सकाळ वृत्तसेवा
Alibag News : अलिबाग : कोकणातील शेतकऱ्यांची जमीन तीव्र उताराची आणि कातळाची असल्याने जलसिंचनासाठी मोठी शेततळी तयार करणे शक्य नाही, असा सरकारी अधिकाऱ्यांचा आतापर्यंत समज होता. हा समज पोलादपूर-गोळेगणी गावातील उपक्रमशील शेतकऱ्यांनी फोल ठरवत एकाच गावात २२ जलकुंडांची यशस्वी निर्मिती केली आहे. जलकुंडामुळे कोकणातील सिंचनाची समस्या दूर होणार असल्याचे सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ३) कृषी आयुक्तालयाने ‘जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न’ कोकणातील पाचही जिल्ह्यांसाठी राबवण्यास मान्यता दिली आहे.
पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथील शेतकरी जलकुंडासाठी २०१९ पासून वेगवेगळे प्रयोग करीत होते. त्यांनी खोदलेल्या जलकुंडातून या भागातील फळबागांना सिंचनाची ठोस व्यवस्था झाली असून, अशा प्रकारचे जलकुंड ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील डोंगरभागातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहेत. कातळावर जलकुंड खोदून सिंचनाची सुविधा उपलब्ध होते, हे दाखवून देण्यासाठी गोळेगणी गावातील शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंबा व काजू या फळपिकांची लागवड केली होती.
लागवड केलेल्या कलमांना डिसेंबर ते मे या कालावधीत संरक्षित पाणी देण्याकरिता कृषी सहाय्यक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव येरूणकर यांच्या शेतामध्ये पाच मीटर लांब, पाच मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असे जलकुंडाचे खोदकाम केले व त्याला ५०० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करून ५२ हजार ७३१ लिटर संरक्षित पाणीसाठा करण्यात आला. टंचाईग्रस्त गोळेगणी या गावामध्ये विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, कृषी अधिकारी बालाजी ताटे, सूरज पाटील, श्रीरंग मोरे, मनोज जाधव यांनी मार्गदर्शन केले.
डोंगर उतारावरील बागा सिंचनाखाली
कोकणातील जमीनधारणा क्षेत्र सरासरी एक हेक्टरपेक्षा कमी आहे. कोकण विभागात सरासरी पर्जन्यमान ३५०० ते ४००० मिलिमीटर दरवर्षी होते, मात्र डोंगर उताराचा भूभाग असल्याने येथे कालवे काढून सिंचन सुविधा देण्यावर मर्यादा येतात. कोकण विभागातील हवामान आंबा, काजू व इतर फळपिकास पोषक आहे, असे असताना मे अखेरीस पाणीटंचाई जाणवत असल्याने झाडांची मरतुक होते. आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी पर्यायी सिंचन सुविधेच्या शोधात होते. त्यांना जलकुंडांमुळे मोठा आधार मिळाला आहे. २२ शेतकऱ्यांनी खोदले कातळतळे
जनजागृतीमुळे गोळेगणी गावांतील नामदेव येरूणकर, गणपत पवार, शेखर येरूणकर, अविनाश येरूणकर, प्रकाश येरूणकर, दीपक मोरे, ज्ञानेश्वर मोरे, राजेंद्र दळवी, अनिकेत मोरे, सागर मोरे, विमल मोरे, मंदा सुर्वे, मधुकर मोरे, बाळकृष्ण मोरे, दशरथ मोरे, दीपक मोरे, नितीन मोरे, दीपक कदम, रामदास मोरे, तुटवली येथील गणेश मोरे, राजाराम शिंदे, मोरगिरी येथील दगडू ढेबे स्वयंप्रेरणेने २२ जलकुंडांचे काम पूर्ण केले. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जलकुंडाचे वेळोवेळी परीक्षण करीत खोदलेली तळी येथील भूभागासाठी उत्तम असल्याचा अहवाल दिला.
कोकण कृषी विद्यापीठाची शिफारस
उतार आणि खडकाळ जमिनीत तयार केलेले जलकुंड कोकणातील सर्वसामान्य फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही कोकणातील फलोत्पादनास जलकुंडाबाबत शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने संचालक, मृद व जलसंधारणाकडून सरकारने सादर केलेल्या जलकुंड प्रस्तावास मृद व जलसंधारण विभागाच्या २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या निर्णयान्वये कोकण विभागासाठी डोंगराळ भाग कातळामध्ये यंत्राद्वारे जलकुंडाचे काम करण्याचे निकष मंजूर केले आहेत.
कोकणात फळ लागवडीसाठी पोषक वातावरण आहे, परंतु बहुतांश भूभाग आहे, त्या ठिकाणी मेमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. कोकणात सिंचनाच्या मोठ्या योजना तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाहीत. त्यामुळे डोंगर उतारावर फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या जलकुंडामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
- अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये जलकुंड निर्मितीस राज्य सरकारचे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ, मनरेगा असे पर्याय उपलब्ध आहेत. गोळेगणी हे गाव माझ्याच मतदारसंघात येते. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून कुंड खोदण्यास सुरुवात केली होती. येथील शेतकऱ्यांची धडपड
संपूर्ण कोकणासाठी फायदेशीर ठरणार असल्याने रोजगार हमी योजनेतून अशा प्रकारचे जलकुंड खोदण्यासाठी निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
- भरत गोगावले, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.