Kerala Digital Literacy Model : केरळमध्ये ऐंशीच्या दशकात राष्ट्रीय साक्षरता अभियान चालवले गेले. केरळ साहित्य शास्त्र परिषद आणि अनेक संस्था, संघटनांनी केलेल्या कल्पक अभियानामुळे, आधी एर्नाकुलम जिल्हा आणि नंतर संपूर्ण केरळ देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले होते.
ही तर अर्धीच स्टोरी होती. प्रौढ साक्षरता क्षेत्रात केरळ राज्याचे यश बघून राष्ट्रीय पातळीवर प्रौढ साक्षरता अभियान राबवले गेले. केरळ राज्याने पथदर्शी म्हणून देखील काम केले. आता डिजिटल युगात पुन्हा एकदा केरळने प्रथम क्रमांक कमावला आहे. लवकरच केरळ स्वतःला पूर्ण डिजिटली साक्षर राज्य म्हणून घोषित करणार आहे.
२०२२ मध्ये पायलट प्रकल्प राबवला गेला होता. त्यानंतर अडीच लाख स्वयंसेवकांच्या मदतीने राज्यातील वयस्कर नागरिकांपर्यंत ही मोहीम पोचवली गेली. व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, इंटरनेट बँकिंग आणि बेसिक सोशल मीडिया कसा वापरायचा या व अशा अनेक गोष्टींचे ज्ञान आणि कौशल्य प्रशिक्षण दिले गेले. त्यांच्या परीक्षा घेतल्या गेल्या.
या समाज अर्थ घटकातील अनेक स्त्री-पुरुष, केंद्र आणि राज्य सरकारांनी चालविलेल्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी असतात. डिजिटल साक्षर झालेल्या सर्वांना डिजिटल साक्षरतेचा लाभ घेता येईल. त्या प्रमाणात त्यांचे स्वावलंबन वाढेल. आत्मविश्वास वाढेल. त्या प्रमाणात मध्यस्थांचे, दलाल यांचे प्रस्थ कमी होईल. नोकरशाही फसवणूक करण्याची शक्यता कमी होईल.
राष्ट्रीय डिजिटल अभियानानुसार ६० वर्षापर्यंत असणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना डिजिटली साक्षर करण्याचे ठरवण्यात आले आहे. पण केरळ राज्याने साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देखील प्रशिक्षित केले आहे.
साक्षरता विविध प्रकारची असते. अक्षर, भाषा, इंग्रजी भाषा, गणित, आकडेमोड, बँकिंग, वित्तीय, डिजिटल इत्यादी. लोकांकडे कौशल्ये असतात. लोक उत्पादक कामे करतात. बारा बारा तास राबतात. पण विविध निरक्षरतेमुळे लुबाडले जातात. सर्वांनी पीएच.डी. करायची गरज नसतेच मुळी. पण आपण लुबाडले जाणार नाही, आपल्या हिताचे काय, अहितकारक काय हे कळण्याएवढी साक्षरता आणि त्यातून येणारी सक्षमता मात्र प्रत्येक प्रौढाकडे हवी.
संपर्काची साधने स्वतः वापरू शकणे ही एक प्रकारची नॅनो क्रांती असते. त्यातून उत्पादकता वाढते, वेळ वाचतो पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुणावतो. याचे खूप मोठे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक लाभ असतात. त्याचे मूल्य खूप मोठे आहे. आपला भारत देश एक मानवी शरीर मानले तर केरळ त्या शरीराच्या पावलांच्या जागी आहे. ती पावले अनेक बाबतीत योग्य दिशेने चालत असतात. याची दखल शरीराने घेतली पाहिजे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.