Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : क्षारपड जमीन सुधारण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन

Salty Soil : मागील भागामध्ये आपण जमिनी क्षारपड, पाणथळ कशा होतात, त्याची माहिती घेतली. या लेखामध्ये अशा जमिनींची सुधारणा करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. रवींद्र जाधव

भाग २


Soil Degredation : महाराष्ट्रातील काळ्या जमिनी आणि नैसर्गिक स्थितीमुळे वेगाने क्षारपड, चोपण किंवा पाणथळ होत आहेत. अशा अशा जमिनींची सुधारणा करण्यासाठी पुढील उपायांचा एकात्मिकपणे वापर करणे गरजेचे आहे.
अ) निचरा पद्धतीचा वापर ः
क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारण्यासाठी निचरा पद्धतींचा वापर करणे अतिमहत्त्वाचे असते. जमिनीतून योग्य प्रकारे निचरा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नुसतीच भूसुधारके वापरून फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच निचरा पद्धतीची आखणी तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित केली पाहिजे. त्यासाठी क्षारपड क्षेत्राचे सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलनिचऱ्याची पद्धती आणि पीक पद्धती इ. बाबींचा विचार करून योग्य प्रकारे निचरा प्रणाली केल्यास क्षारपड/ पाणथळ जमीन सुधारणेवर चांगला परिणाम दिसून येतो.

ब) भूसुधारकांचा वापर ः
चोपण जमीन सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक, फेरस सल्फेट, आयर्न पायराईट, फॉस्पोजिप्सम यासारख्या रासायनिक भूसुधारकांचा उपयोग करावा.
१) जिप्सम : माती परीक्षणानंतर जिप्समची नेमकी गरज व मात्रा ठरवावी. आवश्यक जिप्सम मात्रेपैकी अर्धा भाग पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग दोन वर्षांनंतर वापरावा. जिप्सममध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त सोडिअम ऑक्साइडचे प्रमाण असू नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावरील २० सें.मी. थरात चांगली मिसळून घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपूर पाणी मिसळले जाते. जिप्समची प्रक्रिया उत्तम होते. जिप्सममधील कॅल्शिअमची मातीच्या चिकण कणांना चिकटलेल्या सोडिअमशी प्रक्रिया होऊन सोडिअम सल्फेट तयार होते. ते विद्राव्य
असल्याने त्याचा निचरा प्रणालीद्वारे जमिनीतून निचरा होतो. जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक (सामू) कमी होतो. जमिनीची भौतिक जडण-घडण सुधारते.

२) आयर्न पायराइट्‍स : पायराइट्सचा वापर चोपण जमिनी सुधारण्यासाठी होतो. त्यामध्ये गंधक आणि लोहाचे प्रमाण अधिक आहे.
पायराइट्मध्ये असलेल्या गंधकावर पाण्याची व हवेतील ऑक्सिजनची तीव्र प्रक्रिया होऊन गंधकाम्ल तयार होते, त्यामुळे जमिनीत सुधारणा होते. यासाठी अमझोरी पायराइटचा वापर प्रभावशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. अमझोरी पायराइट्स जमिनीमध्ये घातल्यावर त्यातील गंधकावर पाण्याची व हवेतील ऑक्सिजनची प्रक्रिया होते. त्यातून गंधकाम्ल आणि लोहाचे सल्फेट तयार होते. याबरोबर थायोबॅसिलस या जैविक घटकांचा व सेंद्रिय खताचा वापर केल्यास ही क्रिया जलद होते. लोहाच्या सल्फेटवर पुन्हा पाण्याची प्रक्रिया होऊन त्यापासूनही गंधकाम्ल तयार होते. या प्रक्रिया साधारपणे अशा असतात.

१) पायराइट्‍स + पाणी + ऑक्सिजन = लोहाचे सल्फेट + गंधकाम्ल आणि
२) लोहाचे सल्फेट + पाणी = लोहाचे हायड्रॉक्साइड + गंधकाम्ल.
अशा रीतीने तयार झालेले गंधकाम्ल जमिनीतील चुनखडीवर प्रक्रिया करते. त्याचे कॅल्शिअम सल्फेट बनवते.
चुनखडी + गंधकाम्ल = जिप्सम + पाणी + कार्बन डायऑक्साइड.
या कॅल्शिअम सल्फेटमधील कॅल्शिअमचे जमिनीतील सोडिअमशी विनिमय होऊन सोडिअम सल्फेट तयार होते. ते पाण्यात विरघळणारे असून, पाण्याबरोबर त्याचा निचरा होतो. जमिनीतील सोडिअमचे प्रमाण कमी होते. जमिनीस हलके पाणी देऊन साधारणतः २ ते ४ टन प्रति हेक्टरी पायराइटची मात्रा चोपण जमिनी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.


क) पिकाची फेरपालट व निवड ः
जमिनीची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने एकच पीक वारंवार घेऊ नये. पिकामध्ये फेरपालट करावी. कायम आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिके घ्यावी. शिवाय ताग, शेवरी यांसारखी हिरवळीची खतपिके घ्यावीत. जमीन पडीक न ठेवता त्यात सतत काहीतरी पीक घ्यावे. पीक घेणे शक्य नसल्यास बरसीम, लुसर्ण, पॅराग्रास, करनाल अशी गवते लावावीत. क्षार प्रतिकारक्षमता असलेल्या पिकांची निवड करणे फायद्याचे ठरते. (तक्ता १)

क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशीलता
पिकाचा प्रकार --- क्षार संवेदनशील --- मध्यम संवेदनशील --- जास्त सहनशील
अन्नधान्य पिके --- उडीद, तूर, मूग, वाटाणा, तीळ --- गहू, बाजरी, भात, मोहरी, करडई, मका, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस --- ऊस, कापूस
भाजीपाला पिके --- चवळी, मुळा, श्रावण घेवडा --- कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर --- पालक, शुगरबीट
फळबाग पिके --- संत्रा, आंबा, बदाम, सफरचंद --- चिक्कू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्षे --- नारळ, बोर, खजूर, खारीक
वन पिके --- साग, सिरस, चिंच --- लिंबू, बाभूळ --- विलायती बाभूळ, सिसम, निलगिरी
चारा पिके --- ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे फ्लोअर --- पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत --- बरसीम, ऱ्होडस गवत, बरमुडा गवत


ड) जमिनीचे व्यवस्थापन
जमिनीचे सपाटीकरण : ज्या जमिनी उंच सखल आहेत किंवा अति चढ उताराच्या आहेत, अशा जमिनींचे सपाटीकरण करून घ्यावे. शेतात उंचवट्यावर पाणी पोहचत नाही किंवा कमी पोहोचते, तर सखल भागात जास्त साठते. शिवाय वाजवीपेक्षा जास्त उतार असल्यास वाफ्यात किंवा सऱ्यात दिलेले पाणी उताराच्या दिशेने निघून जाते. पिकांना कमी पाणी उपलब्ध होते. क्षार समस्या असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी वाढलेल्या जमिनीत पाणी साचू देऊ नये. अगदी पावसाचे पाणीसुद्धा उताराच्या दिशेने चरीत नेऊन सोडावे. पाणी तुंबून न राहिल्यास पाण्याची पातळी कमी ठेवता येते. त्यामुळे भारी जमिनीत ०.०५ ते ०.२५ टक्का, मध्यम जमिनीत ०.२० ते ०.४० टक्का व हलक्या, रेताड जमिनीत ०.२५ ते ०.३५ टक्का उतार समाधानकारक असतो.

पाणी नियोजन ः जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये यासाठी भरमसाट पाण्याचा वापर करू नये. ठिबक सिंचनासारखे अस्त्र प्रभावी ठरते. ठिबक सिंचनातून भूजलाच्या मचूळ अथवा खारवट पाण्याचा उपयोगही कार्यक्षमरीत्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रकार व प्रमाण तसेच जमिनीची प्रतवारी पाहून पाण्याचे योग्य नियोजन करावे.

पाण्यातील विद्राव्य क्षार : २००० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते. या संचामुळे होणारे ओलित क्षेत्र हे एकमेकावर २० टक्के झाकले जाणे गरजेचे आहे. यात तोटीजवळ सतत ओलावा असतो. त्याच्या जवळ पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते.

जमिनीची मशागत ः जमिनीत खोलवर मशागत करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलरसारखे अवजार वापरून खोलवर नांगरणी करता येते.

माती परीक्षण ः खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी तिचा प्रकार व अन्य बाबींचे परीक्षण करून घ्यावे. त्यानंतरच उपाययोजना कराव्यात. पिकांसाठी खतमात्राही माती परीक्षणानंतर योग्य प्रमाणात द्यावी.

रासायनिक खते ः क्षार व चिबड जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी. त्याशिवाय स्फुरद, लोह, व जस्ताची कमतरताही आढळते. कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकविता येते.

कंपोस्ट कल्चरचा वापर ः क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गाचा एकत्रितपणे अवलंब करावा लागतो. टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर करावा. क्षारपड होण्याच्या मार्गावर असलेल्या जमिनी वाचविण्याच्या दिशेने तो एक मार्ग ठरू शकतो. कंपोस्ट खतामुळे माती कणांची रचना बदलते. जादा पाणी निचरा होऊन हवा व पाणी यांचे प्रमाण योग्य राहते. जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढून त्यांचे कार्य उत्तम चालते. क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अॅझो, रायझो यांसारख्या जिवाणूंचा वापरावेत. हे जिवाणू हवेमधील नत्र पिकांना मुळावाटे उपलब्ध करून देतात. क्षारयुक्त जमिनीत शेवरी, धैंचा व क्लोव्हरची पिके चांगली वाढतात. ती नत्रही स्थिर करतात. शिवाय क्षार शोषून घेत असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी सुधारण्याचा एक मार्ग ठरतात.

आच्छादनाचा वापर ः क्षारपड जमिनी मोकळ्या ठेवल्यास बाष्पीभवनामुळे जमिनीच्या खालील थरातील क्षार पृष्ठभागावर येतात. हे टाळण्यासाठी शेतातील सेंद्रिय पदार्थाचा उदा. उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा, पालापाचोळा, काड्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिल्याने पिकास द्यावयाची पाणीमात्राही कमी लागते. परिणामी, जमिनी क्षारपड-पाणथळ होण्याचा धोका कमी होतो.

जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी ः
- जमिनी सपाट असाव्यात. बांधबंदिस्ती करावी.
- जमिनीमध्ये पाणी साठवून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
- जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.
- जमिनीतील पाण्याची पातळी २ मीटरच्या खाली ठेवावी.
- पिकाच्या वाढीसाठी जरुरीप्रमाणेच पाणी द्यावे. विशेषतः ऊस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
- आपल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देऊ नये.
- जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ व हिरवळीचे खते वापरून मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते. जादा पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
- विहिरीचे पाणी क्षारयुक्त, खारट असल्यास असे पाणी जमिनीस वापरू नये.
- माती व पाणी नेहमी तपासून जमिनीचे भौतिक आणि रासायनिक बदल याबाबत माहिती मृदशास्त्रज्ञाकडून मिळवावी.
- सूक्ष्म जलसिंचन पद्धती वापराव्यात. उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन.
- क्षार व चोपण जमिनीसाठी प्रतिकार करणाऱ्या पिकांची निवड करावी.
------------------
डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१
(सहायक प्राध्यापक, मृद्‍ व कृषी रसायनशास्त्र विभाग, सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT