Kagana Ranaut Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : कौर यांची कृती आणि कंगणाचा खोडसाळपणा घातकच

Dhananjay Sanap

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगणा रानौत आणि वाद यांचं गहिरं नातं आहे. जिथं कंगणा असते तिथं वाद असतात. सध्या सोशल मिडीयापासून ते मेनस्ट्रिम मीडियापर्यंत कंगणा चर्चेचा विषय ठरली. भाजपच्या तिकिटावर हिमाचलच्या मंडीमधून कंगणानं निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. त्यामुळं कंगणा बातम्यांचा विषय होतीच. पण गुरुवारी संध्याकाळी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कर्मचाऱ्यांनं कंगणाच्या कानशिलात लगावली. कानशिलात लगवणाऱ्या सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे, कुलविंदर कौर. या प्रकरणानंतर एकच गोंधळ उडला. त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोपाच्या काहूर उठलं.

या विषयाच्या मुळाशी शेतकरी आंदोलनाचा विषय आहे. कौर यांनी कंगणाच्या कानशिलात का लगावली तर कंगणानं शेतकरी आंदोलनात १००-१०० रुपये देऊन महिला आणल्या जातात, असा आरोप २९ नोव्हेंबर २०२० केला होता. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं होतं. त्याच दरम्यान कंगणानं एक ट्विट करत शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. त्यामुळं कौर यांच्या मनात कंगणाबद्दल राग होता. त्याला एक भावनिक किनारही होती ती म्हणजे कौर यांची आई त्या आंदोलनात असल्याचा कौर यांचा दावा. त्यामुळं कौर यांनी कंगणाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कायदेशीर कारवाई कौर यांच्या सुरू करण्यात आल्याच्या बातम्याही समोर आल्या.

अनेकांनी या मारहाणीचं समर्थन केलं. 'शेतकऱ्यांबद्दल बोलाल तर याद राखा', अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे पंजाबमधील शेतकरी आंदोलकांवर टोकाचे आरोपही करण्यात येऊ लागले. एखाद्या व्यक्तीची मतं पटली नाहीत. त्यामुळं मारहाण करणं लोकशाही मार्गाला धरून नाही. त्यामुळं आम्ही याचं समर्थन करत नाहीत. पण विषय गंभीर आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा वा मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळं कंगणानं शेतकरी आंदोलनावर केलेली टिका किंवा आरोप उथळ आणि बालिश वाटत असले तरी तिला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कंगणाला मारहाण करणं चुकीची कृती ठरते.

कौर यांचा राग स्वाभाविक आहे. पण त्या सनदशीर मार्गानेही राग व्यक्त करू शकल्या असत्या, हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे कंगणानं या प्रकरणानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये हितचिंतक आणि चाहत्यांना आपण सुखरूप असल्याचं सांगितलं. पण कंगणानं या व्हिडिओच्या शेवटी खोडसाळपणा केला. पंजाबमध्ये दहशतवाद आणि नक्षलवाद वाढत असल्याचं सांगत त्याला कसं हाताळलं जातं आहे, अशी टिपणी केली. शेतकरी आंदोलकांवर नक्षलवादी आणि दहशतवादी असल्याचे आरोप केले जात होते. ते भाजपच्या गोटातून अधिक जोरकसपणे करण्यात येत होते. त्याला भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांनी हातभारच लावलेला.

वास्तविक देशासमोरील प्रमुख आव्हानांपैकी दहशतवाद आणि नक्षलवाद गंभीर आव्हान आहेत. मागच्या सहा दशकांपासून या समस्यांचा सामना करताना नाकीनऊ आली आहेत. पण कंगणानं मात्र त्याचा वापर नरेटीव्ह सेट करण्यासाठी केलाय. म्हणजे एक राज्यातील संपूर्ण जनतेला ती राष्ट्रद्रोही ठरवू पाहतेय. त्यासाठी सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी समूहाला टार्गेट केलं जातं. राष्ट्रीय समस्येची मी कशी शिकार झाले, याचे दाखले देण्याकडे कंगणाचा रोख दिसला. कंगणाचा टीका आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार मान्य करूनही ती ज्या उद्देशानं आंदोलक शेतकऱ्यांचं गुन्हेगारीकरण करत आहे, त्याचं समर्थन करणंही चुकीचं आहे. त्यामुळं कंगणाची खेळी घातकच आहे.

एकूणच काय तर कंगणाच्या कानशिलात मारण्याचा प्रकार जसा सनदशीर नाही तसाच आपला आवाज उठवू पाहणाऱ्या शेतकरी आंदोलकांचं गुन्हेगारीकरण करणं लोकशाहीला मारक आहे. शेवटी अशा कृत्यांमुळं शेती आणि शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला पडतात. भावनिक मुद्दे अधिक चर्चेचे ठरतात. आणि सरतेशेवटी त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावा लागतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT