Soil Health : जमिनी क्षारपड, खराब होण्याची कारणे

Soil Degradation : क्षारपड - पाणथळीच्या समस्येने पडीक होत असलेल्या जमिनीवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. उपाययोजना न केल्यास सुपीक जमिनी खराब होऊन कायमचे नुकसान होऊ शकते.
Salty Soil
Salty SoilAgrowon
Published on
Updated on

डॉ. रवींद्र जाधव

Salty Soil : क्षारपड - पाणथळीच्या समस्येने पडीक होत असलेल्या जमिनीवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. उपाययोजना न केल्यास सुपीक जमिनी खराब होऊन कायमचे नुकसान होऊ शकते. सांगली जिल्ह्यातील ५२ हजार हेक्टर क्षेत्र क्षारपड - पाणथळीच्या समस्येने पडीक राहत आहे. तिथेही मिरज, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामध्ये क्षारपड-पाणथळ जमिनीची समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. तोच प्रकार हळूहळू सर्वत्र दिसू लागेल, हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

भारतात प्राचीन काळापासून पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनी आढळत आल्या आहेत. मात्र त्यांच्या सविस्तर नोंद १९ व्या शतकाच्या मध्यापासून घेतली गेली. सिंचनक्षेत्र जसे जसे वाढत गेले तसतसे अशा जमिनीच्या क्षेत्रात वाढ होत गेली. भारतामध्ये अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक भारी काळ्या जमिनी आढळतात. अशा भारी काळ्या जमिनीमध्ये निचरा क्षमता कमी असते. त्याला जोड मिळाली ती भूपृष्ठापासून कमी खोलीवर असणारा अभेद्य असा खडकाचा थर, पिकांसाठी पाण्याचा अमाप वापर, खारवट (मचूळ) पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनॉल/तलाव/धरणे यांच्यातून पाणी पाझरणे, पिकांच्या योग्य फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, वारंवार येणारे पूर, पाऊसमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त आणि विस्कळीत झालेली नैसर्गिक निचरा पद्धत इ. कारणांची.

त्यामुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या सुपीक जमिनी नापीक होताना दिसत आहेत. पाणी व क्षार साठ साठल्यामुळे भारतात ११.५३ दशलक्ष हेक्टर आणि महाराष्ट्रात १० लाख हेक्टर क्षेत्र खराब झाले आहे. सध्या एकूण खराब झालेल्या क्षेत्रांपैकी जवळ जवळ ८० टक्के क्षेत्र मध्यम काळी व भारी काळ्या जमिनीमध्ये आहे. क्षारपड - पाणथळ जमिनी मुख्यत्वे करून पश्‍चिम विदर्भात अकोला, वर्धा, अमरावती आणि मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये आढळतात.

जमिनी खराब कशा बनतात?
मूलतः भारी, खोल काळ्या, जमिनी पुढील कारणांमुळे खराब बनतात.
(अ) जमिनीत क्षारांची साठवण
(ब) पाणथळ जमिनी

अ) जमिनीत क्षारांची साठवण होण्याची कारणे :
- क्षारयुक्त पाण्याचा पिकासाठी वापर.
- उसासारख्या पिकासाठी पाण्याचा अमर्याद वापर - जर पिकास आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी सिंचनाद्वारे दिल्यास भूजलाच्या पातळीत वाढ होते. जमिनीतील क्षार मुळांच्या कक्षेत येतात.
- खडकांची झीज आणि नद्यांच्या पाण्यातून क्षारांची वाहतूक आणि सखल जमिनीत साठवण.
- भारी काळ्या जमिनी आणि त्यातील निचऱ्याचा अभाव.
- नैसर्गिक उताराचा अभाव.
- यांत्रिकीकरणांमुळे जमिनीचे सपाटीकरण आणि नैसर्गिक चर बंदी.
- रासायनिक खतांचा वाढता वापर.
- कीटकनाशकांचा वापर.

ब) पाणथळ जमिनी : ज्या वेळी जमिनीमध्ये एकूण सर्व मार्गांनी सोडलेले पाणी हे जमिनीतून बाहेर पडणारे पाणी आणि पिकांना लागणारे पाणी यापेक्षा जास्त होते, त्या वेळी या जमिनी पाणथळ होतात. जमिनीमधील पाण्याची पातळी पिकाच्या मुळांच्या कक्षेत येताच ती जमीन पाणथळ असल्याचे समजले जाते.

Salty Soil
Soil Health : ओळखा जमिन क्षारपड होण्याची कारणे ?

जमिनी पाणथळ होण्याची कारणे
अ) नैसर्गिक कारणे -

- जमिनीच्या खाली भूगर्भाचा कठीण थर.
- वारंवार येणारे महापूर.
- उंच भागातून सखल भागाकडे होणारे पाण्याचे वहन : पावसाचे प्रमाण जास्त असून, ते वाहून जाण्यास नैसर्गिक मार्ग (उदा. ओढा,
नाले. व ओघळ इ.) नसल्यास जमिनीत पाणी मुरून उरलेले पावसाचे पाणी उंच भागावरून सखल, खोलगट भागामध्ये वाहून साचते. या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षारही जमिनीच्या भूपृष्ठावर साचून राहतात.
- उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊसमान कमी असते. अशा ठिकाणी भूपृष्ठावरील क्षार जमिनीतून खोलवर व निचऱ्याद्वारे वाहून जात नाहीत. उलट असे क्षार उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाबरोबर वर येऊन भूपृष्ठावर जमा होतात.

ब) कृत्रिम किंवा मानव निर्मित कारणे -
- जमिनींचा प्रकार विचारात न घेता पिकांना पाणी देण्याची पद्धत.
- बागायती क्षेत्राची अति बांध बंदिस्ती.
- नैसर्गिक चराचे सपाटीकरण.
- नैसर्गिक ओघळ, नाले आणि चर यांची देखरेख आणि स्वच्छता न ठेवणे.
- सिंचन विभागातील पाण्याच्या पाटाची गळती : साठवण बंधारे, तलाव व कॅनॉल यापासून होणाऱ्या सतत झिरप्यामुळे खोलगट भागात पाण्याची पातळी वाढते. हे पाणी बऱ्याच कालावधीसाठी राहिल्यास जमिनीतील/ पाण्यातील क्षार उन्हाळ्यात बाष्पीभवनाने जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन साचून राहतात. पाण्याची पातळीही वाढते.

Salty Soil
Soil Health : जमिन क्षारपड का होते?

क्षारयुक्त आणि चोपण जमिनीचे गुणधर्म
क्षारयुक्त, चोपण आणि क्षारयुक्त चोपण जमिनीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात.

गुणधर्म --- क्षारयुक्त --- चोपण --- क्षारयुक्त चोपण
सामू (pH) --- ८.५ पेक्षा कमी --- ८.५ पेक्षा जास्त --- ८.५ पेक्षा कमी
विद्राव्य क्षार डेसिसायमन /मी. (EC) --- ४.० पेक्षा जास्त --- ४.० पेक्षा कमी --- ४. ० पेक्षा कमी
विनिमययुक्त सोडिअम (ESP) --- १५ पेक्षा कमी --- १५ पेक्षा जास्त --- १५ पेक्षा जास्त
पृष्ठभाग --- पांढऱ्या क्षारांचा रंग --- राखेसारखा क्षारांचा थर --- उन्हाळ्यात क्षारांचा पांढरा थर
पीक --- पिकाची वाढ होत नाही. --- पिकाची वाढ होत नाही. --- पिकाची वाढ खुंटते.

पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनीत पिकांची वाढ न होण्याची कारणे ः

- जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुळांच्या सान्निध्यात हवा खेळती राहत नाही. परिणामी, पिकांना प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. अशा जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होत नाही. पिकांना अन्नद्रव्ये शोषण्यात अडचणी येतात.
- विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे पिके पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात. त्यातील सोडिअम व क्लोराइडचा पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
- विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढते. मातीच्या कणावरील सोडिअमचे प्रमाण वाढल्यावर जमिनीची घडण बिघडते. अशी माती ओली झाल्यावर चिकट बनते, आणि उन्हाळ्यात कोरडी झाल्यावर कठीण व टणक बनते. घट्ट जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही.
पुढील भागामध्ये जमिनी क्षारपड - पाणथळ होऊ नयेत, यासाठी करावयाच्या एकात्मिक उपाययोजनांची माहिती घेऊ.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१
(सहायक प्राध्यापक, मृद्‍ व कृषी रसायनशास्त्र विभाग, सौ. के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com