Groundwater Groundwater Planning Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Planning : चौदा गावांचे एकत्रित भूजल नियोजन

Groundwater Management : आपण सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर आपल्या सर्वच गावात हे नक्की शक्य आहे. अशाच सहकार्यातूनच स्वर्गाची उभारणी करता येईल, दुसरे काय?

Team Agrowon

सतीश खाडे

जमिनीवरील डोळ्यांना दिसणाऱ्या पाण्याचे समन्यायी वाटप शक्य होत नाही, तिथे एकाच जलधरावर अवलंबून असलेली जालना जिल्ह्यातील माळेगाव परिसरातील चौदा गावे वॉटर संस्थेच्या सहकार्याने एकत्र आली. त्यांनी समन्यायी भूजल व्यवस्थापन केले आहे. आपण सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतले तर आपल्या सर्वच गावात हे नक्की शक्य आहे. अशाच सहकार्यातूनच स्वर्गाची उभारणी करता येईल, दुसरे काय?

पुण्यवान माणसाला एकदा देव प्रसन्न झाला. देवाने त्याला वर मागायला सांगितले. त्याने देवाकडे न मरताच स्वर्ग आणि नरक दोन्ही पाहण्याची विनंती केली. त्यानुसार देवाने त्याला आधी नरकात नेले. तिथे मिठाईने भरलेल्या मोठमोठ्या कढया आणि त्यात आठ- दहा फूट लांबीचे मोठे चमचे होते. मिठाईचा सुगंध सर्वत्र भरून होता. असे असूनही आजूबाजूचे सर्व लोक खंगून गेलेले होते. समोर मिठाई असूनही लांब दांड्याच्या चमच्यामुळे कुणालाच खाता येत नव्हते. सर्व जण भुकेने व्याकूळ आणि शरीराने खंगून ग्लानी येऊन पडलेले दिसत होते.

मग त्याला देवाने स्वर्गात नेले. तिथेही तशाच मिठाईच्या कढया आणि लांब दांडीचे चमचे दिसले. पण लोक मात्र मिठाई खाऊन तृप्त, आनंदी दिसते. त्याने देवाला विचारले की दोन्ही मिठाई तर सारख्याच होत्या. मग एका बाजूला दुःखाचे वातावरण, तर दुसरीकडे आनंदी हे कसे? तर देवाने त्याला जिथे पंगती सुरू होत्या तिथे नेले. स्वर्गामध्ये लांब दांड्याचे चमचे असले तरी लोक एकमेकांना भरवत होते. तर नरकामध्ये मोठ्या चमचाने स्वतःच खाण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते काही शक्य होत नव्हते. म्हणजेच एकमेकांना सांभाळून घेत संघ वृत्तीने एकमेकांची काळजी घेतली तर आहे तेवढ्याच साधनामध्येही स्वर्ग निर्माण होऊ शकतो. आपल्याकडील सर्व नैसर्गिक संसाधने विशेषतः पाणी हे सर्वांना सारखेच मिळते. ते एकमेकांच्या सहकार्याने वाटून घेतल्यास नक्कीच समृद्धी नांदू शकते.

एखाद्या गावात पाऊस सर्वांसाठी समान पडतो. नदी सर्वांसाठीच वाहते. अगदी तसेच जमिनीखालचे पाणीही सर्वांचेच असते. पण त्यावर विनाकारण हक्क सांगून गर्भश्रीमंतीचा आव नको, तर त्याबाबत कोणी दरिद्री राहू नये, अशी समन्यायी पाणी वाटपाची आपल्याकडे सर्वप्रथम कल्पना आदरणीय (स्व.) विलासराव साळुंखे (खळद, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी पन्नास वर्षांपूर्वी ‘पाणी पंचायत’च्या माध्यमातून मांडली. त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून समाजातील सर्वसामान्य, समाजधुरीण, तंत्रज्ञ, राज्यकर्ते, अधिकारी यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तीन दशके ती चळवळ चालवली. त्यांच्यापश्‍चात कल्पनाताई साळुंके आजही त्या चळवळीचे पाईक होऊन काम करीत आहेत. समान न्याय पाणी वाटप म्हणजे उपलब्ध पाणी आणि त्याचे माणसांच्या गरजा निश्‍चित करून केलेले पाण्याचे वाटप होय. ही समन्यायी पाणी वाटपाची खरंतर ३०-४० वर्षांपूर्वी अशक्य वाटत होती. पुढे त्यांच्या सारखीच महाराष्ट्र शासनाचा भूजल विभाग, ॲक्वाडॅम, WOTR, बायफ व अशा काही समाजसेवी संस्थानी अनेक गावात अशी समंजस जलव्यवस्थापनाची यशस्वी उदाहरणे तयार केली आहेत.
माळेगाव व चौदा गावांची यशोगाथा त्यापैकीच एक.

जालना जिल्ह्यातील माळेगाव (ता. भोकरदन) या परिसरातील चौदा गावांनी वॉटर संस्थेच्या पुढाकार व प्रेरणेने भूजल व्यवस्थापनाचा संकल्प करत पाण्यासाठी आत्मनिर्भर झाली आहेत.
जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या तुलनेमध्ये भूजल व्यवस्थापन हे वेगळे असते. कारण पाणलोटाप्रमाणे त्यांच्या जमिनीखालील जलधराच्या सीमा स्पष्टपणे दिसत नाहीत. काही वेळा अनेक पाणलोटाखाली सूक्ष्म एकच जलधर असू शकतो किंवा एकाच पाणलोटाखाली एकापेक्षा अधिक जलधर असू शकतात. हे जलधर एकमेकांशी भेगांनी जोडलेले असून, त्यातून जलप्रवाह सुरू असतो. त्यामुळेच आपल्या विहिरी व बोअरवेल वेगवेगळ्या गावात असल्या तरी त्या एकाच जलधरातून पाणी उपसत असतात. म्हणजेच कोणी
अजाणता किंवा जाणीवपूर्वक वाजवीपेक्षा जास्त पाणी उपसा केला तरी इतरांवर अन्याय होऊ शकतो. म्हणूनच आपण ज्या जलधरातून पाणी उपसतो, त्यात नेमके किती पाणी आहे, ते कधीपर्यंत पुरते किंवा सर्वांनाच पुरेल असे कसे वापरता येईल, याचे व्यवस्थापन म्हणजे भूजल व्यवस्थापन होय.

WOTR संस्थेच्या तंत्रज्ञ आणि संशोधकांनी माळेगाव परिसराचा जलभूवैज्ञानिक अभ्यास केला असता माळेगाव परिसरातील चौदा गावे एकाच सामाईक जलधरामधून (aquifer) भूजल उपसत असल्याचे लक्षात आले. त्यांना एकत्र आणत भूजल व्यवस्थापनासाठी तयार केले. सर्वप्रथम माळेगावसह सर्व गावांत गाव पातळीवर पाणी व्यवस्थापनासाठी ‘पाणी कारभारी मंडळ’ स्थापन केले. त्यात स्री-पुरुष, ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील शेतकऱ्यांचे सर्व घटकाचे प्रतिनिधी असतील, याची काळजी घेतली. या उपक्रमात ‘भूजल ही सार्वजनिक संपत्ती आहे, ती कुणाचीही वैयक्तिक नाही’ हा मुद्दा मान्य करणे हाच खरेतर सर्वोच्च मुद्दा होता. कारण भूजलसाठे डोळ्यांनी दिसत नाहीत आणि अगदी तंतोतंत मोजता येत नाहीत. त्यामुळे लोकांना पटवणे हे अवघड काम होते. अर्थात, त्यासाठी WOTR संस्थेने एक टूल विकसित केले. त्याच्या माध्यमातून या पंधरा गावांच्या जलधर आणि त्यांच्यावरील जमिनीचे म्हणजे भू क्षेत्राचे एक मोठे मॉडेलच बनवले. त्यात गावांचे सगळेच चढ-उतार, टेकडी, ओढे, जलधर आणि त्याची खोली, विहिरी असे सर्व दाखवले. प्रत्येक गावात गावबैठका घेऊन त्यात मॉडेल मांडून त्यावर चर्चा घडवली गेली. गावातील प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमातही ते प्रदर्शित करून त्याची सविस्तर माहिती दिली जायची. त्यामुळे लोकांमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण झाली. आपण सगळे एकाच भूजलाच्या भांड्यातून (aquifer) पाणी वापरतो ही समज वाढली. मग त्याच्या व्यवस्थापनाविषयी आस्था व बांधिलकीही वाढत गेली. पुढे या चौदा गावांतून प्रत्येकी एक या प्रमाणे प्रतिनिधीची निवड करून ‘माळेगाव भूजल व्यवस्थापन समिती’ स्थापना केली. त्यांची कामे व जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या.

या मंडळींनी काय काय केले?
तर पुढील साधारण दीड वर्षात जलधरातील उपलब्ध जलसाठा मोजला. WOTR संस्थेसोबत त्यांनी अनेक प्रशिक्षणे व कार्यशाळा आयोजित केल्या. गावच्या विहिरी, बोअरवेल्स यांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवून नोंदी केल्या. त्यावरून पावसाळ्यानंतर वाढणारा भूजलसाठा ते पुढचा पावसाळा सुरू होण्यापर्यंतच्या भूजल साठा मोजला गेला. भूजल व्यवस्थापन समितीने जलधर स्तरावर एकूण चौदा गावासाठी एकत्रित पाण्याचे अंदाजपत्रक बनवले. त्याच्या आधारावर प्रत्येक गावासाठी पाण्याचा ताळेबंद बनविला. त्यात सर्वप्रथम पिण्याचे पाणी किती लागते हे ठरवून सुरक्षित केले. उरलेल्या पाण्यात पीक निवडीचे स्वातंत्र्य दिले. अर्थातच अधिक पाणी लागणारी पिके कोणीच घ्यायची नाहीत, अशी नियमावली तयार केली. चौदाही गावाची एकसंध भावना निर्माण करण्यासाठी पाच कार्यशाळा झाल्या. पाण्यावरील मालकी सर्वांची असून, त्याचे व्यवस्थापन व नियमावलीसंदर्भात चार कार्यशाळा झाल्या. सर्व समाज घटकांची भूजल साक्षरता वाढवून पाणी वापराच्या योग्य सवयी तयार करण्यासाठी चार कार्यशाळा घेण्यात आल्या. पीक निवडीमध्ये कोणत्या पिकाला किती पाणी लागते, त्यातून किती दिवसांत किती उत्पन्न आणि नफा मिळतो. उपलब्ध भूजलापैकी माझ्या वाट्याला साधारण किती पाणी येते, ते अधिक चांगल्या प्रकारे कसे वापरायचे, याची समज निर्माण करण्यात आली. हळूहळू अनेकांनी सूक्ष्म सिंचनही सुरू केले. आज चौदा गावातील बहुतांश सर्व शेतजमीन ही सूक्ष्म सिंचनाखाली आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन व गव्हाऐवजी हरभरा अशा कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या क्षेत्रात वाढ केली.

एकीतून स्वर्गही उभारता येईल...
यात उपक्रमात शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, इतर शिक्षित मंडळी, पाण्यासंबंधित विविध तज्ज्ञ व अभ्यासक, शेतकरी लाभधारक हे सर्व आजही एकत्र बसून चर्चा करतात. त्यात प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. समस्या लक्षात घेऊन तो सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. आवश्यक तिथे नियमात सुधारणा केल्या जातात. या प्रक्रियेमुळे शासकीय यंत्रणा, गावातील कार्यकर्ते, शेतकरी लाभधारक यांच्यातील सुसंवाद, सहकार्य वाढले. भूजल व्यवस्थापन अधिक दर्जेदार होऊ लागले. लोकांचे भूजल व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेला. या उपक्रमाची संकल्पना, आखणी, लोकसहभाग आणि प्रकल्प प्रत्यक्षात लोकांच्या मनी रुजून कृतीत आणण्यामध्ये WOTR संस्थेचे मोठे काम आहे. त्यांचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. त्यांनी या उपक्रमातील अनुभव, शास्त्रीय तत्त्वे समजाविण्यासाठी अनेक छोट्या पुस्तिका व फिल्म बनविल्या आहेत. या संस्थेच्या www.wotr.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. त्या पाहून आपण नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT