Pune News : ‘‘शेतकऱ्यांवर अन्याय करणारे शेतीविषयक धोरण केंद्र सरकारला बदलावे लागेल. शेती व शेती उद्योगात राजकारण न आणता एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे शनिवारी (ता.१३) केले.
येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते झाला. यानंतरच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, विशाल तांबे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, देवदत्त निकम, प्रकाश म्हस्के, अनंतराव चौगुले आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या शेती विधायक धोरणात सततच्या फेरबदलाने शेतकरी अडचणीत येतात. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज आहे. ब्राझीलमध्ये उसापासून गरजेनुसार साखरेची निर्मिती केली जाते.
विमानाचे इंधन सुद्धा उसापासून करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात शेतीमुळे विकासदर चांगला राखण्यात यश आले होते. कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लादल्याने बाजारभावातील मंदीचा शेतकऱ्याला फटका बसला.’’
थोरात म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने साखरेची निर्यात बंदी व इथेनॉलवरील निर्बंधामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. ग्राहकांना साखर स्वस्त द्या पण त्याची झळ शेतकऱ्यांच्या खिशाला बसू देवू नका.’’ डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेण्याची गरज होती. मात्र याबाबत ते काहीच न बोलल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.’’
‘‘महागाई, बेरोजगारी, शेतीमालास कवडीमोल भाव ह्या समस्या समोर असताना पंतप्रधानांनी राज्याच्या दौऱ्यात घराणेशाहीवर भाष्य केले. समाजात चांगले काम करून एखादे नेतृत्व पुढे आले तर त्यात घराणेशाही कसली ? प्रभू रामचंद्र भारत देशाची अस्मिता आहे. देशाच्या चारही शंकराचार्यांनी राम मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत मंदिरात जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अयोध्येला गर्दीच्या काळात न जाता नंतर जाणार आहे,’’ असे श्री पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.