
Assembly Debate: शेतकरी आमच्यासाठी सर्वतोपरी आहे, आमच्यासाठी अन्नदाता आहे, अशी भाषणे ठोकून आपणच कसे शेतकऱ्यांचे तारणहार आहोत, असे सांगायला नेते कमी करत नाहीत. सत्ताधारी पक्ष आता शेतकऱ्यांना गोंजारण्याच्या भानगडीत पडत नाही, थेट त्यांना सुनावतो. बबनराव लोणीकर यांच्यासारख्या वाचाळ नेत्याने ते दाखवून दिले आहे. दुसरे नेते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अलीकडे त्यांचे उमाळे दाबून धरतात. त्यामुळे वादग्रस्त बोलणे टाळत असावेत, पण जे बोलून गेले ते पाठ सोडत नाही. अशी अवस्था आहे.
मात्र शेतकऱ्यांच्या प्रेमाचे भरते सत्ताधाऱ्यांना किती आहे हे या आठवड्यातील दोन घटनांवरून प्रकर्षाने जाणवले. पहिली घटना - वसंतराव नाईक कृषी व ग्रामीण संशोधन प्रतिष्ठान गेल्या ४० वर्षांपासून कृषी क्षेत्रातील मान्यवरांना रोख रकमेसह सन्मानपत्राने सन्मानित करते. कृषिक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ जुलै रोजी हा कार्यक्रम होतो. सध्या मंत्रिमंडळात असलेले इंद्रनील नाईक यांनी अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्याचे जंगी नियोजन केले.
मात्र वेळेचे पक्के असलेले अजित पवार ऐनवेळी आपल्या पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी गेले. कृषिमंत्री कोकाटे यांनी ऐनवेळी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम पार पाडला. दुसरी घटना - गुरुवारी विरोधकांचा कृषी, जलसंधारण, पणन, जलसंपदा या कृषी क्षेत्राशी संबंधित विषयांवरील २९३ चा आठवडा प्रस्ताव होता. या प्रस्तावावेळी कृषिमंत्री मंत्रालयात बैठक घेत होते. त्यामुळे नेमके प्राधान्य कशाला? राजकीय नेत्यांच्या बैठकांना की सभागृहात सदस्य मांडतात त्या प्रश्नांना, हा मूळ मुद्दा शिल्लक उरतोच.
प्रचंड बहुमत असलेले आत्मविश्वास ठासून भरलेल्या सत्ताधारी पक्षाला बरे दिवस आले आहेत. सत्ताधाऱ्यांसारखा विरोधी पक्षही तीन पक्षांत विखुरला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून विरोधी पक्षाची मोट विस्कटली होती. मात्र कधी नव्हे ते पावसाळी अधिवेशनात विरोधकांची एकजूट दिसू लागली आहे. सुस्तावलेले सरकार आणि आक्रमक विरोधक असे काहीसे चित्र या अधिवेशनात दिसत आहे.
मात्र अधिवेशनाकडे ना सरकार गांभीर्याने पाहते ना अधिकारी. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पूर्ण क्षमतेचे मंत्रिमंडळ असूनही दोन्ही सभागृहांमध्ये एखादा मंत्री वगळता संपूर्ण सभागृह रिकामे राहते. प्रश्नोत्तराचा तास संपला, की आमदार आपल्या कामाला निघून जातात आणि उरतात ज्यांच्या लक्षवेधी आहेत, ज्यांना बोलायची संधी मिळेल असे वाटते तेच सदस्य! २९३ चा प्रस्ताव हे विरोधकांचे मोठे आयुध.
मात्र या चर्चेवेळी ना संबंधित विभागाचे मंत्री उपस्थित असतात, ना त्या विभागाचे अधिकारी. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि सुरेश धस विरोधी पक्षाचे आमदार असावेत असे बोलतात. अनेक जण त्यांना पक्षविरोधी नेते असेही म्हणतात. परंतु विनोदाचा भाग सोडला तर सर्वच पातळ्यांवर सत्ताधारी पक्षांत घुसमट आहे. या घुसमटीने अनेक जण असहाय झाले आहेत. पण सांगणार कुणाला?
आमदारांचा उद्वेग
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीन सत्ताधारी पक्षामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. मात्र पावसाळी अधिवेशनातील महत्त्वाचे कामकाज सोडून पक्षप्रवेश सोहळे घडवून आणले जात आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी कामकाजाकडे पाठ फिरवून भाजप प्रदेशाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा जंगी साजरा झाला. जेव्हा सत्ताधाऱ्यांना प्रश्नांचे गांभीर्य नसते तेव्हा प्रशासन सुस्तावते. अल्पसंख्य असलेला विरोधी पक्ष आपले काय करणार आहे अशा आविर्भावात प्रशासन आहे.
त्यामुळेच विधानपरिषदेत परिणय फुके यांच्यासारख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या आमदाराला अधिकाऱ्यांच्या रिकाम्या गॅलरीकडे पाहून उद्वेग व्यक्त करावा लागला. सुरेश धस यांनी तर कामकाजाचे वाभाडे काढले. मी वरच्या सभागृहात होतो तेव्हा त्याचे अवमूल्यन झाले आहे असे वाटत होते. आता खालच्या सभागृहात आलो तर येथे त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे, असे सांगून व्यक्त केलेला उद्वेग सध्या सुरू असलेल्या कामकाजाचे वास्तव चित्र स्पष्ट करते.
सभागृहामध्ये विविध आयुधांद्वारे सत्ताधारी आणि विरोधक विविध प्रश्न उपस्थित करत असतात. यामध्ये महत्त्वाची चर्चा असते ती आठवडा प्रस्ताव. गुरुवारी विरोधकांचा विधानसभा नियम २९३ अन्वये प्रस्ताव चर्चेला आला. मात्र त्याच वेळी मंत्रिमंडळ बैठक सुरू होती. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मंत्रालयात आमदार बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेत होते. मंत्रिमंडळ बैठकीला राज्यमंत्री नसतात. तरीही कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल सभागृहात नव्हते.
नियमानुसार एक कॅबिनेटमंत्री सभागृहात असेल तर सभागृह तहकूब करता येत नाही. त्यामुळे कौशल्याविकास मंत्री मंगलप्रभात लोढा सभागृहात बसून होते. याला विरोधकांनी आक्षेप घेतला. त्या वेळी सर्व मंत्री विधिमंडळ आवारात होते. काही जण माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. एकंदरीत सभागृहाबाहेरील कामकाज हेच आमच्यासाठी महत्त्वाचे हे कृतीतून दाखवून देत होते. कृषिमंत्री कोकाटे यांचा सर्व भार सध्या अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.
त्यामुळे अधिकारी सांगतील ती पूर्व दिशा असे सुरू आहे. कोकाटे सरळमार्गी नेते असले, तरी त्यांनी आता आपण आमदार नाही तर मंत्री आहेत, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. दुर्दैवाने त्यांना प्रकरणे शेकतात तेव्हा त्याची जाणीव होते. गुरुवारी कृषी विभागाच्या चर्चेवेळीच मंत्रालयातील दालनात बैठक लावली. वास्तविक कोकाटे कोणत्या चर्चेपासून लांब राहत नाहीत पण त्यांच्या नियोजनानुसार बैठकीला गेले आणि विरोधकांना आयते कोलीत दिले.
मूळ मुद्दा असा आहे, की महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यान कॅबिनेट मंत्री अनुपस्थित असतात. राज्यमंत्री सभागृहात असूनही त्यांना उत्तर द्यायची संधी नसते. राज्यमंत्र्यांना इतर वेळी कामच करण्याची संधी नाही. त्यामुळे अधिवेशनात किमान उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांनी ब्रिफिंगला यावे, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. मात्र तीही पूर्ण होत नाही.
विरोधकांची एकजूट
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सभागृहात एकजूट दिसावी ती विरोधकांमध्ये आतापर्यंतच्या कोणत्याही अधिवेशनात दिसली नाही. मूठभर विरोधक आपले काय बिघडवणार असा सत्ताधाऱ्यांचाही आविर्भाव होता. या अधिवेशनात मात्र भास्कर जाधव, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य आमदार एकजुटीने तुटून पडत आहेत. एखाद्या विषयावर बोलू दिले जात नसेल, तर सभात्याग करताना तीनही पक्षांचे आमदार बाहेर जातात.
९२८४१६९६३४
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.