Groundwater Conservation : भूजल संवर्धनासाठी वाळू, झाडांचे महत्त्व ठाऊक आहे का?

गावोगावी माळरानावर ओढ्याकाठी, नदीकाठी वाढलेल्या बाभळीवर त्याच्या काट्यांमुळे कुणी राग राग करत असेल, तर त्यांनी त्याचे भूजल वाढीतील महत्त्व समजून घ्यावे. शमी वृक्षाची मुळे सर्वांत खोल (अगदी शंभर फुटांपेक्षाही जास्त) जातात.
Groundwater conservation
Groundwater conservationAgrowon

सतीश खाडे

Groundwater conservation : भूजलाबाबत माती व खडक याबरोबरच आणखी काही घटक महत्त्वाची भूमिका बजावतात त्यातही झाडे आणि प्रवाहातील वाळू हे घटक अधिक महत्त्वाचे आहेत.

झाडे आणि भूजल

सामान्यतः जंगले असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा इतरत्रही भरपूर झाडे असलेल्या परिसरात भूजलाचा साठा चांगला असल्याचे सार्वत्रिक निरिक्षण आहे. नद्यांच्या उगमाच्या ठिकाणी डोंगर आणि घनदाट जंगल असते.

जंगलातील झाडे व त्यांची मुळे यामुळे डोंगराचा तो भाग एखाद्या स्पंजाप्रमाणे काम करतो. तिथे पडणारा जास्तीत जास्त पाऊस जमिनीत जिरतो. डोंगरातील खडक पाण्याने गच्च भरतात. त्यातील पाणी झऱ्याच्या रूपाने बाहेर पडू लागते. हे झरे मिळूनच नदीचा उगम व पुढे नदीचा प्रवाह सुरू होतो. हे झरे बऱ्याचदा बारमाही वाहत असत.

मात्र दुर्दैवाने अनेक नद्यांच्या उगमाजवळील जंगलही वृक्षतोडीमुळे विरळ झाले आहे. त्यामुळे लाखो वर्षे बारमाही वाहणारे झरे काही काळातच कोरड पडतात. या झऱ्यापासूनच बनलेली नदी पावसाळ्यानंतर उगमानंतरच्या काही अंतरामध्ये दोन-तीन महिन्यातच कोरडी पडलेली दिसते.

वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, पिपरी या प्रजातीतील वृक्ष खूप मोठे वाढतात आणि दीर्घकाळ जगतात. अनुकूल जमिनीत त्यांची मुळे खूप खोलवर जातात. ती खालच्या कठीण खडकापर्यंत सलग व सहज वाढतात. या मुळांमुळेच जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात मुरते. भूजल वाढते.

तसेच बाभूळ, खैर, शमी, शिरीष या जातीच्या वृक्षांची मुळेही खूप खोलपर्यंत वाढतात. तीही भूजल वाढण्यासाठी अनुकूल आहेत. सार्वजनिक वृक्षारोपण कार्यक्रमात अशी झाड लावलीच पाहिजेत.

Groundwater conservation
Groundwater Management : शास्त्रीय भूजल व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत

गावोगावी माळरानावर ओढ्याकाठी, नदीकाठी वाढलेल्या बाभळीवर त्याच्या काट्यांमुळे कुणी राग राग करत असेल, तर त्यांनी त्याचे भूजल वाढीतील महत्त्व समजून घ्यावे. शमी वृक्षाची मुळे सर्वांत खोल (अगदी शंभर फुटांपेक्षाही जास्त) जातात.

यामुळेच वाळवंटातही हे वृक्ष सदाहरित असतात. पाणी शोधेपर्यंतही मुळे वाढतच राहतात. आपटा व कांचनाचे वृक्ष फार मोठे नसतात, पण त्यांची मुळे खोलवर वाढतात. खडकातील बारीक-सारीक भेगांमध्ये, फटींमध्ये ही मुळे शिरतात. तिथे वाढून जाड होताना त्या भेगा रुंदावल्या जातात.

खडकातील फटी मोठ्या होतात, त्यातून आतपर्यंत पाणी शिरते, साठते. परिणामी भूजल अधिक समृद्ध होते. चिंच ,आंबा, जांभूळ, बेहडा, मोई, अर्जुन, वावळ, कहांडळ अशा जातीच्या वृक्षांची मुळे खोलवर आणि त्याच वेळी आडवी, तिरपीही वाढतात.

भूजल वाढवण्यात मदत करतात. पाणलोट क्षेत्र विकास, नदी / ओढा पुनरुज्जीवन, वनीकरण, वृक्षारोपण उपक्रमामध्ये किंवा बांधावरही झाडे लावताना अशा सर्व झाडांचा जरूर विचार करावा.

वाळू आणि भूजल

१) नदीतील वाळूचे महत्त्व -

नदी सपाटीवरून वाहते, तेव्हा तिच्या तळाशी वाळू असते. नदी पात्रात वाळूचे थरच्या थर असतात. ही वाळू नदी तळाची सछिद्रता कायम ठेवते. त्यामुळे जमिनीत खाली पाणी जिरण्याची प्रक्रिया उत्तम रीतीने घडते. वाळू नसेल तर गाळामुळे नदीचा तळ गच्च होऊन जाईल.

त्यातून पाणी मुरणे पूर्ण बंद होईल. याच वाळूत मासे व इतर जलचरही अंडी घालतात. वाळूत साठलेल्या सेंद्रिय पदार्थांवर (बायोमास) बरेच छोटे जीव पोसले जातात. पात्रातील वाळूमुळे वेगाने आलेले पाण्याचा वेग मंदावतो. वाळूतून अधिक पाणी मुरत जाते.

त्यामुळे पुराच्या वेळी नदीकाठ व तळ खरवडण्यामुळे होणारे नुकसान टळते. वाळूच्या कणाकणा भोवती पोकळी असते. त्यात पाणी साठवले जाते. या पोकळ्या जोडल्या जाऊन केशवाहिनी तयार होते. त्यातून पाणी भरण्याची प्रक्रिया घडते.

केशवाहिन्यांमुळे भूजल वाढण्यास मदत होते. नदीपात्रात वाळूऐवजी माती वा गाळ साठला असेल किंवा वाळू काढून घेतलेली असेल तर पाण्याबरोबर आलेली माती तळातल्या खडकांच्या भेगात जाऊन बसते. त्यातून पाणी जिरणे बंद होते.

त्यामुळे भूजलाच्या वाढीसाठी वाळू आवश्यक आहेच, पण ती पाण्यातील जीव आणि जैवविविधतेसाठीही आवश्यकता आहे. कारण अनेक जिवांच्या जीवनप्रक्रियेमध्ये वाळू

महत्त्वाचा घटक आहे. वाळूच्या या पोकळीत साठलेल्या पाण्यात विविध बायोमास वाढते. त्याला व पर्यायाने वाळूला अनेक सूक्ष्मजीव चिकटून राहतात. अनेक कीटकांचे आश्रयस्थान वाळूच्या कणांभोवती असते. अनेक मासे व इतर जलचर वाळूत अंडी घालतात. त्यांच्या प्रजननासाठी वाळू आवश्यक असते.

वाळूऐवजी माती असेल तर माशांची अंडी मातीत रुतून खराब होतात. परिणामी त्यांची पैदासही घटत जाते. उन्हाळ्यात वरवर नदी कोरडी पडल्यासारखी दिसत असली तरी वाळूच्या कणाकणात खाली पाणी साठलेले असते.

अगदी थोडासा खड्डा केला तरी त्यातून मिळणारे पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी कामाला येते. पूर्वी नदीत पाणी नसले तरी जमिनीत पाणी मुरलेले व विहिरीत उन्हाळ्यातही असायचे

मात्र आता अनेक ठिकाणी नदी वा नाल्यातील ही वाळू तळापर्यंत खरवडून टाकली आहे. तिथे आता भूजल पातळी खूपच खालावलेली दिसते. त्याची कारणे शोधत गेलात तर त्याच्या मुळापाशीच नदीत वाळू नसल्याचे मोठे कारण आपल्याला दिसून येईल.

Groundwater conservation
Water Conservation : ‘जलसंधारणा’त मजूर संस्था होणार मालामाल

नदीत वाळू नसल्याचे अनेक तोटे आहे. ते गावाने व गावातील जाणकारांनी समजून घेतले पाहिजेत. तात्पुरत्या फायद्याच्या लोभाने वाळूच्या लिलावाला ग्रामसभेने मान्यता देऊ नये. कारण कायद्यानुसार ग्रामसभेची मान्यता नसेल तर सरकारी यंत्रणा व महसूल विभाग वाळूचा लिलाव करू शकत नाही.

मात्र गावाने त्यासाठी खंबीर राहिले पाहिजे. कारण या पाण्यावरच गावाची शेती (म्हणजे आर्थिक स्रोत) आणि पिण्याचे पाणी (म्हणजे जीवन) अवलंबून आहे. आपल्या भागातील पाणी विशेषतः भूजल संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत.

नेवासा तालुक्यातील (जि. नगर) येथील प्रवरा नदी काठावरील चार-पाच गावांनी त्यांच्या हद्दीतील वाळू उचलण्याची परवानगी गेली ३०-४० वर्षे दिलेलीच नाही. अगदी नगर येथील मिलिटरी कॅम्पच्या बांधकामासाठीसुद्धा वाळू देण्यास नकार दिला.

गावकऱ्यांच्या या जागरूकतेमुळेच अवर्षणाच्या वर्षामध्येही त्यांच्या गावातील भूजलावर फारसा परिणाम झाला नव्हता. लक्षात ठेवा नदी आणि त्यातील वाळू वाचविण्यासाठी ‘ग्रामसभेची मान्यता’ हे खूप मोठे हत्यार गावकऱ्यांकडे आहे. योग्य वेळी त्याचा वापर करा. गावकऱ्यांना वाळूचे महत्त्व समजले असेल, तर ते नक्कीच आपल्या विचारावर ठाम राहतील.

२) ‘क्रश सॅण्ड’ चाच वापर करा

मग काहीजण म्हणतात, की बांधकामे आणि विकास कसा होणार? कारण प्रामुख्याने काँक्रिट बनविणे आणि विशेषतः भिंतींना प्लॅस्टर करण्यासाठी नदी नाल्यातील वाळूला अधिक मागणी असते. काँक्रिटमध्ये मोठी खडी, बारीक वाळू व सिमेंट यांचे मिश्रण असते.

मोठ्या खडीच्या थरातील गॅपमध्ये बारीक वाळू बसते. आणि वाळू आणि खडीच्या गॅपमध्ये सिमेंट बसते. यातून दगडासारखा घट्ट पदार्थ तयार होतो, त्याला ‘सिमेंट काँक्रिट म्हणतात. खरेतर यात वाळूऐवजी खडीचा भुगाही चालू शकतो.

कारण शेवटी त्याची भूमिका खडीतील गॅप भरण्याइतकीच आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच ज्या भागांमध्ये जवळ नद्या व त्यातील वाळू नाही, अशा ठिकाणी खडीचा भुगा म्हणजे ‘क्रश सॅंण्ड’ वापरली जाते. आपल्याकडेही गेल्या २० -२५ वर्षापासून क्रश सॅंण्ड वापरायला सुरुवात झाली आहे.

मात्र अद्यापही बांधकाम व्यवसायातील अनेक लोक (यात अगदी भरपूर शिकलेले ‘इंजिनिअर’ही आले) कामांसाठी वाळूच वापरण्याच्या अंधश्रद्धेत अडकले आहेत.

त्यामुळे वाळू व पर्यायाने नदी, भूजल वाचवायचे असेल, तर अशा लोकांनाही ‘क्रश सॅंण्ड’ चा पर्याय सातत्याने सांगत राहिला पाहिजे. एक बाब सर्वांना लक्षात घ्या, आपल्याला तात्पुरता फायदा हवा आहे की शाश्वत जीवन याचा विचार सर्वांनीच (गावकरी, शेतकऱ्यांपासून - गवंड्यापर्यंत) केला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com