Jalyukt Shiwar Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : ‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ बनवू

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘जागतिक तापमान वाढीमुळे आपल्यासमोर अनेक संकटे उभी आहेत. अशावेळी पाणी जपून ठेवणे आपले काम आहे. यासाठी जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबवू,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे सोमवारी (ता. २७) व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रविशंकर उपस्थित होते. या प्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली.

या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे तसेच शेततळ्यांची कामे होणार आहेत.

यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल. कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आपण नेहमी म्हणतो, की ‘जल हे तो कल है’. पण हे पाणी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. आज हा सामंजस्य करार करून जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे.

मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार २ टप्पा राबविणार आहोत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे. कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे.’’

जलयुक्त शिवारचे देशात यश ः उपमुख्यमंत्री फडणवीस

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या २२ हजार गावांमध्ये मोठे काम झाले. केंद्राने २०२० मध्ये जो अहवाल दिला त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला असे नमूद केले आहे.

यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे. जलयुक्त शिवार दुसरा टप्पा तसेच विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत.’’

नैसर्गिक शेतीची गरज : श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर म्हणाले, की गेल्या वर्षी १ हजार शेतकरी महाराष्ट्रातून बंगळुरमध्ये आले होते. ते त्यांच्या खर्चाने आले होते, त्यांचे उत्पन्न वाढले होते. ते धन्यवाद देण्यासाठी आले होते. योजनेला राजाश्रय मिळून लोकांचा सहभाग मिळाला.

पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारताची चळवळ सुरू केली आणि एक इतिहास निर्माण झाला हे उदाहरण आहे. या जमिनीत विषारी घटक टाकून टाकून तिला आपण निष्प्रभ करतो आहोत. त्यामुळे नैसर्गिक शेतीची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT