Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Disease : मुळशी तालुक्यात भात पिकावर करपा रोग

Paddy Crop : मुळशी तालुक्यातील मुठा खोरे परिसरात भातपिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Pune News : मुळशी तालुक्यातील मुठा खोरे परिसरात भातपिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

या करपा रोगामुळे उभे पीक जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी विभागाने करपाग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

मुठा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सर्व हंगाम मिळून भात हे एकमेव पीक उत्पन्नाचे आणि उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात येथील भातशेती संकटात सापडत आहे. भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किड्याने ग्रासल्याने सगळीकडे भात रोपे तांबडी, पिवळी पडली आहेत.

यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साही व आनंदी वातावरण होते; परंतु या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी चांगल्या पिकाची अपेक्षा होती; परंतु या रोगाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे.

रोग व पिकावरील लक्षणे

करपा : पानांवर शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे करड्या रंगाचे ठिपके आढळतात. पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असलेला दिसून येतो. असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो, रोप पेरात मोडते. लोंबीच्या देठाचा भाग काळा पडून कुजतो. लोंबी रोगग्रस्त भागात मोडून लोंबत राहते. लोंबीतील दाण्यावर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.

पर्णकोष करपा : चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके पडतात. रोगग्रस्त भागात बुरशी आत शिरून खोड कमकुवत करते. खोडाचा चिवटपणा कमी होऊन रोप कोलमडते. पीक करपते. लोंबी भरत नाही. दाटीने वाढलेल्या शेतात रोग मोठ्या प्रमाणात पसरतो.

या खोऱ्यातील नवीन युवक शेतीकडे वळत आहेत; परंतु रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, बाजारभाव आदी कारणांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. मुठा खोऱ्यातील या करपा रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे.
-अमोल नवसकर, युवा शेतकरी, आंदगाव (ता. मुळशी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT