Kamla Pujari Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : शाश्‍वत शेतीच्या ‘पुजारी’

Team Agrowon

Agriculture with Kamla Pujari : भारतीय कृषी क्षेत्रात स्त्रियांचे योगदान फार मोठे आहे आणि त्यास शेकडो वर्षांचा इतिहास आहे. सेंद्रिय शेती आजही टिकून आहे ती स्त्रियांमुळे हे निर्विवाद सत्य आहे. शेतामधील अतिकष्टाची कामे पुरुष वर्ग करतो मात्र त्यास लागणाऱ्या आधाराचा यशस्वी हात स्त्रीचा असतो. तिफण पुरुष चालवतो तर त्यामध्ये दाणे टाकणे, बी पेरणे ही कामे स्त्रिया करतात म्हणून तर काळी आई प्रसन्न होते. शेतामधील खुरपणी, लावणी, कापणी यामध्ये स्त्रियांचे कौशल्य सिद्ध झाले आहे.

म्हणूनच पूर्वी शेती सुजलाम् सुफलाम् होती. हरितक्रांतीनंतर काळ बदलला, शेतात संकरित पिके आली. रासायनिक खते, कीडनाशके आली. शेतीचे यांत्रिकीकरण वाढले, भूगर्भ जल तळाला गेले, विहिरी आटल्या, मोट गेली सोबत बैल ही गेले. पारंपरिक पिकांची जागा सोयाबीनसारख्या पिकांनी घेतली.

शेताच्या बांधावरचे वृक्षही गेले. स्त्रियांचे शेतीमधील महत्त्व, त्यांचा सहभाग हळूहळू कमी होऊ लागला. ज्या काळ्या आईला पूर्वी घरच्या स्त्रीच्या मायेच्या हाताचा स्पर्श होत असे तो दूर झाल्यामुळे जमीन पोरकी झाली. तिच्यामधील आपुलकी, प्रेम कमी झाले आणि तिची भक्ती फक्त पैशाच्या घंटानादावर मोजली जाऊ लागली.

हे चित्र भारतामधील जवळपास सर्वच राज्यांत आढळून येते, अपवाद फक्त ओडिशा, आसाम, ईशान्येकडील राज्ये आणि सिक्कीमचा! हा सर्व आदिवासी आणि जंगलाने समृद्ध झालेला पट्टा जेथे अजूनही शेतकऱ्यांची श्रीमंती खरीप, रब्बीमध्ये शेतात किती विविध प्रकारची पिके पेरलेली आहेत यावर मोजली जाते. हे सर्व वैभव अर्थात त्या भागामधील स्त्रियांमुळे आणि त्यांनी शेकडो वर्षांपासून जपलेल्या सेंद्रिय शेतीमुळे. येथील लोक जंगलाचा सन्मान ठेवून शेती करतात.

ओडिशा हे असेच एक राज्य जेथे आपणांस स्त्रीप्रधान भात शेती मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळते. याच राज्यामधील कलहांडी हा जेमतेम तीन जिल्ह्यांचा प्रदेश कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो जो संपूर्णपणे आदिवासी लोकसंख्येने व्यापलेला आहे. या भागात सर्वच अल्पभूधारक शेतकरी जे पूर्वी म्हणजे १९९० पर्यंत ‘कालाजिरा’ या हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सुगंधी भाताच्या पारंपरिक वाणाची शेती करत.

उत्पन्न जेमतेम एकरी २ ते ३ क्विंटल. पावसाळ्यानंतर संपूर्ण आदिवासी समाज सभोवतालच्या जंगलावरच अवलंबून असे. शेतीचे जेमतेम उत्पन्न आणि खाणारी तोंडे जास्त म्हणूनच हा भूप्रदेश कायम भुकेला! ब्रिटिश राजवटीपासून भुकेला असलेल्या या राज्यात २००० ते २००३ मध्ये सुद्धा दोनशेच्या वर आदिवासी भुकेने मृत्यू पावले होते. भूक भागविण्यासाठी येथे लहान मुलांची विक्री सुद्धा झाली. कलहांडी भूकमुक्त कशी करता येईल, या एका ध्येयानेच कमला पुजारी नावाच्या याच भागातील अत्यंत गरीब आदिवासी स्त्रीने स्वतःला झोकून दिले.

त्या मूळच्या कलहांडी जवळच्या कोरापूट जिल्ह्यामधील एका पाड्यामधील रहिवासी. लहानपणापासूनच त्यांना भातांच्या विविध वाणांचा संग्रह करण्याची आवड होती. जवळपास तीनशेच्या वर भात बियाण्यांचा संग्रह करून त्यांची स्वतःची केवळ ‘बीज बॅक’च तयार केली नाही तर त्या सर्व पारंपरिक वाणांची त्यांनी आदिवासी महिलांच्या शेतात त्यांच्या सहकार्याने लागवड सुद्धा केली. त्यांच्या कार्याचा सुगंध कोरापूट जिल्ह्यात सर्वत्र पसरला. अतिशय गरिबी असलेल्या या भागात रासायनिक खते, कीडनाशके कधी येऊ शकली नाहीत, आजही नाहीत.

कमला पुजारी यांचे सर्वांत जास्त प्रेम ‘कालाजिरा’ या हजारो वर्षे जुन्या भाताच्या जातीवर होते. हाच भात आदिवासींना त्यांच्या कृषी उत्पादनाचा मुख्य स्रोत होता. कोरापूट जिल्ह्यामध्ये असलेल्या डॉ. स्वामिनाथन संशोधन संस्थेच्या उपकेंद्रात कमला यांनी तेथील शास्त्रज्ञांना त्यांच्याकडील भाताची वाणे दिली.

उद्देश एकच दुष्काळावर मात करीत उत्पादन वाढविणे, आदिवासींची भूक भागविणे, त्यांच्या मुलांचे कुपोषण दूर करणे, घरी वर्षभरापुरता साठवण करून उरलेला भात विक्री करून त्यातून दोन पैसे मिळविणे, आदिवासींची आर्थिक परिस्थिती उत्तम करणे. त्यांच्या प्रयत्नास यश येऊन डॉ. स्वामिनाधन संशोधन संस्थेने कालाजिरा या भाताचे एकरी १५ क्विंटल उत्पादन देणारे वाण तयार केले ज्यामध्ये त्याचा सुगंध, कीड प्रतिबंधकता, दुष्काळावर मात करण्याची क्षमता कायम राहिली.

सुरुवातीस हे सुधारित वाण स्वीकारण्यास आदिवासी शेतकऱ्यांनी नकार दिला, तेव्हा कमला पुजारी यांनी हजारो महिलांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अल्पावधीतच कालाजिरा या भाताच्या सुगंधाने कोरापूट जिल्ह्याचा आसमंत भरून गेला. कलहांडी हा प्रदेशाने या भागाची ‘Land of Hunger’ ही ओळख पूर्ण पुसून टाकली आहे. या उलट त्याची नवीन ओळख ‘Odisha’s Rice Bowl’ अशी झाली आहे.

आज या भागात इंद्रावती नदी कालव्याने तब्बल २५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. विशेष म्हणजे कमला यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महिलांनी तेथील जंगल संवर्धन करून संरक्षित तर केलेच त्याचबरोबर तेथील जैवविविधता सुद्धा समृद्ध केली. या घटनेची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली.

भाताच्या पारंपरिक बियाणांच्या संवर्धनासाठी २०१२ मध्ये जागतिक कृषी वारसा स्थळ म्हणून युनेस्को आणि जागतिक अन्न संघटनेकडून कोरापूट जिल्ह्याची निवड झाली. अशी निवड झालेले भारतामधील हे एकमेव ठिकाण आहे. आज हा सर्व भूभाग कालाजिरा भातामुळे समृद्ध झाला आहे. अर्थात, यामध्ये नाबार्ड आणि ओडिशा शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य अनमोल आहे.

ओडिशा शासनातर्फे या भाताचे बियाणे पंजाब, हरियाना, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश येथील अनेक गरीब, अल्पभूधारकांना देण्यात आले आहे. कोकणामधील कुडाळ येथील काही शेतकरी या भाताचे उत्पादन घेत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मधुमेह नियंत्रण, लोह कमतरता यावर प्रभावी असलेले हे अन्न त्याच्या रंगावर न जाता गुणधर्मावर जाऊन आपल्या ताटातही याला स्थान मिळावे.

सध्याच्या वातावरण बदलाच्या प्रभावाखाली शाश्‍वत सेंद्रिय शेती करण्यासाठी कालाजिरा हे उत्तम पीक आहे. सेंद्रिय शेतीची पूजा करीत तब्बल ३४० भाताची वाणे, ८ भरडधान्ये आणि ९ डाळवर्गीय पिकांचे संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्‍या कमला पुजारी यांचे काही दिवसापूर्वीचं अकाली निधन झाले. कसलेही औपचारिक शिक्षण नसलेल्या कमला मला कायम कृषी शास्त्रज्ञांच्या भूमिकेत आढळल्या. कृषी क्षेत्राची अन्न सुरक्षा आणि अर्थार्जन यांच्यात घट्ट गुंफण करून त्यांनी फक्त भूकेवर तर विजय मिळविला त्याचबरोबर लाखो अल्पभूधारक आदिवासी महिलांना सेंद्रिय शेती कशी शाश्‍वत करता येऊ शकते, याचा मूलमंत्र दिला. पद्मश्रीने सन्मानित श्रीमती कमला पुजारी मला कायम वंदनीय राहिल्या ते याचमुळे!

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT