Groundwater Level : भूजल पातळी नियमितपणे जाणण्याची का असते आवश्यकता?

Water Update : आपल्या बोअरच्या पाण्याची पातळी आपल्याला रोज आणि अगदी सहजतेने समजली शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करताना फायदेशीर ठरू शकते. सामुदायिकरीत्या भूजल पातळी जाणून घेतले तर आपल्या गावातील भूजलाचेही नियोजन करता येईल. हे सोपेपणाने करण्यासाठी मोबाईलवर भूजल हे ॲप उपलब्ध आहे.
Groundwater Level
Groundwater LevelAgrowon

सतीश खाडे

Monsoon Rain Update : अद्याप मॉन्सूनचा पाऊस अपेक्षेप्रमाणे आला नसल्यामुळे सर्वांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. कोणत्याही विहिरीत डोकावले की तिची पाणी पातळी किती आहे, ते डोळ्यांना दिसते.

पावसाळ्यात वाढत गेलेली पातळी, काही काळ स्थिर राहिलेली पातळी, उन्हाळ्यात खाली खाली जाणारी पातळी, आटत चाललेली विहीर आणि आटलेली विहीर हे डोळ्यांना स्पष्ट दिसते. पण बोअरवेलचे पाणी ठरवले तरी पाहता येत नाही. एखाद्याने अगदी ठरवलेच मोजायचे तर दोरी आणि दगडाच्या साह्याने थोडाफार अंदाज घेता येतो.

आपल्या बोअरवेलची पाणी पातळी आपल्याला रोज आणि चक्क दिवसातून चार वेळा समजली तर? त्याच्या नोंदी ठेवता आल्या तर? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आली तर बोअरवेलमधील पाण्याच्या उपलब्धतेचा नियमित अंदाज घेता येईल. पावसाळ्यानंतर रब्बी व उन्हाळी पिके घेताना त्यानुसार नियोजन करता येईल.

कारण पीक भरात आल्यावर अचानक बोअरचे पाणी संपले तर सगळे पीक, त्यापायी केलेला खर्च वाया जातो. कमी पाऊस झालेल्या वर्षात सर्वच हंगामामध्ये भूजलाच्या पातळीचा उपयोग होऊ शकतो.

Groundwater Level
Groundwater Level : पाच वर्षांत ०.९५ मीटरने भूजलवाढ

पावसाळ्यापूर्वी बोअरमधील पाण्याची पातळी, किती पाऊस पडल्यावर पाणी वर चढू लागले किंवा शेजारच्या ओढ्याला पाणी आल्यावर किती दिवसांनी पाणी व किती वाढते याची अचूक माहिती आपल्याला मिळू शकेल. त्याच प्रमाणे पंप चालू करताना पाण्याची पातळी आणि सिंचनानंतर पंप बंद करतानाची पाणी पातळी याचाही अंदाज येईल.

सिंचनानंतर खाली गेलेली पाणी पातळी परत मुळ पातळीवर किती वेळात येते, हे समजू शकेल. यावरूनच पाण्याचे नियोजन, पिकांची निवड करता येईल. त्यातूनच अचूकतेने निर्णय घेतल्यास हमखास उत्पादनाची खात्री मिळू शकेल.

नियमित भूजल तपासणीचे फायदे

१. महिना, हंगाम, वर्ष याप्रमाणे पाणी पातळीची चढ उतार समजतील.

२. बोअरवेल जास्त काळ टिकवता येईल

३. आपत्कालीन गरजांसाठी उदा. जनावरांसाठी पाण्याची बचत करता येते.

४. मोटार कोरडी चालवणे टाळता आल्याने मोटर दुरुस्तीचा खर्च कमी करता येईल.

५. पाण्याच्या उपलब्धतेच्या खात्रीमुळे योग्य पिकांची निवड करता येईल. उत्पादनाची शाश्वती मिळेल.

६. आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी या पातळीची नोंद ठेवल्यास एकूणच भूजल पातळीबाबत सजगता येईल. व्यवस्थापन व नियोजन सोपे होईल.

७. सगळ्याच बोअरचे पाणी (भूजल पातळी) खाली गेल्याचे समजल्यास आपल्या बोअरचे पाणी आटल्यानंतर दुसऱ्या जागी बोअरवेल घेण्याचा निर्णय विचारपूर्वक होईल. दुसऱ्या बोअरचा खर्च टळू शकेल.

८. आपल्या व आजूबाजूच्या बोअरवेलच्या पाणी पातळ्यामुळे त्यांचा पाणी स्रोत एकच आहे की वेगवेगळा हेही समजेल.

९. पाणलोट क्षेत्र विकास कामे, बंधारे ,पाट पाणी, ओढे वा नदीला आलेले पाणी यांच्यामुळे बोअरवेलच्या पाणी पातळीत झालेला बदल

नोंदवता येईल. त्याची परिणामकारकता समजेल. आपल्या बोअरच्या स्रोत समजल्यास तो अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होईल.

१०. आपल्या बोअरचे पाणी दुसरा खेचून घेईल, या समजुतीने अनेकजण हे पाणी उपसून शेततळ्यात टाकतात. शेततळ्याचा निचरा आणि बाष्पीभवन यामुळे पाणी वाया जाते.

११. या उलट ही भूजल पातळीची माहिती समूहाने वापरल्यास भूजलाचे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करता येईल.

१२. आज विनाकारण गडबड करून पाण्याचा उपसा करून सिंचन करण्याची शेतकऱ्याची प्रवृत्ती असते. मात्र भूजलाविषयी खात्रीलायक माहिती सर्वांनाच समजत राहिल्यास उपसा नियंत्रित होईल. नियंत्रित उपशामुळे विजेचीही मोठी बचत होईल. महाराष्ट्रात कृषी पंप दिवसाचे सरासरी नऊ तास आणि वर्षांमध्ये दोनशे दिवस चालवले जातात.

एका पंपासाठी वर्षाकाठी सरासरी ४५०० युनिट्स (आणि दररोज २२.५ युनिट्स) वीज वापरली जाते. महावितरणच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ४२ लाख कृषी पंप आहेत. भूजल ॲप वापरून अगदी ५० टक्के शेतकऱ्यांनी वर्षातून किमान एक दिवस जरी वीज वाचविली तरी महाराष्ट्रात वर्षाकाठी सुमारे ४० कोटी रुपयांच्या विजेची बचत होऊ शकेल.

Groundwater Level
Groundwater Management : शास्त्रीय भूजल व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत

भूजल पातळी जाणून घेण्यासाठी ॲप!

भूजल पातळी मोजण्यासाठी ‘वॉटर लॅब इंडिया’ द्वारे एक मोबाईल ॲप विकसित केले आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून अनुदानित या ॲपचे नावच ‘भूजल’ असे आहे. कोणत्याही ॲन्ड्रॉईड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये चालते.

हे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या चार भाषेत चालवता येते. ते आपल्या बोअरवेलची भूजल पातळी दहा सेकंद ते अर्ध्या मिनिटात सांगते. बोअर होल केसिंग पाईपची वरील बाजू धातू किंवा प्लॅस्टिकच्या कॅप बंद असेल आणि त्यातून फक्त डिलिव्हरी पाइप बाहेर आलेला असला तर अशा ठिकाणीच हे ॲप काम करते.

बोअरहोलचे वरील तोंड उघडे असल्यास हे ॲप काम करत नाही. मात्र त्यावर नवीन मेटल कॅप बसविल्यास हे ॲप वापरता येते.

मोबाईलमध्ये ‘भूजल’ ॲप मोफत डाऊनलोड करता येते. ते ओपन करून आपला मोबाईल बोअरच्या केसिंग पाईपला लावलेल्या कॅपला खेटून धरायचा. लोखंडी रॉड, हातोडी किंवा एखाद्या लोखंडाची वस्तू कॅपवर आपटायची.

त्यातून तयार होणारा आवाज आणि त्याचा (प्रतिध्वनी) यावरून हे ॲप गणिते करून पाण्याची पातळी पुढील अर्ध्या मिनिटात मोबाईलवरच सांगते. ही सारी प्रक्रिया नेमकी कशी करायची, याचा एक व्हिडिओ ॲपमध्ये दिलेला आहे. तो पाहिल्यास अधिक स्पष्टता येईल.

पाणी पातळी मोजण्याची कृती आपण कितीही वेळा करू शकतो. त्याची नोंद दिनांक, वेळ व पातळी या स्वरूपात या ॲपवरच जमा होते. ही जमा झालेली माहिती तुम्हाला अगदी एक वर्षानंतरही पाहता येते. म्हणजेच कधी, किती पाणी होते, याचा अंदाज आपल्याला मिळू शकतो.

नियमितपणे पाणी पातळी मोजत राहिल्यामुळे पाण्याचे नेमके प्रमाण जाणून त्याच्या उपशाचा निर्णय करता येईल. कोरडे पंप चालण्यामुळे होणारे पंपाचे व त्याच्या दुरुस्तीचे नुकसान रोखता येईल.

प्रगत देशात भूजलावर सतत ठेवले जाते लक्ष

काही प्रगत देशामध्ये सर्वच बोअरवेलवर अशी यंत्रणा वापरणे सक्तीचे आहे. त्या बोअरवेलवर मोबाईलमध्ये असणारे सिम कार्ड ठेवून त्याच्या मार्फत पातळीचा हा डाटा सरकारी यंत्रणेकडे जातो.

तिथे त्याची नोंद व साठवण होते. परिणामी तो भाग, प्रदेश आणि पूर्ण देशातील भूजल पातळीची माहिती सर्वांनाच उपलब्ध होते. ही माहितीचा उपलब्धता शेतकरी, स्थानिक, प्रांतिक आणि देशाच्या प्रशासनाकडे असते. त्यामुळे पारदर्शकताही साध्य होते.

आणि भूजल व्यवस्थापन व संवर्धन अधिक काळजीपूर्वक व अचूकतेने केले जाते. आपण आपल्या गावापासून त्याचा वापर सुरू केल्यास या माहितीचा जलधर ( Aquifer based) पातळीवर किंवा सूक्ष्म पाणलोट क्षेत्र पातळीवर चांगला उपयोग होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com