाख ५७ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार ८८६ हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०३ कोटी ८३ लाख २ हजार ४०० रुपये निधी अपेक्षित आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या सर्व पाच तालुक्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला. २७ नोव्हेंबरला हिंगोली, बासंबा, डिग्रस कऱ्हाळे, माळहिवरा, कळमनुरी, नांदापूर, वाकोडी, हट्टा, औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, जवळा बाजार या १२ मंडलात अतिवृष्टी झाली.
नाले, नद्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेली.जोरदार पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचून राहिले. अवेळी पावसामुळे खरिपातील कापूस, तूर, रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, करडई यासह हळद, ऊस, विविध फळपिके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र ७९ हजार ४०२ हेक्टर होते. परंतु नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील २ लाख ५७ हजार ४८७ शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या २ लाख ४१ हजार १९४ पैकी १ लाख २१ हजार ८८६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यात सर्व पाच तालुक्यांतील १ लाख २१ हजार ७२४ हेक्टरवरील शेतीपिके व वसमत व औंढा नागनाथ तालुक्यांतील १६२ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. जिरायती क्षेत्रातील पीकनुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये नुसार १०३ कोटी ४६ लाख ५७ हजार ४०० रुपये व फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपयांनुसार ३६ लाख ४५ हजार रुपये असा एकूण १०३ कोटी ८३ लाख २ हजार ४०० रुपये निधी अपेक्षित आहे असे सूत्रांनी सांगितले.
मॉन्सूनोत्तर पाऊस बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये), अपेक्षित मदत निधी (कोटी रुपये)
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी
हिंगोली ५९८१३ २९९५६ २५.४६२९
कळमनुरी ५१२३७ २३३३५ १९.८३४७
वसमत २७०२२ १७३९० १४.९६६३
औंढा नागनाथ ५७९९६ २३५६० २०.०६८०
सेनगाव ६१४१९ २७६४५ २३.४९८२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.