Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics: गणंगांची फौज हीच महाराष्ट्राची ओळख?

Political Violence: कधी काळी सुसंस्कृत, वैचारिक राजकारण ही महाराष्ट्राची ओळख होती. व्यक्तिगत वैरभाव विसरून विधिमंडळात एकमेकांना सामोरे जाण्याची आपली संस्कृती. मात्र अलीकडील घटना पाहता गणंगांची फौज हाच महाराष्ट्र आहे का, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाळासाहेब पाटील

Maharashtra Assembly Chaos: महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री महाराष्ट्र तयार करण्यासाठी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झटले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखा पंडित मंत्रिमंडळाला आदरणीय वाटे. अगदी सांगायचे झाले, तर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्षांचे म्हणजे तर्कतीर्थांचे मंत्रालयात दालन होते. या बाबी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरील साहित्याच्या १८ खंडांच्या संपादनातून पुढे आल्या आहेत. केवळ सरकारच नव्हे तर राज्य सुसंस्कृत झाले पाहिजे म्हणून ही सगळी खटपट तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. पण हा झाला इतिहास...

काही मोजके सुसंस्कृत अपवाद वगळता विधिमंडळ, मंत्रालयात येणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांसोबत येणारी टोळकी पाहिली, की ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?’ असे विचारायची वेळ आली आहे. या टोळक्यांमध्ये कोण असतं? तडीपार गुंड, हाणामारीच्या केस असलेले भुरटे, गावगुंड हमखास असतात. आपल्या वजनदार नेत्यामुळे आपल्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही आणि मंत्रालय आणि विधिमंडळ मालकीचेच असल्याच्या आविर्भावात ते फिरत असतात.

काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचा नामविस्तार का करत नाही म्हणून कुणा एका गुंडाने प्रवीण गायकवाड यांच्यावर काळे तेल ओतले, कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांपेक्षा शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा म्हणून आमदार विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित करतात, हजारो एकर जमिनीचा घास घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी पायाला भिंगरी बांधून ते फिरतात. कुणी आडवे आल्यास आडवे करण्याची भाषा स्वतः लोकप्रतिनिधीच वापरत असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ येणारच. विधिमंडळाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून जे सुरू आहे, ते पाहता गुरुवारी भाजपचे वाचाळ आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत झालेली हाणामारी किरकोळ म्हणावी लागेल.

सभागृहात त्वेषाने तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधक सभागृहाबाहेर हातात हात घालून सौहार्दाचे वातावरण ठेवतात, ही महाराष्ट्राची संस्कृती होती. सभागृहात शाब्दिक बाणांनी घायाळ केल्यानंतर किंवा झाल्यानंतर अनेकदा विलासराव देशमुख तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांसोबत दुपारी भोजन करताना दिसत. याच्या चर्चा आजही विधिमंडळ आवारात रंगतात. मात्र आज काय चित्र आहे? आज नेत्यांच्या मर्जीत जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे आमदार बेछूट बोलतात. विधिमंडळासारख्या लोकशाहीच्या पवित्र ठिकाणी सडकछाप भाषा वापरून एकमेकांना डिवचतात.

यात अनेक मंत्रीही मागे नाहीत. गणंग या शब्दालाही लाजवेल असे महाभाग सध्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला उबग, चीड, लाज आणत आहेत. या सगळ्यांना राज्यकर्त्यांचे उघड पाठबळ ही सध्याची महाराष्ट्राची मोठी चिंता आहे. राजकारणी कोणत्याही थराला जाऊन आपली खूर्ची टिकवून ठेवतात, हे तर सर्वज्ञात आहे. निवडणुका, निवडी आणि अन्य घडामोडींवेळी हाणामाऱ्या, बाचाबाची व्हायच्याही. विशेषतः सहकारी संस्थांच्या, शिक्षक बँका, पतसंस्थांच्या सर्वसाधारण सभा यासाठी कुख्यात होत्या. आता त्याचे लोण थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचले आहे. अधिवेशन काळात विधिमंडळात प्रवेश करायचा असेल तर कडक सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागते.

विधिमंडळ आवारात लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना सर्वोच्च प्राधान्य आणि सुरक्षा असते. विधिमंडळाबाहेर मंडप घालून त्यात माध्यमांशी संवाद साधण्याची सोय असते. जेव्हा सभागृहात एखादा वादाचा प्रसंग उभा राहतो, तेव्हा विरोधकांना नागरिकांशी संवाद साधण्याचे एकमेव साधन माध्यमे असतात. मात्र सध्या पायलीला पासरीभर बूम आणि यू-ट्यूब चॅनेलचे मोबाइल असा प्रचंड मोठा गराडा असतो. राज्यभरात घडलेल्या हजारो घटनांवर प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा येथे चाललेली असते. शिवाय प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांची खासगी जनसंपर्क चमू विधान भवन आवारात तळ ठोकून असतो.

मंत्री, आमदार आले, की त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी असा काही आरडाओरडा होतो की काहीतरी दुर्घटना घडली की काय, असेच नवख्या माणसाला वाटावे. अधिवेशनावेळी नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब विविध आयुधांमधून सभागृहात उमटले पाहिजे, तसे होते का? सभागृहाचे कामकाज चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. मात्र गेल्या काही वर्षांत सत्ताधारी स्वतःच बाह्य सरसावून वेलमध्ये उतरताना, सभागृहाचे कामकाज बंद पाडताना दिसतात, हे अनाकलनीय आहे. आपण मंत्री आहोत हे विसरून चित्रविचित्र आवाज काढून घोषणा देणे, एकमेकांना डिवचणे, आव्हान देण्याचे प्रताप केले जातात. त्यांना कदाचित आपण सत्तेचा अमरपट्टाच घेऊन आलो आहोत असे वाटते.

नेमके काय घडले?

काही दिवसांपूर्वी जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले. त्या वेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलत असताना तेथून जितेंद्र आव्हाड निघाले होते. आव्हाड यांना पाहून पडळकर यांनी आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यानंतर आव्हाड यांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रत्युत्तरादाखल ‘मंगळसूत्र चोराचा...’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर बुधवारी आव्हाड हे विधिमंडळातून बाहेर जात असताना त्यांना पडळकर यांनी गाडीतून उतरताना दरवाजाचा धक्का मारल्याने बाचाबाची झाली.

गुरुवारी सायंकाळी पडळकर विधिमंडळाच्या लॉबीत उभे असताना आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पाहून आपल्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे चेतवले आणि हाणामारी झाली. आपण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत आहोत, आपण म्हणू ती पूर्व दिशा होईल अशा आविर्भावात पडळकर यांचा वावर अलीकडच्या काळात आहे. सभागृह असो अथवा बाहेर तो दर्प दिसतो. त्यामुळे पडळकरांना कुणी आव्हान दिले तर त्याची गत अशीच होईल असाच काहीसा संदेश दिला असावा.

एका बाजूला १०० दिवस आराखडा, दीडशे दिवसांचा कृती कार्यक्रम अशा उपक्रमांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक काही करण्याचा प्रयत्न करत असताना भाजपचे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले हे आमदार सरकारला पुरते बदनाम करत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर पडळकर अतिशय खालच्या दर्जाची टीका करतात. पण हे नेते त्याकडे ढुंकून पाहत नाहीत, ही पडळकर यांची बहुधा खंत असावी. त्यामुळेच त्यांनी थेट विधिमंडळाचा आखाडा केला असावा.

: ९२८४१६९६३४

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT