Dairy Farming : कोकणातील तरुणाचा फायदेशीर दुग्ध व्यवसाय

Dairy Business : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील विठ्ठल शिरसाट या तीस वर्षे वयाच्या तरुणाने आपल्या सात एकर शेतीला मुऱ्हा म्हशींवर आधारित दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे.
Buffalo
Buffalo Agrowon
Published on
Updated on

Dairy Farming Success Story : अलीकडील काही वर्षांत कुडाळ तालुक्यात असलेले निवजे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पटलावर चर्चेत आले आहे. शेती, बाबू लागवड, दुग्ध, कुक्कुटपालन, बायोगॅस अशा विविध व्यवसायांमधून गावाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. माणगावहून बारा किलोमीटरवर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावाचा भात उत्पादनातील उत्कृष्ट गाव म्हणून परिचय होता.

अलीकडील वर्षांत गावाने दुग्ध व्यवसायात आघाडी घेतली आहे. येथील अनेक कुटुंबे या व्यवसायात सक्रिय आहेत. खरिपात भात, नाचणी तर उन्हाळ्यात चवळी, मूग, कुळीथ, उडीद अशी पिके येथील शेतकरी घेतात.

दुग्ध व्यवसायात तरुणांचा रस

गावातील तरुणाईने नोकरी, व्यवसायांपेक्षा शेतीत अधिक रस घेतला आहे. गावातील तीस वर्षे वयाचे विठ्ठल शिरसाट हे त्यापैकी एक. त्यांची सात एकर शेती असून त्यात काजू सुमारे दोन एकर असून, बांबूची ८० झाडे आहेत. दोन एकरांत भातशेती व कसायला घेतलेल्या क्षेत्रातही ते भात घेतात.

उन्हाळ्यात गवंडी काम करून विठ्ठल शेतीतील उत्पन्नाला हातभार लावायचे. लहानपणापासून शेतीकामे करीतच बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही परीक्षा दिल्या. परंतु यश आले नाही. नोकरी मिळाली नाही म्हणून ते खचून गेले नाही. शेतीतूनच प्रगती करायची जिद्दी बाळगली.

Buffalo
Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

स्थानिक जातीच्या तीन म्हशी खरेदी केल्या. त्या वेळी या व्यवसायातील कोणता अनुभव गाठीशी नव्हता. मात्र अतिशय उत्तम पद्धतीने देखभाल करीत उत्पन्न जोडण्यास सुरुवात केली. शेती सांभाळण्यासोबत गोठ्यातील शेण काढणे, चारा कापणे, दूध विक्री करणे अशी सर्व कामे विठ्ठल स्वतः करायचे. त्यामुळे परिसरातील काहींनी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. काहींनी हा व्यवसाय झेपण्यावरून चेष्टा देखील केली.

Buffalo
Dairy Farming : फायदेशीर दुग्ध व्यवसाय मॉडेलची विदर्भात गरज

अंगीकारला व्यावसायिक दृष्टिकोन

पारंपरिक दुग्ध व्यवसायातून दूध उत्पादनाला मर्यादा येत होत्या. नफ्याचे प्रमाण नगण्य होते. देखभाल,व्यवस्थापनावरील खर्च आणि उत्पादन यांचे गणित जुळत नव्हते. दरम्यान कोल्हापूर येथील गोकूळ संघाच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाने व्यावसायिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून गोठा व्यवस्थापन करण्याला चालना मिळाली.

भगीरथ प्रतिष्ठानने प्रोत्साहित केले. जिल्हा बॅंकेकडून कर्ज मिळाले. त्यातून म्हशी घेण्यासाठी मदत झाली. हरियानातून मुऱ्हा म्हशी आणण्याचे निश्‍चित केले. तत्पूर्वी कोल्हापूर भागातील काही यशस्वी दुग्धोत्पादकांचे गोठे अभ्यासले. प्रति सुमारे एक लाख ते एक लाख २० रुपये या दराने म्हशी घेतल्या आहेत.

त्यांना काही तास मुक्त फिरता यावे यासाठी वीस हजार खर्चून ३२ बाय २८ फूट क्षेत्रफळाचा काहीसा मुक्तसंचार गोठा बांधला आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असावी याकरिता विहीर बांधणी देखील केली आहे. कडबा कुट्टी व दूध काढण्याचे यंत्र घेतले आहे. हिरव्या चाऱ्याची सोय म्हणून दोन एकरांत चारा पीक लागवड केली आहे. गोठ्यात सुमारे आठ मुऱ्हा म्हशी आहेत. पैकी सध्या चार दुभत्या आहेत.

रोजचे नियोजन

  •  कुटुंबाचा दिवस पहाटे साडेचार वाजता होतो सुरू.

  •  सुरुवातीला गोठ्याची साफसफाई. गोठा धुऊन घेतल्यानंतर म्हशींना खाद्य.

  •  सकाळी सहा वाजता दूध काढण्यात येते. सकाळी आठच्या दरम्यान दूध डेअरीला नेले जाते.

  •  नऊच्या दरम्यान म्हशींना मुक्तसंचार गोठ्यात सोडण्यात येते. त्या वेळी हिरव्या चारा कापणीचे काम.

  •  त्यानंतर म्हशींना स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर वैरण. सायंकाळी पुन्हा गोठ्यातील आवश्‍यक कामे सुरू.

मुरघास निर्मिती

अलीकडील काळात शेतकरी मुरघासाच्या माध्यमातून चाऱ्याची शाश्‍वत सोय करण्याच्या प्रयत्नात असतात. विठ्ठल यांनीही त्याचा अंगीकार केला आहे. त्यांच्या गावातील एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या यंत्राद्वारे मुरघास तयार करून घेण्यात येते. पाचशे किलो गोण्यांमध्ये त्याचे पॅकिंग बनवून ठेवले जाते.

फायदेशीर अर्थकारण

प्रति दिन म्हैस १२ ते १५ लिटर दूध देते. तर प्रति दिन ५० ते ६० लिटर रोजचे दूध उत्पादन होते. वर्षभराचा विचार केल्यास रोजच्या किमान दूध संकलनाचा आकडा ३० लिटरपेक्षा खाली जात नाही. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री. निवजेश्‍वर डेअरी फार्मची स्थापना केली आहे. त्यामार्फत दूध खरेदी होऊन हे दूध गोकूळ महासंघाला पुरवले जाते.

विठ्ठल यांना दुधासाठी प्रति लिटर ६० ते ६२ रुपये दर मिळतो. खर्च वजा जाता ४० ते ५० टक्के नफा मिळतो. श्यामराव पेजे महामंडळाकडूनही अर्थसाह्य घेतले असून, व्याज परताव्यापोटी दरमहा पाच हजार रुपये मिळतात. व्यवसायातील सातत्य, सचोटी आणि प्रामाणिकपणा यामुळे निवजेश्‍वर संस्थेकडून या वर्षी दिवाळीला विठ्ठल यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला.

भात, आंबा-काजू व बांबू लागवडीतून वर्षाला जे उत्पन्न मिळते त्यास दुग्ध व्यवसायाचा मोठा आर्थिक आधार झाल्याचे विठ्ठल सांगतात. विठ्ठल, आई सत्यवती व वडील दिगंबर असे तिघेच गोठ्यात राबतात. कोणताही मजूर कामासाठी तैनात केलेला नाही. त्यामुळे त्यावरील मोठ्या खर्चात बचत केली आहे. याच व्यवसायातून विहीर व घराचे काही बांधकाम करता आले आहे.

खर्च वजा जाता दुग्ध व्यवसायात चांगला नफा मिळतो आहे. त्यातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत आहे. पुढील दोन वर्षांत कर्ज फिटून जाईल. त्यानंतर नफ्याचे प्रमाण वाढेल. पुढील काळात थेट दूध विक्रीचेही ध्येय ठेवले आहे.
विठ्ठल शिरसाट ७५८८६३७४३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com