
Wardha News : मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. त्याकरिता येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्यवस्थापन प्रणाली राज्य सरकार विकसित करीत आहे. यामुळे हिंस्र प्राण्याचा वावर वेळीच लक्षात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आर्वी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी (ता.१३) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार अमर काळे यांनी जिल्ह्याची आणि विशेषतः आर्वी भागाची भौगोलिकस्थिती आपल्या भाषणातून मांडली.
खासदार काळे म्हणाले, की वर्धा जिल्ह्यातील ६५ टक्के जंगल आर्वी मतदार संघात आहे. बहुतांश शेतकरी वन्य प्राण्यांमुळे प्रभावित होतात. या प्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होते. त्यासोबतच वन्यजीवांकडून व्यक्तींवर हल्ले देखील होतात. यातून नजीकच्या काळात १२ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे जंगलालगतच्या शिवारात धोके वाढल्याचे हे संकेत आहेत.
त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्वीच नाही तर राज्यातील वनक्षेत्रालगतचा परिसर मानवासाठी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न असल्याचे सांगितले.
त्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केला जाणार आहे. या प्रणालीचा वापर झाल्यास त्याद्वारे वाघासह इतर प्राण्यांचा वावर कोठे आहे हे कळण्यास मदत होणार आहे. त्याआधारे त्यांच्या आगमनाची पूर्वसूचना मिळेल व त्यांचे हल्ले रोखता येतील. पर्यटनासाठी देखील या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
आराखडा अंतिम टप्प्यात
वाघ व इतर प्राण्यांची माहिती तसेच ते कोणत्या भागात आहेत हे कळाल्याने पर्यटकांना अभयारण्यातील त्याच भागात जात वन्यप्राण्यांच्या सहवासाचा आनंद घेता येणार आहे. याबाबतचा आराखडा अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. पंतप्रधान सौरऊर्जा घर या योजनेचे फायदेदेखील त्यांनी यावेळी मांडले. ३०० युनिटपेक्षा कमी वीजवापर असणाऱ्या ग्राहकांचा यात समावेश केला जाईल. तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांकरिता निधी उपलब्धतेचे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.